राज्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा ८५.७९ टक्के झाला
कोकण आणि पुणे विभागातील धरणं जवळपास तुडुंब भरली
लघु प्रकल्पांमध्ये ५७ टक्के साठा उपलब्ध
पुढील पावसामुळे विसर्गाची शक्यता, प्रशासन सतर्क
राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला असून राज्यातील एकूण धरणांचा साठा ८५.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मोठ्या धरणांमध्ये ९३.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.८३ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये ५७.१८ टक्के साठा आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यातील समाधानकारक पावसाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, पाणीपुरवठा, सिंचन आणि शेतीसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
धरणांच्या पाणीसाठ्याच्या बाबतीत कोकण विभागाने यंदाही आघाडी घेतली आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये तब्बल ९२.५५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागात ९१.४९ टक्के, नाशिक विभागात ७९.३२ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८१.१० टक्के, अमरावती विभागात ८४.९७ टक्के आणि नागपूर विभागात ७७.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
यामध्ये नागपूर विभागातील मोठ्या धरणांत ७६.७५ टक्के साठा असून, उर्वरित सर्व विभागांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठले आहे. पुणे आणि कोकण विभागातील धरणे तब्बल ९७ टक्क्यांपर्यंत भरली आहेत, तर नाशिकमध्ये ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९४ टक्के आणि अमरावती विभागात ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तथापि, राज्यात एकूण २५९९ लघु प्रकल्प असून त्यांमध्ये फक्त ५७.१८ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. या प्रकल्पांचा एकूण साठा ३९४८ दलघमी इतका आहे. विशेष म्हणजे, नाशिक आणि पुणे विभागातील लघु प्रकल्पांचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खालीच आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी स्पष्ट केले की, लघु प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता मर्यादित असते आणि हे प्रकल्प बहुतेक वेळा पर्जन्यछायेतील, दुष्काळी किंवा कमी पावसाच्या भागात उभारलेले असतात. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मोठ्या व मध्यम धरणांच्या तुलनेत साठा कमी होणे स्वाभाविक आहे.
शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लघु प्रकल्पांना विशेष महत्त्व असते. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा होत नाही आणि याचा फटका थेट शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो. याउलट मोठे प्रकल्प हे मोठ्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात असल्याने ते लवकर आणि जास्त प्रमाणात भरतात. यंदा मोठ्या धरणांच्या समाधानकारक भरतीमुळे पुढील काही महिने पाणीटंचाईची भीती नाही, मात्र लघु प्रकल्पांच्या अपुऱ्या साठ्यामुळे स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठ्याचे आव्हान कायम राहणार आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने धरणांचा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आता धरणांतून होणाऱ्या विसर्गाची योग्य ती तयारी करत आहे. विशेषतः कोकण, पुणे आणि नाशिकला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणांचा साठा चांगला झाल्यामुळे आगामी काळात शेती, पाणीपुरवठा आणि वीज उत्पादनासाठी पुरेशा संसाधनांची उपलब्धता होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.