२४ कॅरेट सोन्याच्या नावाखाली २२ कॅरेट सोने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
नारळीबाग येथील ‘आशीर्वाद गोल्ड’ ऑफिसवर पोलिसांची धडक कारवाई.
इंस्टाग्रामवर जाहिरात करून ग्राहकांना फसवणूक जाळ्यात ओढले.
चार आरोपींना अटक; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.
माधव सावरगावे ( छत्रपती संभाजीनगर )
छत्रपती संभाजीनगरमधील शहरात पोलिसांनी एका सोन्याच्या दुकानातून भेसळयुक्त सोन्याचा फसवणुकीचा मोठा पर्दाफाश केला आहे. २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट असल्याचे भासवून उच्च किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली असून, आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ‘आशीर्वाद गोल्ड’ या नावाने ऑफिस थाटून बसवलेल्या या टोळीने २४ कॅरेट सोने ९३ हजार रुपयांत खरेदी करण्याची आणि ते १ लाख रुपयांत विकून ७ हजार रुपयांचा नफा मिळवण्याची जाहिरात सोशल मीडियावर केली होती. ही जाहिरात इंस्टाग्रामवर एका ‘रीलस्टार’च्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली होती. या योजनेत आकर्षित होऊन अनेक लोकांनी संपर्क साधला असता, त्यांना प्रत्यक्षात २२ कॅरेट सोने २४ कॅरेट म्हणून विकले जात होते.
या टोळीत आनंदकुमार नामदेवराव मगरे, दीपक गौतम आढावे, जयपाल कन्हैयालाल धर्मानी आणि सुशील प्रभू बाघमारे यांचा समावेश आहे. आरोपी धर्मानी याने आनंदकुमार मगरेला हा फसवणुकीचा ‘फंडा’ सांगितला. त्यानंतर मगरेने दीपक आढावे याला सोबत घेतले आणि स्वतःच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर, नारळीबाग परिसरात ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाचे ऑफिस सुरू केले. त्यांच्या योजनेनुसार, २२ कॅरेट सोने ९१०० रुपये प्रति ग्रॅम दराने खरेदी करून, त्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट असल्याचा भास निर्माण करून ९३०० रुपये प्रति ग्रॅम दराने ग्राहकांना विकले जाई. नंतर हेच सोने ग्राहकाने १०,००० रुपये प्रति ग्रॅम दराने विकल्यास त्याला ७०० रुपये प्रति ग्रॅम नफा होईल, असा खोटा विश्वास दाखवण्यात येत होता.
या फसवणुकीच्या प्रचारासाठी आरोपींनी सुशील प्रभू वाघमारे या रीलस्टारला सोबत घेतले. त्याने प्रमोशनल व्हिडिओ तयार करून तो आपल्या इंस्टाग्राम आयडीवर टाकला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना तपासाची जबाबदारी दिली. पीएसआय वाघ यांनी सखोल पडताळणी केली असता, हा प्रकार सरळसरळ फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या किंवा नफा मिळवून देण्याच्या योजनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणि अधिकृत प्रमाणपत्रांची खात्री करणे आवश्यक असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी कोणत्या ठिकाणी कारवाई केली?
नारळीबाग परिसरातील ‘आशीर्वाद गोल्ड’ ऑफिसमध्ये ही कारवाई झाली.
आरोपींनी फसवणूक कशी केली?
२२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट असल्याचे भासवून उच्च दराने विक्री केली.
जाहिरात कशी पसरवली गेली?
रीलस्टारच्या मदतीने इंस्टाग्रामवर प्रमोशनल व्हिडिओ टाकून ती व्हायरल करण्यात आली.
पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?
एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.