अक्षय शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषण सुरु करणार आहेत. जरांगे यांची शांतता रॅली आज छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना घोषणा केली की, ते 20 तारखेला उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे यांनी कठोर उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''गोरगरीब मराठ्यांना कोणी अडचनीत आणत असेल, तर बघ्याची भूमिका घ्यायची नाही. मदतीला जायचं मराठा समजला आवाहन आहे. मराठा अधिकाऱ्यांना त्रास दिला तर त्याच्या मदतीला जायचं.''
ते म्हणाले, ''कोणत्या वेळेला मला मरण येईल, सांगता येत नाही. तरी मागे हटत नाही. आमच्या महिला रस्त्यावर आहेत, तुमचं सरकार का पाडू नये फडणवीस साहेब?'' जरांगे म्हणाले, ''सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय. याला एक तर बदनाम करा, नाहीतर घातपात करा. सरकार मला काय घातपात करेल. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागी असल्यावर यावं, एका बुक्कीत दात पाडेल.''
छगन भुजबळ यांना लक्ष्य करत जरांगे म्हणाले, ''छगन भुजबळ यांनी काही ओबीसी नेत्यांना अंतरावलीत रॅली काढायला लावली.'' ते म्हणाले, ''मराठ्यांच्या नोंदी सरकारी आहे, देव आला तरी त्या रद्द होत नसतात. मंडळ आयोग पंधरा दिवसात बरखास्त होऊ शकतो, पण मला ओबीसींचं वाटोळे करायचं नाही. आपल्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत मागे हटत नाही, हा माझा शब्द आहे.''
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, ''२० तारखेपासून पुन्हा उपोषण करणार. त्याच दिवशी मुंबईत कधी जायचं, याची तारीख ठरवणार.'' ते म्हणाले, ''मराठ्यांच्या मतावर आमदार होऊन मराठ्यांच्याच घराच्या समोर डीजे लावून नाचत त्रास द्यायचा नाही. तुम्ही आनंद घ्या जल्लोष करा. ज्या आमदारांनी त्यांना मतदान केले, त्यांनी त्या आमदारांना सांगावे. मी सगळ्या समाजांचा आदर करतो, पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांचा आदर करत नाही.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.