Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Sangli: सांगलीच्या आटपाडीच्या शेळी-मेंढी बाजारात विक्रमी वाढ

सांगलीमध्ये आटपाडी मध्ये शेळया-मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांना विक्रमी दर मिळाला आहे.एका बकऱ्याला तब्बल 34 हजार रुपये इतका दर तर सहा बकऱ्यांची दोन लाख रुपयात विक्री झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी, घोडा आणि रथासह बकऱ्यांची गावातुन वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी मध्ये पारंपरिक आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शेळया मेंढ्यांचा आठवडी बाजार पार पडला,ज्यामध्ये बकऱ्यांना चांगला दर मिळाला आहे.ज्यामध्ये लवटेवाडीतील शेतकरी तानाजी महादेव लवटे यांच्या बकऱ्यांना हा विक्रमी दर मिळाला आहे.

Pune: पुण्यातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

पुण्यातील अलका टॉकीज चौकातील मांडव न काढल्यामुळे वाहतूक कोंडी

विसर्जन मिरवणुकीनंतर सुद्धा महापालिकेचा मांडव तसाच

मांडव तसाच असल्यामुळे चौकात वाहतूक कोंडी

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे महापालिकाकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला होता

विसर्जन मिरवणुक पूर्ण व्हायला रेकॉर्ड ब्रेक वेळ लागला, आता मांडव काढायला सुद्धा पालिका वेळचा रेकॉर्ड करणार का असा प्रश्न उपस्थितीत

काल रात्री ८ वाजता विसर्जन मिरवणूक सोहळा संपन्न झाल्यावर हा मांडव काढणे महापालिकेची जबाबदारी आहे मात्र दुसऱ्या दिवशी १० वाजता सुद्धा हा मांडव तसाच आहे

Pandharpur News: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन

सोलापूर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दहा टक्के आरक्षण नुसार राखीव 86 पदे आहेत. ही पदे तत्काळ भरावीत अन्यथा 16 सप्टेंबर पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत कामगार युनियनेचे अध्यक्ष दिलीप जाधव यांनी दिला आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत वर्ग तीन व चार च्या पदावर 2005 च्या अधिनुसचने नुसार रिक्त पदांच्या दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे. सध्य स्थितीत जिल्हा परिषद प्रशासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करून 86 कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. सदर कर्मचाऱ्यांवर 2023 पासून हा अन्याय होत आहे.

परभणीच्या धारणगाव येथील गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

परभणीच्या धारणगाव येथील बंधाऱ्याच्या पाण्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर गावकरी आक्रमक झाले होते धारणगाव येथील गावकरी या तरुणाच्या मृतदेहाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते सकाळी आठ वाजल्यापासून या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून गावकरी या तरुणाचा मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले आहेत समसापूर बंधाऱ्याच्या पाण्यामुळे धारणगाव गावकऱ्यांना शेताकडे जाणं मुश्किल झाला असून शेतकरी शेतात जाण्याचा प्रयत्न करतो त्याचा पाण्यात बुडून मृत्यू होतो अशी घटना घडत असल्यामुळे गावकऱ्यांनी या बंधाऱ्याला तोडण्याची मागणी केली होती यावर आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून निर्णय घेतला जाणार आहे.दरम्यान या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते

Jalgaon: जळगावमध्ये  ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने जुलूस काढण्यात आले

भुसावळ शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आज ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने जलुसचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रजा टावर पासून जलुस काढण्यात येऊन शहरातील मुख्य मार्गावरून उर्दू शाळा क्रमांक 3 मध्ये जुलूसचे विसर्जन करण्यात आले . जुलूस दरम्यान हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेचे दर्शन दिसून आले. या जुलुसमध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा दिल्या . तसेच पोलीस प्रशासन तर्फे हे मुस्लिम बांधवांचा गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले मोठ्या जल्लोषात व उत्साहात ईद-ए-मिलाद साजरा करण्यात आला .

गोंदिया आणि भंडाऱ्यात पावसाचा इशारा

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात वीज व गडगडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

सावधानता बाळगा

आदिवासी विकास मंत्र्याच्या घरासमोर फासेपारधी समाजाचं आंदोलन

फासेपारधी समाज संघटनेच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक,डाॅक्टर अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घरासमोर विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.दरम्यान यावेळी महिला,पुरूष आणि विद्यार्थींनी देखली सहभागी झाल्या होत्या.मंत्री उईके हे मुंबई येथे असल्याने त्यांनी फासेपारधी समाजातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्यानंतर फासेपारधी समाजातील नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं.

'कोल्हापूर गॅझेटियर' संदर्भात महत्त्वाची कोल्हापूरात पत्रकार परिषद

हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर नंतर आता कोल्हापूर गॅझेट वरची चर्चा पुढे येऊ लागली आहे. आज कोल्हापुरात 'कोल्हापूर गॅझेटियर' संदर्भात महत्त्वाची पत्रकार परीषद होत आहे. कोल्हापूरचे गॅझेटियर हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यातील कुणबी नोंदी संदर्भात माहिती आणि नंतरच्या गॅझेट मध्ये केलेली गफलतची महत्त्वाची पत्रकार परिषद आज दुपारी १वा कोल्हापुरातील मराठा समाजातील नेते घेणार आहेत.

Manoj Jarange Patil: अन्यथा दसरा मेळाव्याला निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या

हैदराबाद गॅझेटिअरच्या अंबलबजावणीची सुरुवात करावी

अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल

सरकारने हैदराबाद गॅझेट लवकर लागू नाही केलं, तर येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात आम्हाला भूमिका जाहीर करावी लागणार आहे- मनोज जरांगे पाटील

Maharashtra Live News Update: १७ सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा - जरांगेंची मागणी

17 सप्टेंबरच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरुवात झाली पाहिजे. हैदराबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. आता यात सरकारने बदल करू नये. 17 सप्टेंबर पर्यंत प्रमाणपत्र वाटप करण्यात सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, कोणाच एकूण आमची हेळसांड झाली नाही पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

उचंगी इथं टस्करकडून मोटारीचे नुकसान

आजरा तालुक्यातील उचंगी या गावात टस्कर हत्तीने घरासमोर लावलेली मोटार फुटबॉल प्रमाणे खेळत दूर नेऊन ती चेपून टाकली. रवळनाथ देसाई यांची ही मोटार असून त्यांच्या एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसात टस्कर हत्ती उचंगी, शृंगारवाडी परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजरा तालुक्यात सध्या दोन टस्कर हत्तींचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेल आहे.

धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात आले. सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी मागील काही दिवसांपासून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यात आज यश मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दोन दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. तिचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती.

NAGPUR - होमिओपॅथी डॉक्टरांना सरकार देणार दिलासा

सीसीएमपी(Certificate Course in Modern Pharmacology) पास होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी(महाराष्ट्र मेडिकल काँसिल) रजिस्ट्रेशन देण्याबाबत परिपत्रक काढून रजिस्ट्रेशनचा मार्ग मोकळा होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होमिओपॅथी डॉक्टरांनी भेट घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्याची केली होती मागणी...

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच परिपत्रक काढण्याचे दिले आश्वासन...

- या निर्णयामुळे लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना मिळणार दिलासा, होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथिक प्रॅक्टिस करायला मिळणार

संवेदनशील खामगाव शहरातील गणेश विसर्जन सुरळीत

दरवेळेस खामगाव शहरातील गणेश विसर्जन मध्ये दोन गटात वाद होत असतात .. मात्र यावर्षी पोलीस विभागाने सातत्याने शांतता समितीच्या बैठका घेऊन गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते त्यानुसार भाजप आ आकाश फुंडकर व पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणेशबविसर्जन शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते त्यानुसार संपूर्ण गणेश विसर्जन सुरळीत पार पडल्याने मुस्लिम व हिंदू समाजाने पोलीस अधिकारी व आ आकाश फुंडकर यांचा सत्कार केलाय....

उचंगी इथं टस्करकडून मोटारीचे नुकसान

आजरा तालुक्यातील उचंगी या गावात टस्कर हत्तीने घरासमोर लावलेली मोटार फुटबॉल प्रमाणे खेळत दूर नेऊन ती चेपून टाकली. रवळनाथ देसाई यांची ही मोटार असून त्यांच्या एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसात टस्कर हत्ती उचंगी, शृंगारवाडी परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजरा तालुक्यात सध्या दोन टस्कर हत्तींचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेल आहे.

चंद्रग्रहणानंतर विठुरायाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान

या वर्षातील शेवटचे चंद्रगृहण रात्री लागले होते. मध्यरात्री ग्रहण संपल्यानंतर विठ्ठल रूक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. मध्यरात्री सुमारे दीड वाजता ग्रहण संपल्यानंतर मंदिर समितीच्या पुजार्यांनी नदीपात्रातून पाणी आणून देवाला स्नान घातले.

गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

- रामकुंड, गोदाघाट परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा

- धरणांमधून पाणी सोडल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

- गंगापूर, त्र्यंबकेश्वर, हरसूल भागात पावसाचा जोर

- शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसात घट, मात्र धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच

- शहरासह जिल्ह्यातील अनेक नद्या आणि धरणं तुडुंब भरली

- गंगापूर धरणाचा पाणीसाठा ९७ टक्क्यांवर आणि जिल्ह्याचाही पाणीसाठा ९७ टक्क्यांवर

वाण नदीपात्रात बुडून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू...

बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमारेषेवरील काकनवाडा बुद्रुक येथे एका 38 वर्षीय तरुणाचा शेतातून घरी परत येताना नदीपात्रात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.. यामुळे कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे .. मृतक सिद्धार्थ रामदास भिलंगे हा सकाळी शेतातून काम करून परत येत होता .. वाटेत वान नदीपात्रातुन जातांना त्याचा पाय घसरला असता तो नदीच्या खोल पाण्यात जाऊन बुडाला.. या घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे ..

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकार या त्यांच्या सहकाऱ्यासोबत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गेल्या होत्या. त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला. त्याच वेळी यातील एका सदस्याने ढोल ताशा ट्रॉली चे चाक फिर्यादी यांच्या पायावरून घातले. याचा जाब विचारायला फिर्यादी गेल्या असता पथकातील एका सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिलं. महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत विचारले असता त्याला सुद्धा पथकातील सदस्याने शिवीगाळ करत मारहाण केली असे तक्रारी मध्ये नमूद आहे

नवीन विक्रम! पुण्यात विक्रमी ३४ तास ४४ मिनिटांची विसर्जन मिरवणूक

पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता विक्रमी 34 तास 44 मिनिटांनी झाली. मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन गेल्यावर्षीच्या अडीच तास आधी होऊन सुद्धा पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीने गेल्या तीन वर्षांच्या वेळेचा रेकॉर्ड मोडला आहे. सुट्टीचा दिवस त्यासोबतच असलेली गर्दी त्याला ढोल ताशा पथकांमधील सदस्य संख्येबाबत मिळालेली पोलिसांची शिथिलता, डीजेचा दणदणाट अशा कारणांमुळे ही विसर्जन मिरवणूक लांबली गेल्याचं बोललं जात आहे. शनिवारी सकाळी सुरू झालेला ओघ रविवारी रात्री आठ पर्यंत सुरू होता. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्ता टिळक रस्ता कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

दिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडीला आता पेण रेल्वे स्थानकाकात पुन्हा थांबा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याचा लाभ प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कोरोना काळात या स्थानकावरील या गाडीचा थांबा बंद करण्यात आला होता. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा थांबा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती.

उल्हासनगर मध्ये दहशत माजविणारऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली परिसरात धिंड

उल्हासनगरच्या आशेळे गावात सुमित कदम उर्फ ​​लाला गुंडाने याने अनेक वाहन आणि दुकानांची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांना तलवारीने हल्ला करत जखमी केले होते.या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत सुमित उर्फ ​​लाला कदम याला अटक केली, त्यानंतर ज्या परिसरात त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच परिसरात त्याची धिंड काढली. या परिसरातील दहशत संपवणे आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा यामागचा उद्देश उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यापुढील काळात कोणी तोडफोड अथवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरही अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

करुळ घाटात धोकादायक दरडी हटविण्याचे तज्ज्ञ कंपनीमार्फत काम सुरू

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटातील कोसळलेल्या ठिकाणच्या आणि धोकादायक उंच डोंगरावरील तडा गेलेल्या दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धोकादायक कामाचा अनुभव असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एसएसपीएल कंपनीला पाचारण केले आहे. या कंपनीने धोकादायक दरडी काढण्यास सुरुवात केली आहे. या घाटातील दरडी काढण्यासाठी 12 सप्टेंबर पर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडा व भुईबावडा घाटातून सध्या वळविण्यात आली आहे.

आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

आयुष कोमकर खूनप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे

टोळीयुध्दातून आयुष कोमकर याचा नाना पेठेत शुक्रवारी सायंकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता

आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे

‘वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील याने आयुषवर गोळीबार केला. त्यावेळी अमित पाटोळे व सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते. गोळीबारानंतर ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे म्हणत आरोपींनी दहशत माजविली

अतिवृष्टीमुळे पावणे तीन लाख हेक्टर वरील पिके उध्वस्त. सहाशे घरांची पडझड

लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची ,आकडेवारी समोर आली आहे., जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 75 हजार हेक्टर वरील शेती पिक ही अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले आहेत.तर जवळपास तीन लाख शेतकरी यांना या पावसाचा फटका बसला आहे., त्याचबरोबर 600 घरांची पडझड आणि, सुमारे 327 जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे देखील प्रशासनाने हाती घेतले आहे. तर सर्वाधिक अहमदपूर आणि उदगीर तालुक्यातील गावे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शासनाच्या मदतीकडे अपेक्षा आहेत.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार

मराठा आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा बंजारा समाजाने दिला आहे.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी लावून धरली होती. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत हैदराबाद गॅजेट नुसार जीआर काढला आहे. आता या जीआरने राज्य सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. हैदराबाद गॅझेट नुसार आम्ही आदिवासी आहोत असा दावा बंजारा समाजाने केला आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट नुसार आम्हाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे.राज्य शासनाने मागणी मान्य न केल्यास येणाऱ्या काळात राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढणार असल्याचा इशाराच बंजारा समाजाने दिला आहे.बंजारा समाजाची नांदेडमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये बंजारा समाजाने एक मताने हा निर्णय घेतला आहे. तालुका, जिल्हा आणि त्यानंतर विभाग स्तरावर लाखोंचे मोर्चे काढण्यात येणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे नेते डॉक्टर बि.डी. चव्हाण यांनी दिला आहे.

संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा मेळावा

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्या वॉर्डात मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी शहरात दुपारी १.४५ वाजता आगमन होणार असून, ते शहरातील विविध कामांच्या संबंधी बैठक घेणार आहेत. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या प्रवेशानंतर संत एकनाथ रंगमंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ६.३० वाजता तानाजी चौक बालाजीनगर येथे मेळावा होणार आहे. मेळाव्यास पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव आदींची उपस्थिती राहणार आहे. माजी महापौर तुपे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे शहरात येत आहेत. दरम्यान, या दौऱ्यात दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची चर्चा शहरात रंगात आहे

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा मदतीचा हात

मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व आत्महत्या केलेल्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. खरसाडे कुटुंबावला फोन करून तानाजी सावंत यांनी विचारपूस केली. बीड जिल्ह्यातील तीन पीडित कुटुंबाला प्रत्येकी 3 लाख रूपये मदत देण्यात आली.मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक महेश डोंगरे यांच्या माध्यमातून ही मदत या कुटुंबांना देण्यात आली.. तसेच या कुटुंबाचे संपूर्ण पालकत्व घेण्याचाही शब्द तानाजी सावंत यांच्यावतीने देण्यात आला.

जायकवाडीच्या १८ दरवाजांमधून ३७ हजार क्युसेकने विसर्ग

मराठवाड्यातील जायकवाडी धरण परिसर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाचे १८ दरवाजे दोन फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.सध्या धरणाची पाणी पातळी १५२१.८८ फुटावर पोहोचली असून, जिवंत पाणीसाठा २१५६.६०६ दलघमी आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९३.९१ टक्के होता. यावर्षी जायकवाडी धरणात ९२ टीएमसी पाणी आले असून, धरणाचे दरवाजे उघडून ३२ टीएमसी पाणी आजपर्यंत गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे.

नागपूर_दिल्ली_नागपूर विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल

16 सप्टेंबर पासुन एअर इंडियाच्या नागपूर_दिल्ली_नागपूर विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल..

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी उड्डाण होणारे हे विमान आता सकाळी उड्डाण होणार..

एआय 465 दिल्ली नागपुर हे विमान यापूर्वी सायंकाळी 5:53 वाजता नागपूरला पोहचत होते..मात्र आता 16 सप्टेंबर पासुन ते सकाळी साडे सात वाजता उतरणार..

त्याप्रमाणे एआय 466 नागपूर दिल्ली हे विमान सकाळी 8 वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे..

सिल्लोडमध्ये लव्ह स्टोरीचे बिंग फुटू नये म्हणून विद्यार्थ्यांचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये हिंदवी करिअर अकॅडमीच्या संचालकाचे प्रेम प्रकरण उघड होऊ नये यासाठी संचालकाने एकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अमोल गजानन मख असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून याप्रकरणी अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव, कृष्णा जगताप, गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड अशी आरोपींची नावे आहेत. जाधव यांचे अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. त्यांनी अमोलच्या मदतीने तिच्याशी ओळख करून घेतली होती. अमोलकडे या प्रेमप्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग व इतर पुरावे होते. त्यामुळे बिंग फुटेल या भीतीने जाधवने हा अपहरणाचा कट रचला होता. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

बिल्डरच्या दबावाखाली पोलिस कारवाई – शेतकऱ्यांचा गंभीर आरोप

अंबरनाथ पालेगावातील देसाई परिवार या शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या चाळीस गुंठे जमिनीत शेजारच्या बिल्डरने अतिक्रमण केले असून, त्याच्या दबावाखाली पोलिस आमच्यावर कारवाई करतात. या जागेवर शेतकऱ्यांनी कंटेनर ठेवून ऑफिस सुरू केले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांचा ताफा जागेवर दाखल झाला आणि कंटेनर हटवण्याचा आदेश दिला. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कंटेनरमधील अधिकृत वीज आणि पाणी जोडणी कापण्यात आली. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, "आम्हाला न्याय मिळत नाही, उलट आमच्यावर अन्याय होत आहे," असा त्यांचा आक्रोश आहे. शेतकऱ्यांनी तातडीने न्याय देण्याची मागणी केली असून, अन्यथा उपोषणासह आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

खऱ्या अन्नपूर्णांचा केला सत्कार, महिला झाल्या भाऊक. गौरी गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न...

महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारे प्रशांत भागवत युवा मंचच्या वतीने मावळात गौरी गणपती सजावट स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेमध्ये पाचशे हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. फ्रिज, मिक्सर, पिठाची गिरणी, वाशिंग मशीन, मोबाईल फोन, अशाप्रकारे अनेक ग्रह उपयोगी वस्तूंचे बक्षीस महिलांसाठी ठेवण्यात आले होते. या बक्षीस समारंभाचे आयोजन जांभूळच्या शिवराज पॅलेस मध्ये करण्यात आले होते .या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. चूल आणि मूल मध्ये अडकलेल्या या महिला सारिकाताई सुनील शेळके यांच्या हस्ते ग्रह उपयोगी वस्तूंचे बक्षिस घेताना भाऊक झाल्याचे दिसत होते. या उपक्रमातून समाजातील एकोप्याला चालना मिळाली असून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी नाते घट्ट करण्याची प्रेरणा मिळाली आहे.त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना बक्षीस युवा मंच वतीने देण्याचा निर्णय घेतला होता. हा उपक्रम फक्त स्पर्धा नसून मावळच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरला आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याची ताकद या उपक्रमाने दाखवून दिली आहे, आणि हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे....दरम्यान कुठल्याही बक्षीसाची अपेक्षा न बाळगता दरवर्षी महिला गौरी गणपतीची सजावट करीत असतात. माझ्यापुढे बसलेल्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. गौरी ह्या लक्ष्मीचं रूप आहे. आणि गौरी आता साक्षात त्यांच्या घरी अवतरली आहे. त्यामुळे या महिला आरोपी गौरीचं मी मनापासून स्वागत करते.. प्रशांत भागवत युवा मंच वतीने दरवर्षी हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. महिलांना ग्रह उपयोगी वस्तू दिल्याने आणखीच चांगल्या पद्धतीने घर चालवेल अशी अपेक्षा करते.

मच्छीवर प्रक्रिया करणारी केंद्र उभी केलीतर जास्तीचा पैसा मच्छिमारांना मिळेल - प्रविण दरेकर

भाजपचे आमदार आणि मुंबै बँकेचे चेअरमन प्रविण दरेकर यांनी कोकणात होणारी मच्छिमारी आणि मच्छिमारांना मिळणारे अत्यल्प उप्तन्न याबाबत खंत व्यक्त केली आहे. यासाठी चांगली व्यवस्था आणि मासळीवर प्रक्रिया करणारी केंद्र उभारण्याचा मानस दरेकर यांनी व्यक्त केला आहे. फलोत्पादन खात भरत गोगावले यांच्याकडे तर नितेश राणे यांच्याकडील मत्स्य विभाग कोकणाच्या विकासासाठी महत्वाचे असल्याचे सांगताना या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी जे काय करणे शक्य आहे ते आम्ही करू आणि त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आशिर्वाद देतील असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

आत्ता कोकणात फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना झाला नाहीतर भविष्यात होणार नाही; प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत

कोकणात फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना नाही, भरतशेठ फलोत्पादन मंत्री आहेत. आत्ताजर फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना कोकणात झाला नाहीतर भविष्यात परत कधी होईल अस मला वाटत नाही अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यांनी व्यक्त केलेली हि खंत शासनाकडून कोकण विकासाबाबत सापत्न भावाला दुजोरा आधोरेखीत करीत आहे. आम्ही दोघे पाठिशी लागून कोकणात दोन, चार प्रकल्प आणू असा विश्वास दरेकर यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या महाड शाखेचे मंत्री भरत गोगावले आणि प्रविण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ

मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या महाड शाखेचा आज शुभारंभ झाला. मंत्री भरत गोगावले आणि आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते फित कापुन हा शुभारंभ करण्यात आला. मुंबईमध्ये सुरु झालेल्या या पत संस्थेची रायगड जिल्ह्यातील हि दुसरी शाखा आहे. या संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्याला मदत होईल, नोकरी करण्यासाठी चाकरमानी पुणे, मुंबईत जातो, तो न जात नोकऱ्या देणारा होईल. यासाठी प्रयत्न राहणार असल्याच दरेकर यांनी म्हटल आहे.

Maharashtra Live News Update: पुण्याला पाणी पुरवठा करणारी चार ही धरणे १०० टक्के भरले

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्याला पाणी पुरवठा करणारी चार ही धरणे १०० टक्के भरले

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप

चार ही धरणं मिळून २९ टी एम सी पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर १०० टक्के भरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com