

अकोल्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीतील १० नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश.
काँग्रेस, अजित पवार गट आणि अपक्ष सदस्यांना मोठा राजकीय धक्का.
या पक्षप्रवेशाला 'ऑपरेशन टायगर'ची पहिली मोठी झलक मानले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' राबवले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चा चालू असतानाच अकोला जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय घडामोडीने ऑपरेशन टायगरची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीमधील तब्बल 10 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर’ची पहिली झलक दाखवल्याच म्हटलं जातंय. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेस,अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आणि अपक्ष गटातील सदस्यांचा समावेश आहे. यात काँग्रेसचे चार, अजित पवार राष्ट्रवादीचे दोन आणि चार अपक्ष, असे एकूण १० नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे यांच्या पुढाकारातून पार पडला. या राजकीय घडामोडीनंतर बार्शी टाकळी नगरपंचायतीत सत्तांतराच्या चर्चांना वेग आलाय. यासह अकोट नगरपालिकेतील १५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अपक्ष गटातील शुभम इंगळे, नवेद खान, इफ्तेखारुद्दीन काझी आणि शहाना अंजुम यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून रफिया खान, मुमताज सिद्दीक, सय्यद जहागीर, आसगिरी अंजुम आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून रुबिना परवीन व सफिया बेगम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान राज्यातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे पक्षातील काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट शिवसेना मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को येथे शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यात यंदाच्या वर्धापन दिवसाला मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरसेवक आणि आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.