Marathi News Live Updates: खिचडी खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, कंधार तालुक्यातील आश्रम शाळेतील घटना

Maharashtra News Live Updates : आज मंगळवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट एका क्लिकवर वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Nanded :  खिचडी खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, कंधार तालुक्यातील आश्रम शाळेतील घटना

खिचडी खाल्याने विध्यार्थ्यांना विष बाधा झालीय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील नेहरूनगर आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे.दुपारी मध्यन्न भोजन म्हणून विध्यार्थ्यांना खिचडी खाण्यास दिली होती. खिचडी खाल्याने काही वेळात या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना चक्कर,मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. शाळेत 12 विद्यार्थ्यांना याचा त्रास सुरू झाल्याने कंधार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. परंतु यातील तीन ते चार विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Nomadic Tribe राज्यातील भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश, उत्तर ठेलारी समाजाला न्याय

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार यापुढे " ठेलारी" ही जात 'भटक्या जमाती (ब)' यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून 'भटक्या जमाती (क)' यादीतील अ.क्र.२९ मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. १८२ मधील माळी, बागवान, राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासनादेश आज निर्गमित करण्यात आला आहे.

Latur Politics:  माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरानी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज आणि उद्या लातूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते आज लातूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी आहेत. यावेळी माजी आमदार तथा भाजपा किसान मोर्चाचे गोवा आणि गुजरातचे प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवर सध्या लातूरमध्ये अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

CM Shinde:   मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं उद्या प्रकाशन

गडकरी रंगायतन येथे उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्या दुपारी २ ते रात्री १० असे ८ तास वाहतुकीत बदल करण्यात आलेत. गडकरी परिसरात पार्किंगला बंदी असून राममारूती रोड,पु.ना.गाडगीळ, डॉ. मूस चौक, तलावपाळी रंगो बापुजी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आलाय.

Uddhav Thackeray:  उद्धव ठाकरे उद्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार

उद्धव ठाकरे उद्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. उद्या सायंकाळी ५.३० वाजता काँग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के सी वेणुगोपाल यांची घेणार भेट आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणार बैठक

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी २१ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला ३ आठवड्यात उत्तर सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत

Mira Bhayandar News : टँकरखाली चिरडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

दुचाकी वरील ताबा सुटल्याने टँकर खाली चिरडून एका महिलांचा मृत्यू झाल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे. याबाबत गुन्हाची नोंद करून आरोपी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai Traffic : पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वांद्रे कलानगर मार्गावर वाहनांच्या रांगा

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून जोगेश्वरीहून वांद्रे कलानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोगेश्वरी ते विलेपार्ले दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सायंकाळची वेळ असल्याने घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग मात्र वाहतूक कोंडीमुळे घरी जाण्यास होतोय उशीर होत आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या महत्वाकांक्षी नार-पार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा?

छगन भुजबळ यांच्या महत्वाकांक्षी नार पार नदी जोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा, सूत्रांची माहिती आहे. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रातच अडवण्यासाठी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. केंद्राने नकार दिला तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार आहे. नाशिक, मराठवाडा आणि खानदेशाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

Nana Patole : राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा, नाना पटोले यांची मागणी

तेलंगणा सरकारने जसं शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं तसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच सरसकट कर्जमाफी करावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, मात्र सरकारी अधिकारी व्यवस्थित पंचनामा करत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Zika Virus : पुणे शहरात २६ गर्भवती महिलांना झिकाची लागण

पुणे शहरात मागच्या महिन्यापासून झिकाचा धोका वाढला आहे. आत्ता पर्यंत शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण झाले असून यात 26 गर्भवती महिलांना देखील झिका विषाणूची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना राजकीय महत्त्वाकांक्षा, भोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं, दरेकरांचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी भोळ्या भाबड्या मराठा समाजाचं समर्थन मिळवलं. त्यांच्या पोटात जी राजकीय महत्वाकांक्षा होती ती आता समोर आली आहे. यापूर्वी मूकमोर्चा झाले कुठलाही नेता त्यावेळी नव्हता. मराठा समाजाने एक विश्वास टाकला होता त्याला ठेच पोहोचवू नका. केवळ विधान सभे पुरता प्रश्न धगधगत ठेवायचा हा त्यांचा हेतू आहे, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.

Buldhana News: प्रकाश आंबेडकर यांची बुलढाण्यात सभा 

एससी एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त बुलढाणा येथे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्यासह् जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आरक्षण बचाव सभेला जिल्ह्याभरातून असंख्य ओबीसी बांधव एस सी एस टी चे शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.

Lal Krrishna Advani Admitted In Apollo Hospital: ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात अडवाणी यांना दाखल केले आहे. सध्या त्यांची तब्बेत स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

. Ramdas Athawale: 'राज ठाकरे यांच्या उमेदवारांवर बहिष्कार घाला', केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आरक्षणाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका राज ठाकरे यांनी बदलावी. आरक्षणाची गरज नाही असे त्यांनी केलेले चुकीचे विधान मागे घ्यावे. त्यांनी जर आरक्षणविरोधी भूमिका कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसी बहुजनांनी बहिष्कार घालावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

राज ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा घेतला आढावा. धाराशिव जिल्ह्यातील पक्ष संघटना बांधणी बाबत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची . माहितीविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचणी करण्याकरिता दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत ठाकरे

Pune News: मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरात चोऱ्या करत होता. आरोपीकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केलाय.

Pune News: अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यात दरड कोसळली 

अतिवृष्टीत मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे डोंगरातील दरड कोसळून हॉटेल पिकनिक पॉईंट दगड, मातीत गाडले गेले होते. या दुर्घटनेत शिवाजी बहिरट या युवकाचा दुर्दैवी मृत्‍यु झाला होता. त्यांच्या कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला शिवाजी हा त्‍यांच्‍या बहिरट कुटूंबातील कर्ता होता.

Supreme Court: शैक्षणिक संस्थांमध्ये बुरखा घालण्याचा वाद पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात  

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आलीय. मुंबईतील आचार्य कॉलेज आणि मराठे कॉलेज यांनी हिजाब, बुरखा, स्टोल आणि टोपी घालण्यावर बंदी घातली आहे.

Nanded News: नांदेडमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

नांदेड जिल्ह्यात गतवर्षी 11 लाख 98 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता.अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण अजूनही काही शेतकरी पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. एकाच गट नंबर मधील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम जास्त मिळाली तर दुसऱ्या शेतकऱ्याला कमी पैसे मिळाले . पिक विमा कंपनी अंदाजित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पिक विमा मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Pune News: पुण्यात २४ ऑगस्टला संविधान सन्मान सभा

पुण्यात २४ ऑगस्टला संविधान सन्मान सभा आयोजित केलीय. बालगंधर्व रंगमंदिरात सभा होणार आहे. सभेला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये डान्सबारवर पुन्हा एकदा हातोडा

उल्हासनगरमध्ये डान्सबारवर तोडक कारवाई करण्यात येत आहे. कॅम्प क्रमांक तीन येथील वर्षा बारवर कारवाई केली जातेय. डान्सबार मालकांनमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झालंय.

Nanded News :  नांदेडमध्ये खदाणीत बुडून चार जणांचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. नांदेड शहरापासून अगदी जवळ असलेल्या झरी गावातील शिवारात ही घटना घडली. झरी गावाच्या शिवारात मोठी खदान आहे. या खदाणीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते. या खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने चार जणांचा खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Chandrapur News: नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार

चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नयनतारा नामक वाघिणीने निमढेला परिसरात एका नाल्यातून पाणी पिण्याआधी तरंगत असलेली प्लास्टिकची बॉटल बाहेर काढली. ही घटना नागपूरच्या छायाचित्रकार दीप काठीकर यांनी कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यांच्या या व्हिडिओला इटलीच्या ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन लीफ पुरस्कार देण्यात आलाय.

Pune News:  पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह विरोधात मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन

पुणे महानगरपलिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मनसेच्या विद्यार्थी संघटनेने पालिकेच्या विरोधात आंदोलन केलंय. सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनावणे या २ विद्यार्थ्यांचा डेंग्यू आणि कावीळने दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Satara News:  साताऱ्यातील पाच जणांची 'एएम टोळी' तडीपार, दोन वर्षासाठी कारवाई

सातारा शहरातील सराईत गुन्हेगार अमीर मुजावर याच्या एएम टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. या पाच जणांवर खून दरोडा खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत बेकायदेशीर जमाव करून मारहाण करणे, बेकायदेशीर शास्त्राचा वापर करणे असे गंभीर गुन्हे साताऱ्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामध्ये टोळीप्रमुख अमीर शेख, अभिजीत भिसे, यश साळुंखे, आमिर मुजावर, आलिम शेख अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Nandurbar: शहादा बसस्थानकाची पावसामुळे दुरावस्था, प्रवाशांना मनस्ताप

शहादा बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे झालेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यातील पाणी, त्यामुळे होणारा चिखल यामुळे प्रवासी अडचणीत आलेले आहेत. खड्ड्यातून साठलेल्या पाण्यात वाट काढत प्रवाशांना बसमध्ये बसण्याची कसरत करावी लागत आहे.

Nashik News: गोदावरीचा पूर ओसरला, घाटावर मोठमोठ्या दगडांचा ढीग

गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरात पुराची भीषणता समोर आलीय. गोदावरीच्या पुराच्या पाण्यात भले मोठे दगड वाहून आलेत. महापालिका प्रशासनाकडून दगड हटवण्याचं आणि स्वच्छतेचे काम सुरू आहे.

Palghar News : पालघरमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला

पालघरमध्ये आदिवासी आश्रम शाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला . जवळपास अडीचशेपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

Pune News: आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही, पुण्यातील पूरग्रस्त भागातील महिला आक्रमक

आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही, पूरग्रस्त महिलांची मुख्यमंत्र्यांना हाक. पुण्यातील पुलाची वाडी या ठिकाणी राहत असलेल्या महिला आक्रमक झाल्यात. पुलाची वाडी या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं होतं. संतप्त महिलांकडून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुलाची वाडी येथील संतप्त महिला रस्त्यावर आल्यात.

NCP Ajit Pawar Group: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, अजित पवारांनी कोर्टाकडे  मागितला वेळ

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ मागितला. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख (मेंशन) कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

Kolhapur News:  कोल्हापुरात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्याला ग्रामस्थांनी कोंडून ठेवलं

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्याला ग्रामस्थांनी कोंडून ठेवलं होतं. पुराच्या परिस्थितीत देखील काम करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. जनावरांचा चारा आणि औषध देण्याचा सूचना तहसीलदारांनी केल्या होत्या. मात्र तहसीलदार गेल्यानंतर काम करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याना गावकऱ्यांनी कोंडून ठेवले.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, खासदारांची घेणार बैठक

उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचणार आहेत. आज दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटातील राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची बैठक होणार आहे.

Manmad News : अंकाई किल्ल्यावर बिबट्याचा मुक्त संचार, पर्यटकांमध्ये घबराट

मनमाड जवळच्या अंकाई किल्ल्यावर सध्या बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून अनेकांना त्यांचे दर्शन झाले आहे,किल्ल्यावर दोन ते तीन बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे,कधी सकाळी तर कधी रात्रीच्या सुमारास बिबटे शिकारीच्या शोधासाठी किल्ल्यावर संचार करीत असतात,सध्या श्रावण महिना सुरू असल्याने किल्ल्यावर अगस्ती ऋषींच्या दर्शनासाठी दर सोमवारी गर्दी होते तर अनेक हौशी पर्यटक व ट्रेकर्स यांची नेहमी ये जा असते,मात्र बिबट्याचे मुक्त संचाराचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे

Jalna News : जालन्यात स्कूलबस आणि पोलिस व्हॅनचा अपघात,

जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये आज सकाळी पोलिसव्हॅन आणि स्कूलबसचा अपघात झालाय. या अपघातात 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर स्कूलबस आणि पोलीसव्हॅनच्या चालकावर देखील खाजगी रुग्णाण्यात उपचार सुरू आहे.

दरम्यान अपघातानंतर स्कूलबस मालकाने स्कुलबस परस्पर अपघातस्थळावरून हलवली आहे. स्कूलबस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी होते का?,स्कूलबसला परमिट होत का ? यासंदर्भात पोलीस आता तपास करत आहेत..

Parbhani News : परभणीत लाडक्या बहिणींनी भरले पावणेतीन लाख अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना राज्य शासनाच्यावतीने प्रतिमाह दीड हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महिला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी करू लागल्या आहेत. आतापर्यंत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावणेतीन लाख अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना अंमलात आणलीय.

ST employees strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल

विविध प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या ९ ऑगस्टपासून संपाची हाक दिली आहे. या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये आढळले स्वाइन फ्लूचे 4 रुग्ण; आरोग्य विभाग सतर्क

छत्रपती संभाजी नगर शहरात मागील आठवड्यात अचानक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच समोर आल्यानंतर आता स्वाइन फ्लूचे देखील 4 रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनासह आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झालाय.

घाटीच्या बाह्य रुग्ण विभागात हे रुग्ण उपचार घेत असून आरोग्य विभागात या रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरातील भीम नगर,आरेफ कॉलनी आणि हर्ष नगर यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हे रूग्ण आढळून आल्याने महापालिकेकडून स्वच्छता राखण्याच आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.

Buldhana News : चिखली मतदारसंघात 56 कोटींचा भ्रष्टाचार, काँग्रेसचा आरोप

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदार संघात पाणंद रस्त्यात 56 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Pandharpur News : पंढरपुरात पाऊस नसतानाही भीमा नदीला आला पूर

पंढरपुरात पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमा नदीला पूर आलाय. सध्या नदी इशारा पातळी वरून दुथडी भरून वाहत आहे. सध्या भीमेत १ लाख १७ हजार इतका विसर्ग आहे. तर अजून १ लाख ७७ हजार क्यूसेकचा विसर्ग पुढील ८ तासात येणार आहे. त्यामुळे पुढील ८ तासात भीमा नदीच्या पाणी पातळीत २ मीटरने वाढ होईल. सध्या ४५० नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अजून दिवसभरात नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com