

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
Jayakwadi Dam Water Level : आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याची चिंता आता आणखी वाढली आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा अत्यंत झपाट्याने कमी होत असून, अवघ्या अडीच महिन्यांत हा साठा ९५ टक्क्यांवरून थेट ६९ टक्क्यांवर आला आहे. धरण क्षेत्रातील जवळपास २५ टक्के पाणी कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाच जिल्हे आणि औद्योगिक वसाहतींची मदार
एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील इतर लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झालेला नाही. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, शेकडो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांची संपूर्ण मदार जायकवाडी धरणावर आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरांसह दोन्ही जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींनाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
बाष्पीभवन आणि रबीच्या आवर्तनाचा परिणाम
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जायकवाडी धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला होता आणि सप्टेंबरअखेरपर्यंत धरण ९५ टक्के भरलेले होते. मात्र, सध्या धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून रबी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. सोबतच, वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. या दोन्ही कारणांमुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे.
आगामी नियोजन काय?
पुढील पावसाळ्याला अजून आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रशासनाने यंदा रबी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी हंगामासाठी एक आवर्तन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी सुमारे १० टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, सध्याची घट पाहता नागरिकांनी आणि प्रशासनाने आतापासूनच पाण्याचा अत्यंत जपून वापर करणे गरजेचे बनले आहे.
जालन्यातील 79 गावे आणि 41 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
जालन्यात नोव्हेंबर महिना संपण्याच्या आतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण बनत चालला आहे. एरवी उन्हाळ्यात दिसणारे टँकरचे चित्र यंदा नोव्हेंबर मध्येच पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यात 117 टँकरद्वारे जवळपास अडीच लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी वेगाने खालवल्याने आगामी उन्हाळ्यात जिल्ह्याला अत्यंत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सध्या जिल्ह्यात 19 गावे आणि 41 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान पाणीटंचाई एवढ्या लवकर तीव्र झाल्यामुळे प्रशासनाने 111 विहिरीचे अधिग्रहण देखील केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.