Maharashtra News Live Update: गणेशोत्सवामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा- केसरकर

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाची आज रूपरेषा ठरणार, राज्यात गणरायाच्या आगमनाची तयारी, आजपासून पावसाचा जोर वाढणार, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

गणेशोत्सवामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा- केसरकर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाच्या तारखांचा पुनर्विचार करावा, अशी हात जोडून विनंती आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचा, विशेषतः मुंबईचा मोठा आणि भावनिक सण आहे. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि लाखो गणेशभक्तांचा उत्साह अबाधित राहावा, यासाठी आंदोलन पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे आवाहन केसरकर यांनी केले.

हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसाची हजेरी

हिंगोलीच्या वसमत शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे तब्बल 25 दिवसानंतर पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण समाधानी झाले आहेत मात्र शेतातील अनेक पिके पूर्णतः सुकून गेल्यामुळे या पावसाचा पिकांना कोणताही परिणाम होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत मात्र या पावसामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं नागरिक सांगत आहे

पुण्यात भरधाव कारनं धावाऱ्याला उडवलं, अपघातात इंजिनियरचा मृत्यू

कारने दिलेल्या धडकेत धावण्याचा करणार्या विरेंद्र द्विवेदी या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झालाय. पुण्यातील पाषाण - बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डन जवळ ही घटना घडलीय. ज्या कारने द्विवेदी यांना घडवलं त्याच कारमधून त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते.

हिंगोलीच्या डिग्रस गावात भर दुष्काळात पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी नाच गाण्यांवर थिरकल्या तमाशातील महिला

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असताना हिंगोलीच्या दिग्रस गावामध्ये हुल्लडबाज तरुणांनी चक्क बैलांच्या पुढे नाच गाणे कार्यक्रम आयोजित करत महिलांना ट्रॅक्टर वर उभे करून डान्स करायला लावण्याचा प्रकार पुढे आला आहे, गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना याची माहिती देत हा नाच गाण्याचा कार्यक्रम बंद पडला आहे, हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येने सगळीकडे दुःखद वातावरण असताना व जिल्हाभरात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली असताना अशा प्रकारचा नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याने, सर्व स्तरातून टीका होत आहे

मागील 12 तासांपासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले गणेशभक्तांचे मुंबई गोवा महामार्गावर मेगा हाल झाले आहे. मागील बारा तासां पासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या मार्गावर माणगाव, इंदापुर आणि नागोठणे येथे वाहनांच्या लांबच लाब रांगा पहायला मिळत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा दस्तुरखुद्द गणरायाला फटका

आठ तास वाहतूक कोंडीत आडकले गणपती बाप्पा

० रायगडच्या पेण येथून दापोलीकडे गणेशमूर्ती घेऊन निघालेली गाडी वाहतुक कोंडीत आडकली

० पेण ते माणगाव या दिड तासांचे अंतर कापण्यासाठी वाहतुक कोंडीत लागले सात तास

विलास घुले खून प्रकरण खासदार पुत्राला अटक करा या मागणीसाठी टायर पेटवून आंदोलकांकडून निषेध

* बीडच्या टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला 80 दिवस उलटलेत.

* पुरवणी जबाबाबत खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचं नाव घेण्यात आलं.

• तब्बल 5 तासापासून अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको सुरू

* रास्ता रोको ची प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आंदोलन आक्रमक टायर पेटवून केला निषेध

* याच दरम्यान महिला आंदोलकात आणि महिला पोलिसात बाचाबाची

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांची गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या फुलांना आणि पूजेच्या साहित्याला मोठी मागणी वाढली असून त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. झेंडू, गुलाब, शेवंती यांसह विविध फुलांचे भाव वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तसेच हार, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.दुसरीकडे, वाढलेल्या दरांची पर्वा न करता पुणेकर उत्साहाने खरेदी करत असून बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच गर्दी होत आहे. पुढील काही दिवसांत खरेदीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने बाजारपेठा गणेशोत्सवाच्या उत्साहाने फुलल्या आहेत

नंदुरबारमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी..

गणरायांच्या आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना नंदुरबार शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू,आकर्षक मखर, पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली आहे.

शहरात ठिकठिकाणी नवीन दुकाने थाटण्यात आली असून,सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी बच्चेकंपनीसह सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या उत्सवी वातावरणामुळे नंदुरबारमधील बाजारपेठांमध्ये चैतन्य पसरले असून व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

चाकणमध्ये बसची दुचाकीला भीषण धडक

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमध्ये बस ने समोरुन येणा-या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नी आणि दोन मुलांना बसने धडक दिल्याचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

अमरावतीत एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश

अमरावतीच्या वाघोली गावामध्ये एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश....

सर्पदंशामुळे 9 वर्षीय चिमुकल्या पवन चव्हाण या मुलाचा मृत्यू..तर त्याची बहीण 6 वर्षीय परि चव्हाण या चिमुकल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती गंभीर..

Nashik: नाशिकमध्ये स्कूलबसचा ब्रेक फेल, विद्यार्थी सुखरूप

नाशिक -

- रामवाडीतील बायजाबाईच्या छावणी वळणावर स्कूलबसचा ब्रेक फेल

- ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस गोदापार्कजवळील पत्र्याच्या शेडमध्ये वळवली

- बस शेडमध्ये घुसल्याने मोठा अपघात टळला

- बसमध्ये असलेली ७ ते ८ मूकबधिर मुले सुखरूप

Dhule: धुळे जिल्ह्यातील २०० बसेस कोकणात पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल

धुळे -

-गणपती बाप्पाच्या आगमनासाठी धुळे जिल्ह्यातील तब्बल २०० बसेस कोकणात पाठवण्यात आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल

- तीन- तीन तास वाट बघून देखील नसल्याने वृद्धांसह महिला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल

- धुळे जिल्ह्यात एसटी प्रशासनाच्या तब्बल सव्वाचारशे बसेस असून त्यापैकी 200 बसेस या कोकणात पाठविण्यात आल्यामुळे बहुतांश बसेसच्या फेऱ्या करण्यात आल्या रद्द

Nagpur: पुढील 24 तासांसाठी चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळला पावसाचा ऑरेंज अलर्ट

- दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपुरात आज दुपारी अडीचनंतर पावसाला सुरुवात झाली

- यंदाच्या मोसमात नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची मोठी तूट आहे.

- त्यामुळे आज झालेल्या पावसामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला

- दरम्यान पुढील 24 तासासाठी चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- तर उर्वरित विदर्भातही पावसाचा येलो अलर्ट आहे

Nagpur: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांची सुटका 

नागपूर -

- नागपूर शहरातील काही भागात पावसाला सुरुवात

- काल दुपारीही नागपुरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या

- प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला होता

- त्यानुसार शहरात पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला

- पाऊस समाधानकारक झाल्यास पिकांना काहीसा दिलासा मिळून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

Nanded: दीड महिन्यांनंतर नांदेडमध्ये पावसाला सुरूवात

नांदेड -

तब्बल दीड महिन्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण झाली.

आज सकाळ पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

दुपारी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

नांदेडच्या किनवट, माहुर , हिमायतनगर , लोहा , कंधार आणि बिलोली तालुक्यात हलका पाऊस झाला.

नांदेड शहरात ही तुरळक पाऊस झाला.अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

१५ सप्टेंबरला मुंबईकडे निघणार - जरांगे

15 सप्टेंबरपासून जरांगेंचा मुंबईचा दौरा सुरु

१९ सप्टेंबरला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन

अहिल्यानगर शहरात पावसाचे आगमन 

अहिल्यानगर शहरात पावसाचे आगमन

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात

हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे

अचानक आलेल्या पावसामुळे नगरकरांची धावपळ...

पावसापासून वाचवासाठी नागरिकांची उड्डाणपुलाखाली प्रचंड गर्दी.

गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवलीतील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; वाढीव टँकरची व्यवस्था

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केडीएमसीच्या महासभेत नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सव काळात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात आली. एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्याचा प्रेशर वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वाढीव टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा, चार आरोपी जेरबंद

समृद्धी महामार्गावर कोपरगाव हद्दीत चाकूचा धाक दाखवत आयशर चालकाला लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय.. 150 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना जेरबंद केलंय..

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा फटका

पुणे-बेंगलोरलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा परिसरात सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

- मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

- मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा

- शांग्रीलाजवळ समृद्धी महामार्ग इंटरचेंजजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

- वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप

- वाहतूक कोंडीत छोटे-मोठे अनेक वाहने अडकली

- गणपती उत्सवासाठी घरी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका

- महामार्गावर वाहनांचा वेग मंदावल्याने प्रवाशांची गैरसोय

अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील उपस्थित असून ते मराठा समाजाला संबोधित करत आहेत. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलनाची नेमकी कोणती तारीख जाहीर करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीती याबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरड्या दुष्काळाचा पहिला बळी ठरलेल्या महिला शेतकरी कमलबाई कांदे यांच्या घरी अंबादास दानवे जाणार

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील महिला शेतकरी कमलबाई कांदे यांनी कोरड्या दुष्काळामुळे पीक सुकल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. घटनेला दोन दिवस उलटूनही शासनाचा सक्षम अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीस न आल्याने आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे त्यांच्या घरी भेट देणार आहेत.

भर पावसात ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; अंबादास दानवेंची सरकारवर जोरदार टीका 

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिवसेनेने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले. यावेळी “हिंगोलीचा विकास तुमसे ना हो पायेगा” असा नारा देत दानवेंनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या दाव्याने कुटुंबीय संतप्त; ऑनलाइन बेटिंगच्या कर्जाचा दावा फेटाळला

पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख याने आत्महत्या केली होती.
ऑनलाइन बेटिंगच्या सवयीमुळे प्रथमेशवर सुमारे 4 लाख रुपयांचे कर्ज झाले आणि त्याच विवंचनेतून आत्महत्या केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

बुलढाण्यात वाळू माफियांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! 4 टिप्पर जप्त; तब्बल 1.10 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ४ टिप्पर आणि १४ ब्रास वाळू जप्त केली. ११ सप्टेंबर रोजी अंधेरा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करून ही कारवाई केली.नारायणखेड शिवारातून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

सव्वा महिन्यापासून पाऊस गायब; पिकं सुकली, खरीप हंगाम धोक्यात! वाशिममध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली

वाशिम जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठं संकट ओढावलं आहे. पाऊस नसल्याने सोयाबीनसह इतर पिकं सुकू लागली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

मुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना; दुष्काळ आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री रामगिरी निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना होऊन आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सांगलीत विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोल? काडीपेटी ओढताच भडका उडाल्याचा दावा

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे शेतकऱ्याच्या विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य द्रव आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विहिरीच्या पाण्याला गेल्या वर्षभरापासून उग्र पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ओझरच्या विघ्नहराची द्वारयात्रा भक्तिभावात सुरू

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहराची भाद्रपद द्वारयात्रा आज मोठ्या भक्तिभावात सुरू झाली. पालखीत विराजमान झालेला गणराय आपल्या बहिणींना निमंत्रण देण्यासाठी मार्गस्थ झाला. या यात्रेत हजारो भाविक अनवाणी सहभागी झाले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या द्वारयात्रेचे भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातून गावाकडे निघालेले असंख्य गणेशभक्त व चाकरमानी ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या कोंडीचा मोठा फटका गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसत असून प्रवासाचा वेळ वाढला आहे.

मराठा आरक्षणासाठी पती जलकुंभावर, पत्नीचे जमिनीवर उपोषण; कळमनुरीत पती-पत्नीचे आंदोलन 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पूयना गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पती-पत्नी आणि गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. लक्ष्मण टवले जलकुंभावर चढून उपोषण करत असून, त्यांच्या पत्नी शीलाबाई टवले यांनी जमिनीवर उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा जलकुंभावरून उतरणार नसल्याचा आंदोलकांचा पवित्रा आहे.

मनोज जरंगे यांचा प्रकृतीचा विचार केला तर त्यांना हे उपोषण झेपणारे नाही - विनायक राऊत , माजी खासदार

रत्नागिरी येथे बोलताना विनायक राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार केला, तर त्यांना आता हे उपोषण झेपणारे नाही. सातत्याने केलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अजिबात योग्य नाही," असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी जरांगे यांनी सरकारच्या नादी लागू नये, असा सल्ला दिला तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारचीच आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यासोबतच, "मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सणामध्ये विघ्न आणण्याचा प्रश्नच येत नाही," असे सांगत त्यांनी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

सोलापूरसह राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वराज्यसंग्राम संघटनेची सरकारकडे मागणी

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्वराज्यसंग्राम संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील चार-पाच जिल्हे वगळता बहुतांश भागात खरीप हंगाम वाया गेला असल्याचा दावा संघटनेने केला आहे.पावसाअभावी शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं असून,सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील ऊस,फळबागांसह इतर पिकंही संकटात सापडली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात यंदा कोणतंही पीक शिल्लक राहते की नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं स्वराज्यसंग्राम संघटनेचे म्हणणं आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी राज्य सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

० माणगाव आणि इंदापूर जवळ झाली आहे वाहन कोंडी

० गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकण वासियांना वाहतूक कोंडीचा फटका

० महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या

० महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात

० वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली “मोदी एक्स्प्रेस” सिंधुदुर्गात दाखल

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुंबईकर कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी “मोदी एक्सप्रेस” शुक्रवारी रात्री ११.३० वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाली. मागील १४ वर्षे अविरतपणे मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने मुंबईकर कोकणवासीय गणेशभक्तांना ही प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोकण रेल्वेवर चालविण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमुळे हजारो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला आहे.

मिरजेत रंगला देवाभाऊ चषक दहीहंडी सोहळा, अभिनेता चंकी पांडे यांनी लावली उपस्थिती

सांगलीच्या मिरजेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीची देवभाऊ चषक दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी सोहळा पार पडला.दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने सिने अभिनेते चंकी पांडे,अभिनेत्री मानसी नाईक,अभिनेत्री नेहा खान आणि पॉप सिंगर संजय राठोड यांनी आपल्या बहारदार अदाकारी सादर करत उपस्थितांची मने जिंकली केली.

Maharashtra News Live Update:नांदेड जिल्ह्यात भीषण दुष्काळ, दुष्काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून संताप

नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. नांदेड दक्षिणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या वतीने हिंगोली गेट परिसरात भव्य दहीहंडी ‘आनंद उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचे आयोजन करून पैश्यांची उधळपट्टी केल्याने संताप व्यक्त केला जातोय. एकीकडे सोयाबीन आणि कापूस पिके पावसाअभावी वाळत असताना शेतकरी कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.

एक वर्षानंतर माधुरीचा मायभूमीत जल्लोषात प्रवेश!

ज्या क्षणाची नांदणी आणि पंचक्रोशीतील हजारो माधुरीप्रेमी तब्बल वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत होते... तो क्षण अखेर आला...! गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आलेली नांदणी जैन मठाची लाडकी हत्तीण माधुरी तब्बल एका वर्षानंतर पुन्हा आपल्या मायभूमीत परतली आहे... मध्यरात्री तब्बल दोन वाजता माधुरीने नांदणीच्या भूमीत पाऊल ठेवलं आणि तिच्या स्वागतासाठी रात्रभर जागलेल्या हजारो नागरिकांनी एकच जल्लोष केला... ढोल-ताशांचा गजर... फटाक्यांची आतषबाजी... जयघोष... आणि माधुरीच्या आवडीच्या फळांनी सजवलेली आरास... अशा भावनिक वातावरणात माधुरीचं नांदणीत पुनरागमन झालं...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पनवेलच्या वाहतूक कोंडीचा फटका; पळस्पे पुलावर अवजड वाहनांच्या तीन रांगा

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या वाढताच, पनवेलमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पाहायला मिळाले. जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहने तब्बल तीन रांगांमध्ये उभी राहिल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या कोंडीचा फटका पुलापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांना बसला.

मनोज जरांगे आज मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार; अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. "सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीतील या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे मुंबई आंदोलनाची कोणती तारीख जाहीर करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com