वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. राज ठाकरे आपल्या दौऱ्यात उमेदवारांची देखील घोषणा करत आहेत. आज हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अजून एका पदाधिकाऱ्याला उमेदवारी देत मनसेचा चौथा उमेदवार घोषित केलाय.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडू कुटे यांची उमेदवारी जाहीर केलीय. कुटे यांच्या रूपाने हिंगोली विधानसभेत मनसेकडून महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात तगडा उमेदवार मनसेने दिलाय. यामुळे दोन्ही बाजूकडील पक्षाचं टेन्शन वाढलंय.
१. मुंबई शिवडी येथून बाळा नांदगावकर
2. पंढरपूर येथून दिलीप बापू धोत्रे
3. लातूर ग्रामीण मधून संतोष नागर गोजे
4. हिंगोली येथून प्रमोद उर्फ बंडू कुटे.
याआधी राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा पत्रकाद्वारे केली होती. मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदावारी जाहीर केली.
शिवडी मतदारसंघातूनच बाळा नांदगावकर चारवेळा आमदार राहिलेत. शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर दिलीप धोत्रे हे १९९२ साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता.
धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यावेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना सोडत राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात मनसे वाढवण्यात धोत्रे यांचा मोठा वाटा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.