मुंबई : कोरोनाच्या कटू आठवणी आजही ताज्या असताना आता तीन व्हायरसनं तीन राज्यांमध्ये धुमाकूळ घातलाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं धसका घेतलाय. महाराष्ट्रात झिका व्हायरस, केरळमधील निपाह आणि गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा उद्रेक झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. साथीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणू वेगानं पसरत आहे. हा व्हायरस लहान मुलांच्या मेंदूवर हल्ला करतोय. आतापर्यंत 71 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील 23 जिल्ह्यांमध्ये या विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हायरस राजस्थानमध्येही हातपाय पसरु लागला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात झिकानं कहर केला आहे. पुणे शहरात 20 जून रोजी झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता. महिनाभरात ही संख्या 32 वर पोहचली आहे. त्यापैकी 11 महिला गर्भवती आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून झाली आहे.
केरळमध्ये निपाह व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. यातल्या एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या मुलाला तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम होता. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवलेल्या नमुन्यात निपाह व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. सध्या या 14 वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या सात जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. यामुळेच याला 'झुनोटिक व्हायरस' असेही म्हणतात. निपाह व्हायरसचा उद्रेक आशियातील काही भागांमध्ये प्रामुख्याने बांगलादेश आणि भारतामध्ये दिसून येतो. 1999 मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला. जेथे मलेशिया आणि सिंगापूरमध्ये या विषाणूमुळे 100 लोकांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता संबधित राज्यांना सार्वजनिक आरोग्य उपायांची तात्काळ कडक अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. यंत्रणा सतर्क आहेच. पण नागरीकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.