मध्य रेल्वेची वाहतूक सेवा सुरळीत. तब्बल साडेआठ तासानंतर लोकल सेवा सुरळीत. अंबरनाथहून पहिली लोकल कर्जतच्या दिशेने रवाना. तर बदलापूरवरून एक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना. पावसाचा जोर कमी केल्यानंतर रेल्वेचे ट्रॅक दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनकडून सुरू आहे. मात्र हळूहळू लोकल सेवा ही पूर्वपदावर आली आहे. तरी बाकी ठिकाणी रेल्वे रुळाचं काम सुरू आहे.
नांदेड शहराजवळ असलेल्या असना नदी पत्रात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळी 5 वाजता घडली. हे युवक या नदीत पोहण्यासाठी आले होते. नांदेड शहराजवळील कामठा या गावातील हे युवक आहेत. राहुल आठवले आणि साई चूनलवार असे या युवकांची नावे आहेत.
मुसळधार पावसामुळे अंबरनाथ-बदलापूरदरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईहून बदलापूरच्या दिशेने येणारे प्रवासी अंबरनाथला उतरून रिक्षा तसेच अन्य वाहने पकडून बदलापूरला जात आहेत. मात्र अंबरनाथमध्ये रिक्षा चालक प्रवासांकडून अवाजवी भाडं घेताना दिसत आहेत. अंबरनाथहून बदलापूरला जाण्यासाठी 30 रुपये भाडे असताना आज 50 ते 100 रुपये भाडे आकारले जात आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं आहे . मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
० रायगड आणि परडी गाव परीसरातुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता गेला वाहून
० निजामपुर आणि बावळे गावाचा संपर्क तुटला
कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कल्याण नगर मार्गावरील म्हारळ, वरप, कांबा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. रायते पुलावर पाणी साचल्याने वाहन चालक, चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
कोल्हापूरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे येथील ओढ्याला पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. अशात रांगणा किल्ल्याकडे जाणारे प्रवासी या पाण्यात अडकले होते. पाण्यात अडकलेल्या 80 हून अधिक पर्यटकांचे केलं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले आहे.
मलकापूर तालुक्यातील धरणगावमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. गावातील भिंत कोसळून त्याखाली दबून चार जनावरे दगावली आहेत.
मुसळधार पावसामुळं संपूर्ण महाड शहर जलमय झालं आहे. महाडच्या बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पुराचे पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भाग आणि धोकादायक ठिकाणच्या नागरीकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे.
पोलादपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सवाद-माटवण रस्त्यावर ४ ते ५ फुटांपर्यंत पुराचे पाणी साचले आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावचा संपर्क तुटलाय. नरवीर बचाव पथक आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
रत्नागिरीमधील खेडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. यामुळे खेड शहरातील बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय. जगबुडी नदी देखील धोक्याच्या पातळीवर पोहचलीये. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात.
कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरूच आहे. अशात कल्याण पूर्व पुणे लिंकरोडवरील विठ्ठववाडी स्मशानभूमि जवळील पुलावर वालधूनी नदीचे पाणी साचले आहे. कल्याण पूर्वेकडून विठ्ठलवाडी उल्हासनगर येथे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक वालधूनी पूल तसेच पत्रिपुलमार्गे वळवली जात आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातच सखल भागात पाणी साचण्याबरोबरच नागरिकांच्या घरात देखील गटाराचे पाणी शरत असल्याचा प्रकार पाहायला मिळालाय.
कुलाबा कप परेडमधील शिवशक्ती नगरात थोडासा जरी पाऊस पडला तरी गल्लीत गुडघाभर पाणी साचण्याबरोबरच नागरिकांच्या घरात देखील गटाराचे पाणी शिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शिवशक्ती नगरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या प्रभागातून महापालिकेने ड्रेनेज लाईनची कामे केल्यानंतरही पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बदलापूरमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीची इशारा पातळी 16.5 मीटर धोक्याची पातळी 17.5 मीटरपर्यंत पोहचलीये. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून कोळकेवाडी धरण व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदारद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती व खेर्डी सरपंचांना पाठवले आहे.
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. हेंद्रपाडा, मांजर्ली, वालीवली सोनिवली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात संततदार पावसाच्या हजेरीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वाघोडा, बेलोरा धामक, येवती, सुलतानपूर, शेलू, खंडाळा रोहना,जावरा, मुंडवाडा ,पळसमंडळ गोळेगाव खानापूर येथे मोठे नुकसान. पावसामुळे काही ठिकाणी शेतातील पिके वाहून गेली, तर काही शेतातील पिकं पूर्णपणे उद्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झालाय. सकाळी काही तास विश्रांती घेतल्यानंतर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पिंपळगाव काळे येथील लेंडी नाल्याला पूर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे. पिंपळगाव काळे येथील महर्षी वाल्मिकी नगर आणि तानकर प्लॉट याचा संपर्क तुटला आहे. या नाल्यावर पूर बांधण्यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने दिलीत. मात्र अजूनही दखल घेतली गेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात या गावचा संपर्क तुटून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता हे नागरिक पुलाच्या बांधकामासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
रत्नागिरी - चिपळूणच्या कुंभार्ली घाटात दरड कोसळली
हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू
चिपळूण कराड मार्ग त्यामुळे बंद
दोन्ही साईडला वाहनाच्या लांबच लांब रांगा
हिंगोलीत कालपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नदी दूथडी भरून वाहत आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगावजवळ या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाकडून सोडेगाव-बोल्डा हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी महाबळेश्वर - पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आले. यामुळे काहीकाळ वाहतूक मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. लिंगमळा परिसर देखिल जलमय झाल्याचे पहायला मिळाले.
रायगडमध्ये पुराचा धोका वाढला आहे. महाड, पोलादपुर, माणगाव, सुधागड, रसायनीमध्ये सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासन अलर्ट मोडमध्ये असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाडमध्ये बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी काल बंद झालेले अनेक मार्ग आजही बंदच असल्याने वाहतूक टप्प आहे. हवामान विभागाने आजही पावसाचा रेड अलर्ट दिला असून ढगाळ वातावरणामुळे मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. वैनगंगेच्या बॅक वॉटरमुळे अहेरी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंद असल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. गडचिरोली-चामोर्शी हा राष्ट्रीय महामार्गही पोटफोडी नदीच्या पुरामुळे काल रात्री 10 वाजता बंद झाला. सद्यस्थितीत आलापल्ली- ताडगांव -भामरागड, आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपुर, गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगात गेल्या तीन-चार दिवसात चांगला पाऊस झाल्याने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दरड कोसळल्याने असल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रस्ते देखील वाहून गेले आहेत. प्रशासनाकडून कुठलीही वेळेवर दाखल घेतली जात नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील कायमस्वरूपी या घटनांवर आळा बसेल यासाठी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील प्रवासी आणि वाहनधारक करू लागले आहेत.
काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्याच्या वनोजा येथील लेंडी नाल्याला पूर आल्याने वनोजा ते पिंजर मार्गाचा संपर्क तुटला आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाले आहे.
रत्नागिरी- खेड मधील जगबुडी नदीला पूर
खेड शहरात शिरलं जगबुडी नदीचे पाणी
खेड मधील मच्छी मार्केट परिसरात पाणी
व्यापाऱ्यांना नगरपरिषदेकडून सतर्क राहण्याच्या सूचना
रत्नागिरी- चिपळूण शहरातील सकल भागात पाणी भरण्यास सुरूवात
भाजी मार्केट, जुना नाईक पुल, मच्छी मार्केट आधी ठिकाणचा सकल भागात पाणी भरण्यास सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस
वाशिष्टी नदी व शिवनदी भरुन वाहत आहे.
पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळ पासून पावसाला सुरवात
अनेक सखल भागात साचले पावसाचे पाणी
मंडई भाजी मार्केट भागात गुडघाभर साचले पाणी असून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पाण्यातून वाट काढत रस्ते पार करावे लागत आहे.
जिल्ह्यात रात्रभर सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर बरसलेल्या पावसामुळे मात्र काही भागातील नुकतीच उगवलेली पिके पाण्याने वाहून गेली. शेकडो हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जामोद तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद नांदुरा मार्गावरील झाडेगावजवळील नाल्याला मोठा पूर आला. पुलावरून पाणी असल्याने नांदुरा-जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्ग ठप्प झाला आहे. परिसरात सध्याही मुसळधार पाऊस सुरू आहे. झाडेगावांत पाणी शिरले असून नागरिकांचे हाल झाले आहेत. घरात पाणी शिरल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालं.
ज्या जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे, त्याठिकाणी तत्काळ जिल्हाधिकऱ्यांनी पोहाचावे आणि पाहणी करावी. ज्या ठिकाणी परिस्थीती गंभीर आहे, तिथे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा असे आदेश मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत.
कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम हे देखिल उपस्थित होते.
राज्यात चांद्यापासून बांदापर्यंत अतिवृष्टीमुळे पाऊस कोसळत आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. अशात मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतून उशिराने सुरू आहे.
रत्नागिरी - चिपळूणच्या कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत पावसाची संतधार सुरूच आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. चिपळूण कराड मार्ग त्यामुळे बंद करण्यात आलाय. दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्यात.
हार्बर रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पनवेल ते बेलापूर लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. पनवेल स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये. मुसळधार पावसामुळे येथील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सचिन आहिर म्हणाले की, आमचा आग्रह होता की तालिका अध्यक्षांच्या उपस्थितीवर निएनी व्हायला हवा. काल तालिका अध्यक्षांच्या उपस्थितीत चर्चा घडवली. हा विषय सचिवालयाकडे आहे. आम्हाला अपेक्षा होती की तालिका अध्यक्ष काल निर्णय देतील, पण आज ते कदाचित देवू शकतील. जर सचिवालयाने याबाबत निर्णय दिला नाही तर राज्यपालांकडे जाऊ असे सचिन आहिर म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पुराच्या पाण्यात बैलजोडी वाहून गेली
काल रात्री झालेल्या पावसात मालेवाडा गावातील बैलजोडी वाहून गेली
चिचाळा नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू
शेतकरी तुळशीदास आंभोरे यांचं दीड लाख रुपयांचे नुकसान
सरकारी मदतीची शेतकऱ्याची मागणी
मराठवाड्यात आतापर्यंत केवळ २५.४ टक्के पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात औरंगाबाद, नांदेड व हिंगोली हे तीन जिल्हे टँकरवर आहेत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झालीय. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात भर पावसाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.
आजवर विभागात २५.४ टक्के पाऊस झाला असून ३३.७५ टक्के पाणी ११ मोठया प्रकल्पांत आहे. ४८ दिवसांमध्ये फक्त १४० द.ल.घ.मी. पाणी या प्रकल्पांमध्ये आले आहे. यात आयकवाडी प्रकल्पात ६५ तर पैनगंगा प्रकल्पात ४१ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील २८ गावे, चार वाड्यांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Heavy Rains in Maharashtra: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झालीये. पंचगंगेची पाणीपातळी २१ फुट ९ इंचावर पोहचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह २३ बंधारे पाण्याखाली गेलेत. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसत आहे. कोल्हापूरची तहान भागवणारे राधानगरी धरण ५८.३०% भरलेय. राधानगरी धरणातून प्रतीसेकंद ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
कोल्हापूर शहरात जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. २३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालीये. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलीये.
Extremely Heavy Rains in Maharashtra: यवतमाळ जिल्ह्यात येलोनंतर आता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. जिल्ह्यात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही, शेती तसेच शेतकऱ्यांना पिकांसाठी पुरेल इतकाच पाऊस झालेला आहे. मोठा पाऊस झाला नसल्याने प्रकल्प देखील भरलेले नाहीत.
रात्रीच्यावेळी चिपळूणच्या वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील सकल भागात पाणी भरले होते. नगरपालिकेने येथील नागरिकांना आधिच सतर्कतेचा इशारा दिला होता. अशात सध्या वाशिष्ठीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने कुठेही धोकादायक स्थिती नसल्याची माहिती समोर आली आहे.
High Alert In Maharashtra Today: ठाण्यात अज सकाळी पासून पावसाने उघडीप घेतली आहे. पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे दोन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. कोकणी पाडा परिसरात दोन दुचाकींवर झाड पडले आहे. तर, वसंत विहार परिसरात दोन खाजगी बसेसवर झाडे कोसळली आहेत. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही
रायगड जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून यामुळे नेरळ जवळील कळंब गावात जाणारा असलेला उल्हास नदीचा पूल हा पाण्याखाली केल्याने २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील २ दिवसात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलाय. नेरळहून कळंब गावात जाण्यासाठी उल्हास नदीचा पूल हा एकमेव आहे. नदीच्या प्रवाहात हा पूल आता पाण्याखाली गेल्याने या ठिकण्याची वाहतूक सेवा बंद झाली आहे. तर २० ते २५ गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन या ठिकाणी दाखल झाले आहेत.
महाडमध्ये पावसामुळे पुरपरीस्थितीत वाढ झालीये. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. महाड शहरातील बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडीमारुन बसलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस नसल्याने एकीकडे काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. तर दुसरीकडे अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. पातूर नंदापूर येथील नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पातुर नंदापूर येथील नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Maharashtra Weather Forecast: राज्यात आज सकाळपासूनच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस फार महत्वाचे ठरणार आहे. हवामान खात्याने पुणे, रायगड, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील ३ दिवस मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, कोकणातील अनेक जिल्ह्यात पुढचे २ दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Latest Rain Update News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.