वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का, तब्बल २०० पदाधिकाऱ्यांचे एकाचवेळी राजीनामे.
जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजीमुळे बंडाची ठिणगी.
अनेक वरिष्ठ नेते आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिले.
निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे पक्षाला खिंडार.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एकाच वेळी तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यामुळे पक्षात अक्षरशः भूकंप झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी संघटनात्मक कामकाज, पक्षातील गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे नाराज होते. कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे पक्षाच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अखेर आज या सर्वांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन पक्षाला "सोडचिठ्ठी" दिली.
यामध्ये माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते संजय साबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल, भारिप बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख अनिल आठवले, माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीज सचिव किशोर महिरे आदींचा प्रमुख असून त्यांच्या पाठोपाठ अनेक कार्यकर्ते राजीनामा सादर करण्यासाठी पुढे आले आहेत. कार्यकर्त्यांच्या मते, "पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर सुरू केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना पूर्णपणे दुय्यम वागणूक दिली जाते. पक्षातून काढून टाकण्याची सर्रास पणे धमकी दिली जाते आम्ही विचारसरणीशी निष्ठावान आहोत, परंतु अशा अन्यायकारक वातावरणात काम करणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या मोठ्या बंडामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक सामर्थ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक सारख्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणे ही पक्षासाठी अत्यंत धोक्याची घंटा ठरू शकते.
राजीनामे सादर करताना उपस्थित सर्व पदाधिकाऱ्याऱ्यांनी एकमुखाने सांगितले की, "आम्ही वंचितांच्या हक्कासाठी लढत राहू पण स्थानिक अन्यायकारक आणि हुकूमशाही वृत्तीच्या नेतृत्वाखाली नव्हे." नाशिक जिल्ह्यातील या घडामोडींमुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर दबाव वाढला असून पुढील काही दिवसांत या राजीनाम्यांच्या लाटेचा परिणाम राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.