Maharashtra Ladki Bahin beneficiaries payment issue : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून प्रति महिन १५०० रूपयांचे मानधन दिले जाते. लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय. काही दिवसांत जानेवारी महिन्याचे १५०० रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण ई केवायसीची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा १५०० रूपयांचा लाभ बंद झाला. लाडक्या बहिणींचे १५०० रूपये बंद झाल्यानंतर राज्यातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण असल्याची परिस्थिती समोर आली आहे. वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारलाय. ५ तालुक्यातील महिलांनी आपला संताप सरकारी कार्यालयात व्यक्त केलाय. जोपर्यंत योजनेचा लाभ सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्रा महिलांना घेतलाय.
हिंगोलीत लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने महिलांनी सरकारच्या विरोधात यल्गार पुकारला आहे. निवडणुकीनंतर सरकारची लाडकी बहीण दोडकी झाली का? असा प्रश्न या लाडक्या बहिणी विचारत आहेत. दरम्यान हिंगोलीच्या सेनगाव औंढा ,कळमनुरी ,वसमत, आणि हिंगोली अशा पाचही तालुक्यातून शेकडो लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या आहेत. जोपर्यंत शासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री आमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. दरम्यान हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी या महिलांच्या भेटीसाठी पोहोचले असून या समजूत काढत आहेत.
हिंगोलीशिवाय वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचाही उद्रेक समोर आलाय. वाशिम जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. ई केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे संतप्त महिला आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. सर्वच लाडक्या बहिणी योजनेत ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा, असा संताप महिलांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे. गेल्या दोन महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला? याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.. बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या, मात्र ई केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30 हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे.. ई केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे, त्यामुळे ई केवायसी मधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वर्षवयोगटातील महिलांना दीड हजार रुपये महिना देण्यात येत आहे. या योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेत सरकारी नोकरदार, चारचाकी, टॅक्सचा भरणा करणार्या तसेच एकाच कुटुंबातील तीनपेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केली होती. ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. तर काही महिलांनी केवायसीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला. परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही. यामध्ये केवायसी पूर्ण करणार्या बहुतांश महिलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे संतप्त महिला दैनंदिन महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहे. लाभ बंद करण्यात आल्याची कारणमीमांसा उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांना केल्या जात आहे. केवायसी पूर्ण झाल्याचे ऑनलाइन दिसत आहे. तरीसुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. शेवटी महिला व बालकल्याण विभागाने केवायसीची लिंक पुन्हा चालू करावी, असे पत्र पाठविले आहे. या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.