
Maharashtra political updates : गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याचं समजतेय. राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना, रायगडचे पालकमंत्रिपद कोण होणार? हे अद्याप समोर आलेले नाही. पण अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात रायगडवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील नाराजी अमित शाह यांच्यासमोर बोलून दाखवली. रायगडचा मुद्दाही उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर एकनाथ शिंद यांनी भरत गोगावले यांना भेटण्यासाठी निरोप पाठवला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले यांना मुंबईमध्ये तातडीने भेटण्यासाठी बोलवले. शिंदेंचा निरोप आल्यानंतर भरत गोगावले तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रायगडच्यापालकमंत्री पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदेंचा निरोप आल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडमधील सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे कूच केली.
शिंदे-अमित शाह, दोन दिवसात दोन बैठका -
अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सलग दोन दिवस त्यांची भेट घेतली. पुण्यातील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. पण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये बऱ्यच विषयावर चर्चा झाल्याचे समजतेय. अर्थ खात्याची फाईल पास होत नसल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. त्याशिवाय रायगडच्या पालकमंत्रिपदावरही चर्चा झाल्याचे समजतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धाच्या दौऱ्यावर गेले, त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये भेट झाली.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी लंच डिप्लोमसी?
तब्बल 4 महिन्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची आशा निर्माण झाली. त्याला कारण ठरलंय सुनील तटकरे यांची लंच डिप्लोमसी. रायगड दौऱ्यानंतर अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी हजेरी लावली. पण याकडे भरत गोगावले यांनी पाठ फिरवली होती.
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना तातडीने मुंबईला बोलवले. गोगावले यांना मुंबईला बोलवल्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर चर्चा होणार असल्याचे बोलले जातेय. एकनाथ शिंदे गोगावले यांची समजूत काढतात की रायगडचे पालकमंत्रिपद देतात? याची राजकीय चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.