मावळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहूतील प्रवेशद्वारा जवळ असलेल्या इंडसइंड बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. टोळीतील पाच पैकी दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडणारे सर्व हरियाणा येथील असून यात महिलेचा देखील समावेश आहे.
देहूगाव बीट मार्शल रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना देहूगावमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार उभी असलेली दिसली. पोलीस अधिकारी समाधान पटवाजकर आणि पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी सदर वाहनाजवळ जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार आळंदीच्या दिशेने वेगाने पळून गेली. त्यावेळी गाडीच्या पुढच्या बाजूला दोन पुरुष आणि मागे एक महिला बसलेली दिसली. बीट मार्शल म्हणून तैनात असलेल्या पोलिसांना संशय आल्याने ते ताबडतोब एटीएममध्ये पोहोचले.
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडताना पकडले
याठिकाणी आल्यानंतर इंडसइंड बँकेच्या एटीएमचे शटर थोडे वर केले होते. एटीएममधून जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून पोलिसांना चोरीचा संशय आला. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोहेब शेख यांच्याशी संपर्क करून मदत मागितली. एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही तरुणांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्यास सुरवात केल्याचे निदर्शनास आले.
दोघे ताब्यात, तीन जण झाले फरार
पोलिसांना पाहताच या चोरटयांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळ आणि दगडफेक करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर पोलिसाला मारहाणही केली. मात्र थोड्याच वेळात आणखी पोलिस पथक दाखल झाल्याने मुस्तफा मोबीन खान (वय ३०), मुस्तकीम मोबीन खान (वय २५) याना अटक करण्यात आली आहे. तर त्याचे साथीदार सीमा युसूफ खान (वय ४०), वारिस खान (वय २०) आणि आझाद खान (वय ४५) हे कारमधून पळून गेले आहेत. या प्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.