Shivsena Dasara Melava: शिवसेनेच्या इतिहासात शिवतीर्थावरच्या दसरा मेळव्याचा इतिहास काय आहे? वाचा सविस्तर

Maharashtra Political News: १९२५ साली मुंबई महानगर पालिकेने हे मैदान तयार केलं.
Shivsena Dussehra Melava
Shivsena Dussehra MelavaSaam TV
Published On

तुषार ओव्हाळ

Dasara Melava 2023:

ऑक्टोबर महिना सुरु होताच शिवसेनेच्या दोन्ही गटांना दसरा मेळाव्याचे वेध लागले. गेल्या वर्षी शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोण घेणार यावरून दोन्ही गटांत चांगलाच वाद झाला. प्रकरण कोर्टात गेलं आणि ठाकरे गटाला शिवतीर्थाची परवानगी मिळाली. यंदा हा वाद फार झाला नाही. कोर्टात गेल्यावर पुन्हा ठाकरे गटालाच परवानगी मिळाली असती म्हणून शिंदे गटाने माघार घेतली असं सांगितलं जातं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena Dussehra Melava
Yewla Crime News : येवला परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा; २५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

पण शिवसेनेच्या इतिहासात शिवतीर्थावरच्या दसरा मेळव्याचा इतिहास काय आहे? या साठी आपल्याला शिवाजी पार्कचा आणि शिवसेनेचा इतिहास समजून घ्यावा लागेल.

शिवाजी पार्कचा इतिहास हा ९६ वर्ष जुनाय. १९२५ साली मुंबई महानगर पालिकेने हे मैदान तयार केलं. तेव्हा या मैदानाला माहिम पार्क असं म्हटलं जायचं. १९२७ साली नगरसेविका अवंतिका गोखले यांच्या मागणीनुसार या मैदानाचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. योगायोग म्हणजे याच वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला.

शिवाजी पार्क हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचं स्थान होतं. ब्रिटिशांविरोधात भारतीयांनी या मैदाना अनेक चळवळी केल्या. पुढे १९४७ साली भारताला स्वातंत्र्यही मिळालं. १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला. शिवाजी पार्क हे संयुक्त महाराष्ट्राचं केंद्र झालं होतं. कारण या चळवळीचे अग्रणी नेते प्रबोधन ठाकरे आणि प्रल्हाद केशव अत्रे यांची शिवाजी पार्कावरच भाषणं व्हायची. या चळवळीसाठी एखादे वृत्तपत्र असावी अशी मागणी पुढे आली. तेव्हा अत्रे यांनी मराठा वृत्तपत्र सुरु करण्याची घोषणा याच मैदानात झाली. १९६० साली मराठी भाषकांच राज्य महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि मुंबई राज्याची राजधानी झाली.

मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही मराठी माणसाला त्याचे हक्क मिळत नव्हते, या भावनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना ठाकरे यांचं दादरचं घर कदम मॅन्शनमध्ये झाली. १९ जून १९६६ रोजी घरात नारळ फोडून पक्षाची स्थापना झाली. पुढे संघटनेला मराठी माणसांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. तेव्हा शिवसेनेचा पहिला मेळावा शिवतीर्थावरच झाला. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावरच शिवसेनेचा पहिला मेळावा झाला. हा फक्त मेळावा नव्हता, शिवसेना स्थापन झाल्यानंतर पक्षाची पहिलीच जाहीर सभा होती. पुढे शिवसेनेत या दसरा मेळाव्याचा पायंडाच पडला. आणि शिवसेनेच्या संस्कृतीत ती परंपराच निर्माण झाली.

पुढच्या काळात पक्षाची भुमिका आणि अजेंडा काय असेल, या बाबत बाळासाहेब दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करत. सामना वृत्तपत्रातही विचारांचं सोन लुटायला चला अशा मथळ्यांनी आवाहन केलं जायचं. भारत पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही अशी घोषणा १९९१ साली बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावर केली. तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन नेते बाळा नांदगावकर यांनी वानखेडे स्टेडियमची पिच खोदली होती. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता.

शिवसेनेच्या इतिहासात चार वेळा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला नव्हता. २००६ साली खूप पाऊस पडल्यामुळे हा मेळावा रद्द करावा लागला होता. तर २००९ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा मेळावा होऊ शकला नाही. २०२० आणि २०२१ साली कोरोनामुळे हा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये पार पडला होता.

पुढे २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मनसेची स्थापना केली. तेव्हा राज ठाकरे यांनी पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कातच घेतली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे राज ठाकरे यांनीही गुढी पाडव्याला जाहीर सभा घेण्याची परंपरा सुरु केली.

२०११ साली बाळासाहेबांनी शेवटचे शिवाजी पार्कात भाषण दिले. २०१२ साली त्यांचे रेकॉर्डेड भाषण शिवसैनिकांना दाखवण्यात आले.

२०१२ साली बाळासाहेबांचं निधन झालं. तेव्हा शिवतीर्थावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. बाळासाहेबांना अखेरची मानवंदना देण्यासाठी लाखोचा जनसमुदाय आला होता. या शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती स्थळ उभारण्यात आलं. बाळासाहेबांच्या जयंती आणि स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिक स्मृती स्थळी येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहतात.

शिवतीर्थ शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकासाठी एक पवित्र स्थान आहे. बाळासाहेबांनी याच मैदानावर शिवसेनेची स्थापना केली, याच मैदानावर शिवसेनेच्या मोठ मोठ्या सभा गाजल्या. याच मैदानावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१० साली युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेचं राजकीय लॉन्चिंगही याच मैदानावर झालं होतं. आणि २०१२ साली बाळासाहेबांनी याच ठिकाणी आपला देह ठेवला.

शिवाजी पार्काने शिवसेनेला आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शिवाजी पार्कावरचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा वारसाय. आणि हा वारसा आपला आहे असा दावा दोन्ही गटांकडून केला जातो. पण हा दावा सिद्ध करण्यासाठी शिवाजी पार्कावरचा दसरा मेळावा महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच बाळासाहेबांच्या वारशावर दावा करण्यासाठीच ठाकरे आणि शिंदे गटात शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी चढाओढ सुरु होती.

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार याचा प्रश्न तर सध्या सुटलाय. पण खरी शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे याचे उत्तर अजून मिळालेले नाही. निवडणूक आयोगाने जरी शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलंय. तरी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा प्रलंबिते. असं असलं तरी ज्या दिवशी निवडणुका लागतील, त्या दिवशी जनता आपली मतं कुणाच्या पारड्यात टाकते त्यातूनच शिवसेना कुणाची या प्रश्नाचा उत्तर तेव्हाच मिळेल.

Shivsena Dussehra Melava
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com