नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने हे एबी फॉर्म पाठवणे शिंदे सेनेच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरने एबी फॉर्म नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी एबी फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी होणार आहे.
यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईच स्वरुप निश्चित होणार आहे. २९ तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ अगोदर शिंदे सेनेकडून एबी फॉर्म देण्यात आले होते. दिंदोरीच्या धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये याचीच चर्चा होत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य झाले आणि अनेक पक्षांतील नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली. महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.
महायुतीतील दुसऱ्या पक्षाला जागा देण्यात आली असताना त्याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. वेळेमध्ये उमेदवारी अर्ज भरावा यासाठी शेवटपर्यंत सर्व इच्छुकांची धावपळ झाली. अशामध्ये शिंदे गटाने आपल्या पक्षाच्या नाशिकमधील दोन उमेदवारांसाठी शेवटच्या क्षणाला हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. नाशिक देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.