जालना : आज मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसले आहेत. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभा निवडणूक लढवणार की विरोध करणाऱ्यांना पाडणार, ही भूमिका २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, आठ तारखेला मागण्यांवर चर्चा करू, असं आमदार राऊत म्हणाले आहेत. तर १३ तारखेपर्यंत निर्णय घ्या. २९ ऑगस्टनंतर मी ऐकणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय. आम्ही दोन महिने वेळ दिला होता. कारण आरक्षणाच्या जीवावर राजकारण केलं, असं कोणी म्हणायला नको, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
लढणार की पाडणार?
सत्ता सगळे प्रश्न सोडवू शकते, असं समाजाचं म्हणणं आहे. राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. नोंदी असून सुद्धा आरक्षण द्यायचं नाही, करण्यासाठी इच्छाशक्ती लागते अशी टीका देखील जरांगे पाटलांनी सरकारवर केलीय. सर्वपक्षीय बैठक बोलवावी हा जर-तर विषय आहे. त्याला काही किंमत नाही. सर्वपक्षीय बैठक बोलावणे ती आमची जबाबदारी नसल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.
जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक
सरकार कुठलंही, असो जनतेने मागणी करायची असते. आम्ही सगळ्यांना जमा करू शकतो, तर आरक्षण मागायची काय गरज आहे. तुम्हाला निवडून आणून द्यायचं, आणि तुम्हाला जमा आम्ही करायचं, तुम्ही काय करायचं मग तुमची जबाबदारी काय आहे? विरोधी पक्षाला आणि सरकारला आम्ही बोलायचे, आमची जबाबदारी आहे का? ही कुठली पद्धत आहे , असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी विचारला आहे.
आरक्षणासाठी पुढील अजेंडा काय?
मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाने काळे झेंडे दाखवले, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भावना खूप तीव्र आहेत. समाजाला विनंती आहे की, सध्या काही करू नका. आपण किती दिवस आंदोलन करायचं? याच्यावर एकदाच २९ ऑगस्टला तोडगा काढू, असं आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिलंय. आता जरांगे पाटलांचा आरक्षणासाठी पुढील अजेंडा काय असणार? विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.