
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या ई-बसेसमध्येही एआय 2 तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेली असावी, अशा सूचना आम्ही संबंधित बस निर्मात्या कंपनीला दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या स्मार्ट ई-बसेससाठी विविध उत्पादकांकडून स्पर्धात्मक प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल, त्याची डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील असा अलार्म स्मार्ट बसमध्ये बसवला जाईल.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता सर्व प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बसमध्ये २ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. बसमध्ये अचानक आग लागल्यास आग विझवण्यासाठी फोन बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे परिवहन मंत्र्यांनी म्हटले. पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील घटनेनंतर बंद बस बाहेरच्या हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही, उघडण्याचा प्रयत्न केल्यास जोरात धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.