भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी आपल्या ठेवणीतले डाव टाकायला सुरूवात केलीय. याची सुरूवात कोल्हापुरातून झाली असून आता त्यांनी आपला मोर्चा सातारा आणि पुण्याकडे वळवलाय. सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भाजपच्या यशराज भोसलेंनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली.
तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यशराज यांचे काका मदन भोसलेंच्या घरी जाऊन बंददाराआड चर्चा केली. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेऊ थेट तुतारी फुंकण्याचे संकेत दिले.
भाजपचे मदन भोसले आणि यशराज भोसले हे काका-पुतणे वाई-खंडाळा मतदारसंघातून इच्छूक आहेत. मात्र या मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत. महायुतीत ही जागा अजितदादांच्या पक्षाला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसले काका-पुतणे हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.
हिच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकल्याचं समजतंय. तर दुसरीकडे भाजप नेते आणि अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे पुढील काही दिवसांत योग्य निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय.
कोल्हापूरात समरजित घाटगेंना गळाला लावून पवारांनी महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात धक्का देण्यास सुरूवात केलीय. आता हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके आणि मदन भोसलेंची अस्वस्थता हेरून पवारांनी डाव टाकायला सुरुवात केलीय. त्यामुळे 2014 नंतर भाजपकडे गेलेले सहकार सम्राट पून्हा आपल्याकडे घेण्यासाठी पवारांनी मोठी खेळी केलीय. मात्र या खेळीचा फायदा होऊन पवार मुसंडी मारणार की नव्या खेळीचा फटका बसणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.