News Updates : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात केमिकल टँकरला आग; रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली

जवळपास १०० घरांची वस्ती असलेल्या डोंगरावरील या गावाला दरडींचा धोका कायम आहे. त्यामुळं इथल्या २९ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
SAAM TV live News Blog
SAAM TV live News BlogSAAM TV
Published On: 

धक्कादायक! मुंबईतील मानखुर्दमध्ये आढळले मृत अर्भक, परिसरात खळबळ

मुंबईच्या मानखुर्दमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड परिसरातील गोदावरी इमारतीच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी काही अर्भक नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी त्यानंतर तत्काळ याची माहीती मानखुर्द पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेतले. पंचनामा करत पोलिसांनी अर्भक शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात केमिकल टँकरला आग; रस्त्यावरील वाहतूक थांबवली

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पोलादपूर हद्दीतील भोगाव गावाजवळ केमिकल टँकरला आग लागली आहे.

केमिकल टँकरला आग लागल्याने सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजुच्या एक किलोमीटरपर्यंत वाहने थांबवली आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे.

संभाजी भिडेंविरोधात गंगाखेड पोलिसांत तक्रार

महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद परभणीच्या गंगाखेडमध्येही उमटले. काँग्रेस आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून, भिडेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अपप्रवृत्तीस वेळीच न रोखल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

शेळ्या चारायला गेलेल्या २ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; गोंदियातील मुंडीपार येथील दुर्दैवी घटना

दोन मुलांचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथे ही दुर्दैवी घटना घडली. आर्यन शहारे (वय 16) व गंगाधर भरणे (16) अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मुले गावालगत असलेल्या नाल्याजवळ शेळ्या चारायला गेली होती. ते नाल्याच्या पाण्यात उतरली. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना अंदाज आला नाही. दोघेही पाण्यात वाहून गेले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार

अहमदनगर जिल्हावासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न आणि मागणी पूर्ण होणार आहे. नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच या मार्गावरील रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संभाजी भिडेंचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगला, लाथा घातल्या; सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन

कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे टांगले

राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला घातल्या लाथा

भिडे गुरुजींच्या लटकवलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरभर वाजतगाजत काढली मिरवणूक

मोहोळ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात तक्रार

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संभाजी भिडे यांना वयानुसार स्मृतिभ्रंश झालाय - संजय गायकवाड

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संपूर्ण राज्यभरातून त्यांचा निषेध केला जात आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. संभाजी भिडे यांना वयानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते असं विधान करत असल्याचे गायकवाड म्हणाले.

मुसळधार पावसाने रायगडमध्ये भातशेतीचं मोठं नुकसान

गेले 12 दिवस सुरु असलेला जोरदार पाऊस आणि काळ नदीला आलेल्या पुरामुळे रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये भात शेतीचे नुकसान झाले आहे. तळेगाव, कुरवडे वडगाव आणि उणेगाव गावांतील शेतीमध्ये हे नुकसान पहायला मिळत आहे. काळ नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात साचल्याने शेतात चिखल झालाय. तसेच पुराचे पाणी आणि चिखलामुळे भातशेतीची रोपं कुजली आहेत. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूरात पावसामुळे नागरिक रडकुंडीला; शहर पुराच्या विळख्यात

चंद्रपूर शहरातील सखल भागात गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला आहे. यामुळे नदीचे पाणी शहरात शिरले आहे. एकीकडे शहरालगतचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचाही विसर्ग केला जात आहे. त्यामुळेच शहरातील राजनगर- सहारा पार्क- सिस्टर कॉलनी- रहमत नगर या भागातील अनेक नागरिक पुराच्या विळख्यात सापडलाय.

संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

संभाजी भिडेंनी महात्मा गांधींविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशात अमरावतीत भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून भिडेंना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागलीये.

पूरग्रस्त भागातील दुकाने आणि टपरीधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य शासनाकडून ७५ टक्के खर्च उचलणार 

पूरग्रस्त भागातील दुकाने आणि टपरीधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकसानग्रस्त दुकानांचा ७५ टक्के खर्च राज्य शासनाकडून उचलण्यात येणार आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील दुकाने व टपरीधारकांना प्रथमच अशा प्रकारची मदत मिळत आहे.

राज्य शासनाचा विशेष दराने मदत देण्याचा निर्णय घेतलाय. जून ते ऑक्टोबर २०२३ या पावसाळी हंगामात ही मदत दिली जाणार आहे. यामध्ये नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपयांपर्यंत दुकानदारांना मदत मिळणार आहे. टपरीधारकांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

Pune News: भरधाव कार निरादेवघर धरणात कोसळली; तिघांचा बुडून मृत्यू

पुण्याहून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कार निरादेवघर घरणात कोसळली आहे. या कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. अपघातात एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. मात्र कारमधील अन्य तिघे दगावल्याची माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसाने कोसळली दरड, गावकरी भयभीत

अलिबाग तालुक्यातील ताजपुर येथे काल रात्री दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरडीमुळे पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे नुकसान झाले आहे. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील आणि गट विकास अधिकारी यांनी गावाला भेट देत दरडीची पाहणी केली. जवळपास १०० घरांची वस्ती असलेल्या डोंगरावरील या गावाला दरडींचा धोका कायम आहे. त्यामुळं इथल्या २९ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Today's Maharashtra Rain Live Updates: राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे वाहतूकीवक देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. धरणाची पाणी पातळी वाढत असून अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे नदीकाठच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही डोंगराळ भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. (Latest Rain News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com