Maharashtra Live News Update : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १३ जून २०२५, छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल

खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकून मिरवले.

मात्र, हे ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं.

या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे या आरोपीचे नावं आहेत.

याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे.

चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल् बेड्या

राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग अशी रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीची नाव आहेत.

2 मार्च 2025 ला मालमत्ता विरोधी गुन्हे विभागाचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर अवैधरीत्या रक्तचंदनाची वाहतूक करणारा एक कंटेनर आढळून आला होता.

या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासात मालमत्ता विरोधी गुन्हे पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना बेड्या ठकल्या होत्या.

मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग हे पोलिसांना गुंगारा देत जवळपास चार महिन्यापासून फरार होते.

मात्र पोलिसांनी मुंबई परिसरातून या दोन्ही आरोपींना आता बेड्या ठोकल्या आहेत.

Nanded: नांदेडमध्ये 108 रुग्णवाहिकेची सेवा विस्कळीत

नांदेडमधील मुखेड उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेच्या सेवेची दिरंगाई चव्हाट्यावर आली आहे.

भेंडेगाव येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांना खासगी वाहनाने रुग्णालया गाठावे लागले आहे.

रुग्णवाहिकेसाठी दोन तास वाट पाहूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, असा आरोप रुग्णाचे नातेवाईक मनोज पांचाळ यांनी केला आहे.

सुदैवाने, या घटनेत आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. मात्र यामुळे 108 रुग्णवाहिकेच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

रविवारच्या सुट्टी निमित्ताने तोरणमाळला पर्यटकांची गर्दी

महाराष्ट्र मध्य प्रदेश सह गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळ ला दाखल...

तोरणमाळचा प्रसिद्ध सीताखाई पॉईंटवर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी....

राज्यातील दुसरा क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असल्या तोरणमाळला नैसर्गिक सौंदर्याची पर्यटकांना भुरळ....

सीताफाई पॉईंट यशवंत तलाव गोरक्षनाथ गुफा तोरणमाळ आकर्षण....

राज्यातील सर्व परमिट रुम, बार आणि लाउंज उद्या राहणार बंद

पुणे, मुंबई सह राज्यातील एकूण 22000 बार उद्या बंद

पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलइयर असोसिएशन यांनी दिली माहिती

दारूवरील वॅट रद्द करा, 60 टक्के उत्पादन शुल्क वाढ सुसह्य स्तरावर आणा या प्रमुख मागण्या

दारुवरील व्हॅट ५ टक्क्यावरून वरून १० टक्के पर्यंत दुप्पट करण्यात आला, परवाना शुल्कात 15 टक्के वाढ, देशी विदेशी दारू वर उत्पादन शुल्कात 60 टक्के वाढ करण्यात आली

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 19,000 व पुण्यामधील 4200 कायदेशीर परवाना कक्षेतील बार्स आणि लाउंज बार्स प्रभावित झाल्याचा आरोप

राज्यातील एक लाखाहून अधिक लाडके भाऊवर बेरोजगारी टांगती तलवार

राज्य सरकारची लाडका भाऊ योजना फेल.....

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आपल्या विविध मागण्यासाठी आक्रमक....

तुकाराम बाबा महाराज यांचा नेतृत्वाने 50 हजाराहून अधिक प्रशिक्षणातील छत्री आंदोलनाला होणारा सहभागी...

बेरोजगार तरुणांच्या हातांना काम द्या या मागणीसाठी मोर्चाची तयारी...

लोणावळ्याच्या भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे.

रविवारची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि वर्षाविहार व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहेत.

त्यामुळे भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे..

दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यत दाखल झाल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे.

दुग्ध व्यवसायिकाने शेतकऱ्यांचे पेमेंट करण्यासाठी बँकेतून काढलेल्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला

धाराशिवच्या परंडा तालुक्यातील दूध व्यवसायिकाच्या चार चाकी गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेले 1 लाख 30 हजार रुपये घेऊन चोरट्यानी पळ काढलाय.तब्बल बारा किलोमीटरचा पाठलाग करत गाडीवर लक्ष ठेवून चिंचपुर येथील क्षत्रगुण रामा गरड या दूध व्यावसायिकाने शेतकऱ्यांच्या पगारी करण्यासाठी बँकेतून काढलेली रोकड चोरट्याने पळविल्याचे घटना सीसीटीव्ही कॅमेरात ही कैद झाली आहे.दिवसा ढवळ्या दूध व्यवसायिकाच्या पैशावर चोरट्याने मारलेल्या डल्ल्यामुळे परंडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.याबाबत अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस  तपास करत आहेत.

सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या यादीत झाल्यानं दापोलीत आनंदोत्सव

ऐतिहासिक वारसा असलेल्या दापोलीतल्या हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय. संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने नागरीकही यावेळी उपस्थित होते..समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे, यामुळे दापोलीतील पर्यटनावर आणखी मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'कॅन्टिन केसरी' किताब देत आमदार संजय गायकवाड विरोधात शिवसेना उबाठाचे आंदोलन

विधानभवनाच्या आवारातील कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा सोलापुरातील उद्धव सेनेच्या वतीने 'कॅन्टिन केसरी' किताब देऊन उपरोधिक सत्कार करून आंदोलन करण्यात आले.

सोलापुरातील चार हुतात्मा चौकात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच विडंबन असलेले पोस्टर फडकाविले. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा अळ्या किडे निघतात त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला. याप्रसंगी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

अमरावती विभागातून 40 हजारावर भाविकांना लाल परीने घडवले विठ्ठल दर्शन

एसटी महामंडळाला पांडुरंग पावला..

अमरावती विभागाला 1कोटी 64 लाखांचे उत्पन्न

अमरावती विभागातून 175 बसेस द्वारे 517 फेऱ्या सुखरूप पूर्ण

3 ते 13 जुलै दरम्यान पंढरपूर साठी विशेष बसची करण्यात आली व्यवस्था..

या दरम्यान हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली..

Nandurbar: रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील सुमारे 300 ते 400 ग्रामस्थांना प्रचंड हाल

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड, थुवाणी आणि अठ्ठी ही तीन गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील सुमारे 300 ते 400 ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.

या गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि एकही हँडपंप उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. अंगणवाडी एका तात्पुरत्या कुडाच्या घरात भरते.

परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

धामणगाव गढी येथील चेक पोस्टवर वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी...

दर शनिवारी आणि रविवारी होत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

रविवार असल्याने पर्यटकांची चिखलदऱ्याला जाण्यासाठी मोठी गर्दी

राजकोट किल्ला बंद तरीही शिवपुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवताली दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती होईपर्यंत राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शिवपुतळा पाहण्यासाठी त्याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. शिवपुतळ्यासोबत फोटो काढण्याबरोबरच अजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचा पर्यटक आनंद घेत आहेत. पावसाळा असला तरी तसेच किल्ला बंद करण्यात आल्यावरही पर्यटकांची राजकोट येथे गर्दी होत आहे.

मजुरांच्या कमतरतेने शेतकरी एकमेकांच्या साह्याने करतात मावळात भाताची लागवड

मावळ तालुक्यात महिनाभर पावसाची संततधार सुरू आहे. अनेक भाताच्या शेतात पाणी साचल्याने भात शेती करण्यास अवघड झाले आहे. त्यातच मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. यावर शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे. आज तुझ्या शेतात भात लागवड करू उद्या माझ्या शेतात सर्व मिळून भात लागवड करू. अशी एक शक्कल लढवल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे काम पण होते आणि मजुरांची कमतरता आहे. त्यावरही एक उपायही मिळाला आहे. मावळच्या अनेक शेतकऱ्यांनी एकमेकांच्या साह्याने भाताची शेती लागवड करायला सुरुवातही केलेली आहे

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक

पुणे शहराचे अध्यक्ष पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत

बैठकीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे सुभाष जगताप महिला आयोग,अध्यक्ष रूपाली चाकणकर,प्रवक्त्या रुपाली पाटील,माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थितीत

बैठकीला डिझाइन बॉक्स कंपनीचे सी इ ओ नरेश अरोरा उपस्थितीत

पुण्यात बारामती हॉस्टेल येथे होणार बैठक

काही वेळात अजित पवार पोहचतील

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील शिष्यवृत्ती पॅटर्नचा जिल्ह्यात डंका

धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील शिष्यवृत्ती पॅटर्नचा जिल्ह्यात पुन्हा एखदा डंका वाजला असुन गावातील 37 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत इयत्ता आठवी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये आदर्श कन्या शाळेतील 22 मुली,जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमीक शाळेतील ९ मुले आणि व जय हिंद विद्यालय येथील ६ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.तर कन्या शाळेतील जान्हवी संतोष जाधव २७८ गुण घेवुन राज्य गुणवत्ता यादीत झळकली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कवळ्या पिकांवर हरिणांचा हैदोस, शिरूर अनंतपाळ तालुक्यात हरिणांचा बंदोबस करण्याची मागणी

लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात कवळ्या सोयाबीन पिकांवर हरिण आणि वन्य प्राण्यांचा हैदोस पाहायला मिळतोय. तालुक्यातल्या शेकडे हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक हरिणांनी फस्त केल आहे. हरिणांची कळप दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. त्यामुळे या हरीण आणि जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

70 वर्षीय वृद्ध सासूला सुनेकडून मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावात घरगुती शेतीच्या वादावरून एका वृद्ध महिलेला सुनेकडूनच मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत त्या वृद्ध महिलेचे केस ओढत,तिला फरफटकांना, आणि लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.. . दरम्यान या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही.

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप सोमवारी कार्यकर्त्यांचा घेणार सवाद मेळावा

सासवड मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना घेणार जाणून

१६ जुलैला संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

तसे संजय जगताप यांनी काँग्रेसच्या सदस्यवाचा राजीनामा दिल्याची माहिती

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणी मुळे विकास निधी येण्यास विलंब

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे काय बोलून गेले...

लाडकी बहीण सत्ताधाऱ्यांना नकोशी झाली काय?

लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंदापुरात विधान...

घरकुलाचा धनादेश वाटपात कार्यक्रमात केले विधान..

याही अगोदर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे केले होते विधान...

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना लाडक्या बहिणी नकोशी झाल्यात काय असाच प्रश्न आता समोर आलाय...

सत्तेमधीलच मंत्री जर लाडक्या बहिणीबद्दल असे विधान करत असतील तर लाडकी बहीण ही योजना लवकरच गुंडाळतील की काय असाच प्रश्न आता महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे...

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अशा विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समज देतील का

अमरावती जिल्ह्यात उघडे डीपी बॉक्स ठरताहेत धोकादायक

अमरावती जिल्ह्यातील ग्रामिंन भागात ठिकाणी विद्युत डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्याने तसेच, दरवाजे नसल्याने ते धोकादायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अचलपूर तालुक्यातील शिदी, पोही, कुष्ठा, काकडा, पथ्रोटातील अनेक परिसरात अशा अनेक उघड्या डीपी आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी महावितरणला अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत; परंतु याकडे महावितरण कानाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

२४ गॅस सिलेंडर आणि इतर मुद्देमालासह आरोपी नांदुरा पोलिसांच्या ताब्यात

नांदुरा शहरातील मोबीनपुरा भागातील शेख मोबिन शेख हनीफ हा व्यक्ती अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉम्प्रेसर मशिनचे साह्याने घरगुती व् कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा मधील टाकीमध्ये भरताना नांदुरा पोलिसांनी त्यास अटक केली आहे.... आरोपीच्या ताब्यातून एकूण इंडेन कंपनीचे 24 गॅस सिलेंडर , ऑटो रिक्षा, कॉम्प्रेसर मशीन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..... दरम्यान याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्र. 2025 कलम 287 BNS प्रमाणे कारवाई करून त्यास अटक केली आहे...

प्रतापगड किल्ल्यावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागतिक वारसा स्थळ फलकाच अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाले.या 12 किल्ल्यांमध्ये साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचा देखील समावेश आहे.

यामुळे प्रतापगड किल्ल्यावर आनंदाचे वातावरण आहे.पुरातत्त्व विभागाने प्रतापगडावरील नागरिकांना घेऊन गडावर प्रतापगड जागतिक वारसास्थळ अशा फलकाचे अनावरण केलं.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.राज्यातील या सर्व किल्ल्यांमधील प्रतापगड किल्ला हा राबता आहे या ठिकाणी शिवप्रतापदिन,मशाल महोत्सव असे अनेक कार्यक्रम घेतले जातात

त्यामुळे प्रतापगड किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ जाहीर झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थानी सांगितलं आहे.

Pune: पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अमली साठा जप्त

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापेमारी करत जप्त केला ८ लाख रुपयांचा अमली पदार्थ

अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना ठोकल्या बेड्या

राजस्थान राज्यातून अमली पदार्थाची तस्करी करत पुण्यात आरोपी करत होते विक्री

राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सिताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख, महेश नारायण कळसे असं अटक केलेल्या आरोपींची नावे

पुण्यातील हडपसर आणि खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री

पुण्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २ हजार ५८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पीएमपी कारवाई तीव्र केली आहे.

गेल्या दोन महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २ हजार ५८७ फुकट्या प्रवाशांवर तर १ हजार ४०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून,२१ लाख ३३ हजार रुपयांचा दंड केला आहे.

तपासणी पथकाने मे आणि जून महिन्यात २ हजार ५८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १२ लाख ८९ हजार रुपयांचा दंड आकारला आहे, तर गैरवर्तणूक आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल १ हजार ४५३ वाहक आणि चालकांवर कारवाई करून आठ लाख ४४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे

पावसाळा सुरु होताच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटात धुके

कल्याण आहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटातील दरीच्या बाजूला असलेली संरक्षक भिंत आणि कठडे धुक्यामुळे दिसेनासे होत असल्याने अनेकदा वाहनचालकांना केवळ अंदाजावर गाडी चालविण्याची कसरत करावी लागतेय अशा स्थितीत अपघाताची शक्यता वाढतेय आणि नागरिकांचा जीव धोक्यात येतोय. त्यामुळे घाटातील संरक्षक भिंतींवर रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. यासोबतच, घाटातील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे प्रवाशांसाठी अजूनच त्रासदायक ठरत असून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

तुळजाभवानी मंदीर पहाटे 1 ऐवजी 4 वाजता उघडणार

भाविकांची संख्या रोडावल्याच्या पाश्र्वभूमीवर रवीवार आज पासुन रवीवार,मंगळवार व शुक्रवार व पोर्णिमेला तुळजाभवानी मंदीर पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.तुळजाभवानी मंदीरातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवुन मंदीर संस्थानने मंगळवार,शुक्रवार व रवीवार व पोर्णिमेला मंदीर 1 वाजता उघडण्याचा निर्णय यापुर्वी घेतला होता.माञ मागील काही दिवसात लग्नसराई संपल्याने तसेच शाळा महाविद्यालये चालु झाल्यानंतर भाविकांची संख्या कमी झाली आहे.त्यामूळे मंदीर पहाटे एक ऐवजी 4 वाजता घडण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन आरआयचे निलंबन

यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली राजस्व अभियान, फेरफार प्रलंबित आधी मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची चांगली झाडाझडती घेतली तसेच दिग्रस आणि उमरखेड येथील मंडळ अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर काढत निलंबनाचे आदेश दिले कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोकाॅज बजावा असे निर्देश एचडीपीओंना दिले त्यामुळे महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जयंत पाटील यांचे अजित पवार गटात स्वागत होईल - संग्राम जगताप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असायची...

मात्र ते प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते थांबले... जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं बोललं जायचं...

अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा...

ते वेगळ्या पक्षात जातील अशीही चर्चा सुरू असल्याबाबत संग्राम जगताप यांना विचारले असता ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील असं आमदार जगताप यांनी म्हंटले आहे.

Tiruvallur Railway Station: तिरुवल्लर रेल्वे स्टेशनवर अग्नीतांडव, मालगाडीला भीषण आग

तिरुवल्लूर स्थानकावर डिझेल भरलेल्या मालगाडीच्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली.

आग लागल्यानंतर परिसरातील रहिवाशांना तातडीने हलवले गेले असून, आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही.

खडकवासला धरणसाखळीत २१.०१ टीएमसी पाणी

जुलैचे जवळ जवळ वीस दिवस बाकी असताना पुणेकरांच्या वर्षाच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मे पासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा २१ टीएमसी (७० टक्के) वर गेला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात प्रथमच पुणेकरांची पाणी चिंता मिटली आहे.

मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.३५ टीएमसी होता.यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल तीन पट अधिक पाणीसाठा आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत ५ टीएमसी पाणी सोडले आहे.

खडकवासला १.१५ टीएमसी

पानशेत ७.५७ टीएमसी

वरसगाव ९.८३ टीएमसी

टेमघर २.४६ टीएमसी

Nanded: रुग्णवाहिका न पोहोचल्याने गर्भवती महिलेचा ऑटोतून प्रवास

रुग्णालयाला जाण्यापूर्वीच रस्त्यातच आईने दिला मुलाला जन्म.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मेथी गावातील घटना.

आई आश्विन नालापले व नवजात बालक सुखरूप.

108 वर फोन करूनही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नसल्याची नातेवाईकाचा आरोप

यवतमाळात शिवसेना ठाकरे गटांचा पदाधिकारी मेळावा

आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची सत्ता कोणत्याही परिस्थितीत आली पाहिजे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्व शिवसैनिकांनी आप आपल्या स्तरावर संवाद यात्रा सुरू करा असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले. यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला यामध्ये सावंत बोलत होते.

अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर

पहाटे सहा पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत, रस्त्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला..., अजित पवारांनी दिलाय, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलंय...

शेतकरी-शेतमजुरांच्या अनोख्या स्वागतामुळे बच्चू कडू भावुक

माजीमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यामागणीसाठी देशाचे पहिले कृषीमंत्री डाॅक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी ते देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या चिलगव्हाण अशी कडू सातबारा कोरा पदयात्रा काढताहेत.

सध्या कडू हे महागांव तालुक्यातील काळीदौलत इथे दाखल झाले असून उद्या या यात्रेची सांगता होणार आहे.

यानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील हे येणार असल्याची माहिती बच्चू कडूंनी दिलीये.

दरम्यान बच्चू कडू यांना शेतकरी आणि शेतमजुरांनी दिलेलं अनोखं स्वागत पाहून स्वतः बच्चू कडूही क्षणभर भावुक झाले होते.

Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये रिक्षा चालकावर मिरची स्प्रे फवारत मारहाण; आरोपी फरार

उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकावर मिरची स्प्रे फवारून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गणेश सकपाळ असे जखमी चालकाचे नाव असून ते कॅम्प ४ मधील मराठा विभागात राहतात.

सोमवारी पहाटे ते स्थानकाजवळ रिक्षा रांगेत थांबले असताना अचानक डोळ्यांत मिरची स्प्रे जाण्यामुळे त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे चौकशी केली.

तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत "मिरची स्प्रे मीच मारला" असे म्हणत वाद घालू लागला. काही क्षणातच त्याने सकपाळ यांच्या डोळ्यांत मिरची फवारली आणि हातातील स्टील कड्याने डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण केली.

Ambernath: अंबरनाथ शिवगंगा नगरमध्ये दरोडा; वृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला

अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगरमधील जय शिवश्रद्धा इमारतीत शनिवारी रात्री हेल्मेट घालून आलेल्या दरोडेखोराने वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा टाकला.

आरोपीने घरात शिरताच वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन वेळा प्रहार केला, तर मदतीस आलेल्या शेजारील महिलेच्या डोक्यात बाटली फोडून दोघांनाही गंभीर जखमी केलं.

त्यानंतर घरातील सोनंनाणं लुटून आरोपी पसार झाला.

जखमी वृद्ध गणेश गायकवाड यास उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

क्राईम ब्रँचकडूनही समांतर तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी गोरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com