Marathi News Live Updates : गिरीश महाजन केली नेपाळमधील अपघातातील जखमींची विचारपूस

Maharashtra Breaking News Live Updates : आज गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

गिरीश महाजन केली नेपाळमधील अपघातातील जखमींची विचारपूस

मंत्री गिरीष महाजन यांनी नेपाळ मधील जखमी रुग्णांची ब्रीच कँन्डी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील रुग्णांची विचारपूस केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहाय्यक कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी रुग्णांना ऍडमिट केले.

मोठी बातमी! इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. साखर कारखान्यांना B मोलैसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२३ रोजी घालण्यात बंदी घालण्यात आली होती. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वारंवार बंदी उठवण्याची मागणी केली होती, त्याला यश आलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एसटी महामंडळाला झाला फायदा

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतमुळे एसटी देखील मालामाल झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातून एसटीला ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या बालेवाडी येथील कार्यक्रमाला एसटीने पुण्यातील १३ तालुक्यातुन सुमारे सहा हजार महिलांना कार्यक्रम स्थळी प्रवास घडवला.

Beed News : बीडच्या आष्टीमध्ये मराठा आंदोलकांनी दिले अजित पवारांना निवेदन

बीडच्या आष्टी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आलेल्या अजित पवार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन दिले आहे. आष्टी शहरातील स्नेहभोजन करून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. दरम्यान यावेळी अजित पवारांनी आंदोलकांची टोपी डोक्यावर घातली होती.

Badlapur Case : वामन म्हात्रेंना मोठा धक्का, महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर अपडेट, महिला पत्रकार गैरवर्तन प्रकरण

शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना धक्का

वामन म्हात्रे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मालवण दौऱ्यावर 

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मालवण दौऱ्यावर असणार आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांनी मागितली जनतेची माफी होती. अजित पवार उद्या सकाळी किल्ल्यावर जाऊन स्वत: सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहेत.

Pune News : पुण्यात आढळून आलेल्या 'त्या' मृतदेहाचे गूढ अद्याप कायम

पुण्यात आढळून आलेल्या "त्या" मृतदेहाचे गूढ अद्याप कायम आहे.

२ दिवसांपूर्वी पुण्यातील शिर नसलेला एक मृतदेह मुठा नदीत आढळून आला होता.

महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला होता.

Pune Accident :  रस्त्यावर धावत्या दुचाकीवर पडली झाडाची फांदी, दुचाकीस्वार अपघातातून थोडक्यात बचावला

रस्त्यावर चालत्या दुचाकीवर पडली झाडाची फांदी, सुदैवाने दुचाकीस्वार अपघातात बचावला

दरम्यान हेल्मेट न परिधान करता दुचाकीस्वार भरधाव वेगाने रस्त्यावर जात होता.

दुचाकीस्वार थोडक्यात बचावला फांदी त्याच्या अंगावर न पडता वाहनाच्या पुढच्या चाकावर पडली. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Ajit pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कोल्हापुरात मुक आंदोलन

कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मालवण इथल्या राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणाची उच्चतरीय चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करा, अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आले आहे.

Eknath Shinde : मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. राजकोट किल्ल्यावरील घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. एक वेळा नाही शंभर वेळा माफी मागायला तयार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Pune News: आळंदीतील इंद्रायणी नदीत आणखी एका तरुणीने घेतली उडी

आळंदीतील इंद्रायणी नदीत आणखी एका तरुणीने उडी घेतली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तरुणीने उडी घेतल्यानंतर पाण्यातून वाचवण्यासाठी हाक देत असल्याचं व्हिडिओ पाहायला मिळतेय.

Kolhapur News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कोल्हापुरात मुक आंदोलन

कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मालवण इथल्या राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणाची उच्चतरीय चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करा अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असूर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांच्या हातातील फलक लक्षवेधी होते.

Amravati News: तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक; सरकार विरोधात घोषणाबाजी

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसाने तथा वादळी वाऱ्याने संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जास्त पाऊस झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे,त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर आंदोलन केले.यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात संत्राच्या माळा घालत सरकारचा निषेध नोंदवला, व तहसीलदारांच्या टेबलवर संत्री फेकत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत करण्यची मागणी केली,तातडीने संत्रा गळती बाबद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला.

Sassoon Hospital News: ससूनमधील रुग्णव्यवस्था रामभरोसे; प्रदेश काँग्रेसचे निवेदन

ससून सर्वोपचार रुग्णालयातील एमआरआय मशिन गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील असणाऱ्या ससून शासकीय रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल आणि गैरसोय होत आहे. बंद असणारी एमआरआय मशीन तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रुग्णांना खाजगी रुग्णालयात अथवा लॅबमध्ये जाऊन एमआरआय स्कॅन करण्याचा ‘खर्चिक सल्ला’ रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आमच्याकडे जर पैसे असले असते तर आम्ही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलो असतो का? तसेच वीस दिवसांपासून मशीन आहे ती दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल रुग्णांनी उपस्थित केला.

Mira Bhayander News: वरसावे खाडीत महिलेने घेतली उडी, शोध सुरु

वरसावे खाडीत एका महिलेने उडी घेतली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी पतीची देखील उडी घेतली असून या घटनेत पत्नी बुडाली असून पतीला बाहेर काढण्यात यश आले आहे. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शशिकला यादव वय वर्षे २८ तर दिनेश यादव वय वर्षे ३२ अशी दोघांची नावे आहेत.

Pune News: मालवण घटनेचा निषेध, ठाकरे गटाकडून छत्रपतींच्या  पुतळ्याला दुग्धाभिषेक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी निकृष्ठ पद्धतीने केल्यामुळे पुतळा कोसळला. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पिंपरी वाघेरे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहांसनास्थ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे . केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यामुळे, केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निषेध नोंदविला आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली आहे.

Nitesh Rane News: आमच्या राष्ट्रांमध्ये पहिला हिंदूंची काळजी घेतली जाणार आणि त्यांना प्राधान्य दिले जाणार.

हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. आमच्या राष्ट्रांमध्ये पहिला हिंदूंची काळजी घेतली जाणार आणि त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्वतःची काळजी असेल तर आमच्या विरोधात कुठलाही अधिकारी जाईल सरकार आमचं आहे. आमचे हिंदूवर अन्याय केला तर 24 तासात तू राहणार नाहीस. माझे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळी सर्वात जास्त धडे देणारा त्यांचा मुलगा आहे मी नितेश राणे लक्षात ठेवा, असे नितेश राणे म्हणालेत. सांगलीमध्ये ते बोलत होते.

Hingoli News: गैरसमजातून तलाठ्याची हत्या, हिंगोली हत्या प्रकरणात मोठी अपडेट 

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात महसूल प्रशासनातील तलाठ्याचा धारधार चाकूने पोटात व छातीत वार करून खून करण्यात आल्याची घटना काल दुपारी घडली होती, संतोष पवार असं खून झालेल्या या तलाठ्याचं नाव होतं आता

या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रताप कराळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे दरम्यान पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून खून करणाऱ्या आरोपीच्या कोणत्याही शासकीय कामाची मयत तलाठी संतोष पवार यांच्या कडून अडवणूक झाली नव्हती, कोणतेही शासकीय काम देखील नव्हते मात्र माथेफिरू आरोपीने

गैरसमजुतीतून तलाठी संतोष पवार यांच्यासोबत वाद घालत त्यांचा खून केला आहे

Pune News: नारायण राणेंना राष्ट्रवादीचा घरचा आहेर, रुपाली ठोंबरेंनी केली टीका 

नारायण राणे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी पोलिसांशी, माध्यमांशी अरेरावी केली हे चुकीचं आहे. त्यांचे पूर्वीचे जे काही राजकीय मनभेद आहेत पण कट्टर शत्रुत्व त्यांनी घेऊ नये, असा घरचा आहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे वेदनादायी आहे पण त्याचे राजकारण करू नका तो पुतळा अधिक मजबुतीने उभारला जाईल असं सुद्धा राष्ट्रवादी कडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtra Politics: दोन्ही पवारांचा बालेकिल्ला असलेल्या जुन्नरमध्ये सांगली पँटर्न राबविणार...?

सांगलीत उद्धव ठाकरेंनंतर कदम आता थेट शरद पवारांना ते ही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शह देणार का? अशी चर्चा राज्यभर रंगू लागलीये. महाविकासआघाडीत जुन्नर विधानसभा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे उघड आहे. मात्र त्याचं जुन्नरमधून काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर तीव्र इच्छुक आहेत, त्यांच्यासाठीच विश्वजित कदमांनी शड्डू ठोकलेत. शेरकरांसाठी सांगली अथवा नवा पॅटर्न राबविण्याची तयारी कदमांनी दर्शवली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत कदमांनी शेरकरांना तसा शब्द ही दिला. त्यामुळं उद्धव ठाकरेंप्रमाणेचं शरद पवारांविरोधात ही काँग्रेस इथं ही बंडखोरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Nashik Dam Water Storage: नाशिकच्या गिरणा धरणात 94 टक्के पाणीसाठा, विसर्ग वाढला 

नाशिकच्या गिरणा धरणात 94 टक्के पाणी साठा झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे,दुपारी 12 वाजता वकरद्वार 1 व 6 प्रत्येकी 60 सेंटीमीटर ने वाढवण्यात आला असून वकरद्वार 2,3,4,5 हे प्रत्येकी 30 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहे,तर धरणातून 9504 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे

Malvan Incident News: मालवण घटनेची केंद्र सरकारकडून दखल, तांत्रिक समिती स्थापन

राजकोट शिवाजी महाराज पुतळा प्रकरण!

केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेची दखल घेण्यात आली आहे. याबाबत नौदलाकडून तपासासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली ही तांत्रिक समिती असणार आहे. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाचे अधिकारी समितीत असणार आहेत. समितीकडून घडलेल्या घटनेचा तपास केला जाणार

Beed News: बीडमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला विरोध, शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

बीडमध्ये अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला विरोध करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोध करण्यात आला असू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. निदर्शने करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर

Ratnagiri News: रत्नागिरीत हिंदू गर्जना मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच रत्नागिरीत 19 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज रत्नागिरीत हिंदु गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं देखील बंद ठेवली होती.

Kalyan News: उल्हासनदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी आंदोलन,  नितीन कदम यांचा पुढाकार 

उल्हास नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नदीच्या पाण्यात बसूनच आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर ,कैलास शिंदे देखील सहभागी झाले आहेत . उल्हास नदीत महापालिकेकडून ,कंपन्यांकडून सोडण्यात येणारे सांडपाणी तात्काळ बंद करावे असे मागणी निकम यांनी केली आहे .12 तास अशाच प्रकारे पाण्यात उभे राहून नितीन निकम पाणी न पिता अशाच प्रकारे पाण्यात उभे राहून हे आंदोलन करणार आहेत.

Nagpur News: मालवण घटनेचा निषेध, अजित पवार गटाकडून मूक आंदोलन

नागपुरात अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक आंदोलन करणयात आले. शिवाजी महाराज फोटोला माल्यार्पण करून टाळ वाजवून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्यात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.

Mumbai News: ठाण्याचे मनसे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांच्या भेटीला ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबत ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात या मनसे पदाधिकाऱ्यांनी निषेध केला होता. हेच निषेध करणारे पदाधिकारी आज राज ठाकरे यांच्या भेटीला आलेल्या असताना राज ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केलेले आहे.. तसेच हेच करायचे आहे का? आपल्याला आणखी पुढे योग्य पावले टाकायची आहेत... असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Maval Protest News: मालवणधील घटनेचा मावळमध्ये निषेध

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून पडला. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आज मावळमधील देहूरोड व वडगाव मध्ये आंदोलन करण्यात आले. एवढी मोठी दुर्घटना घडून देखील महायुती सरकार जनतेची माफ़ी मागण्यासाठी पुढे येत नाही. तसेच निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करू इच्छित नाही. त्यासाठी सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीकडून देहूरोड येथे आंदोलन करण्यात आले. तर वडगाव येथे महाविकास आघाडीकडून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला...

Jalgaon News: श्रीकांत शिंदेंचा जळगाव दौरा, विधानसभेचा घेणार आढावा

शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे हे मुक्ताईनगर पाचोरा पारोळा व चोपडा या चार विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. जळगाव मधील एका खाजगी हॉटेलमध्ये आढावा बैठकीच्या आयोजन करण्यात आले असून या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार पदाधिकारी उपस्थित असून विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांशी श्रीकांत शिंदे हे संवाद साधणार आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून जळगाव जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे.

Akola News: अकोला हादरलं! 10 वर्षीय मुलीवर अत्याचार, सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केला अत्याचार

अकोल्यात जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय.. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केली. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता.. तिच्याचं दूरच्या नातेवाईकानं हा अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकड ठेवून आई वडील बाहेर गेलेय.. याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोट फैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली.. बा

Nagpur News: नागपूरमध्ये महिला काँग्रेसचे नारी न्याय आंदोलन

बदलापूर घटनेच्या विरोधात आणि राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, सध्याच्या स्थितीविषयी आज नागपुरात "महिला काँग्रेसचे नारी न्याय आंदोलन" केले जाणार आहे. काँग्रेस महिला आघाडी तर्फे नागपुरात आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसअध्यक्षा अलका लांबा करणार आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी असतील. यासाठी भव्य मंच तयार करण्यात आला असून मंचावरून सभेत भाषण होईल.

यावेळी विशेष म्हणजे महिला पदाधिकारी "लाल रंगाचे वस्त्र परिधान करून महिलांस डेंजर जोनमध्ये" असल्याचा संदेश देण्यात आला आहे. यावेळी या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा सहभागी होतील आशु माहिती आहे.

Pune News: बांधकाम विभागाची जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, पुण्यातील डॉक्टर एकवटले

ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. केवळ ७०-८० कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येत आहे. याठिकाणी अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया स्मारक व बांधकाम भवनाच्या मागणीसाठी पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन सह कंत्राटदार महासंघाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. खाजगी विकासाच्या फायद्यासाठी मोक्याची जागा दिली जात आहे. भविष्यात सर्व कॉन्ट्रॅक्टर एक होऊन मोठा आंदोलन यासंदर्भात उभा करतील. असा इशारा रवींद्र भोसले यांनी दिला आहे

Nashik MNS Protest: नाशिकमध्ये मनसेचे आंदोलन; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मनसेकडून नाशिकमध्ये आंदोलन केले जात आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू असून आंदोलनादरम्यान रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली.

Mumbai News: मालवण घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे आंदोलन

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे.विरोधकांनी या वर सरकारला धारेवर धरलेले असताना आता महायुती मध्ये शामिल असलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने ही राज्यभर या वर मूक आंदोलन छेडत सरकारला घरचा आहेर दिला आहे.राष्ट्रवादी ने घाटकोपर च्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी चे नेते शिवाजी राव नलावडे यांच्या नेतृत्वात मूक निदर्शन केले. तोंडाला काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेद व्यक्त करण्यात आला.

Dharashiv News: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत;  रामदास कदम यांचे तुळजाभवानी चरणी साकडे

एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा झेंडा फडकू दे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार पुन्हा येऊ दे असे साकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी तुळजाभवानीला घातले दरम्यान आज रामदास कदमांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन महाआरती व अभिषेक पुजा केली.

Pune News: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई! बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरवर छापा

पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात मोठे कारवाई पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा टाकला आहे. छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स वायफाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.

विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये सुरू होते बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात हे अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होते. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करत आहेत

Nagpur Congress Meeting: नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक; विदर्भातील निवडणुकीवर चर्चा

नागपूरमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बैठक होत आहे. नागपूर विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये बैठक होत आहे. सुमारे पाऊण तास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरू असून बैठकीत विदर्भातील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेंनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी उपस्थित आहेत. यवतमाळमध्ये आज काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या पुस्तकाचे विमोचन होणार आहे. या पुस्तक विमोचनासाठी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत,त्यापूर्वी नागपूर विमानतळावर काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली

Chhatrapati Sambhajinagar News: मालवण घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक; दुचाकी रॅली काढून नोंदवला निषेध

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभरात पडसाद उमटत असताना आज छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दुचाकी रॅली काढत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून काळे वस्त्र परिधान करत निषेध नोंदवला. शहरातील क्रांती चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. दरम्यान यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे फलक दुचाकीला बांधले होते.

Mumbai News: मालवण घटनेचा निषेध: अजित पवार गटाचे आत्मक्लेश आंदोलन

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. चेंबूरमधील पांजरापोळ जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केले जाणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ व प्रवक्त्या सना मलिक शेख यांची उपस्थिती राहणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये  हिंदु आक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये आज हिंदु आक्रोश मोर्चा निघणार आहे. महंत रामगिरी यांच्या आणि बांगलादेश येथील हिंदूच्या समर्थनासाठी हा हिंदू आक्रोश मोर्चा निघणार आहे. मागच्याच आठवड्यात वैजापूर येथे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाराष्ट्रातील ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या विरोधात आंदोलन सुरू असल्या कारणामुळे वैजापूरमध्ये जमाबंदी आदेश लागू केला होता. जमावबंदी आदेश शिथिल झाल्यानंतर आज सर्व हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये वैजापूर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी होतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे.

Crime News: जव्हारमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल 

जव्हार येथील ५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न परप्रांतीय कामगारांकडून अत्याचार जव्हार येथे B.S.N.L च्या टॉवरच्या कामा साठी हे कामगार आले होते. जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच वर्षे चिमुरडी वर जव्हार येथील पतंग शाह कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जव्हार तालुक्यातील ओझर गावातील ही सदर घटना असून या घटनेने जव्हार मध्ये आदिवासी संघटनेने संताप व्यक्त केलेला आहे . जव्हार पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांकडून तपास सुरू आहे

Pune News : ससूनमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली, MRI मशीन २० दिवसांपासून बंद 

पुण्यात ससूनमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचं समोर आलंय. ससून हॉस्पिटल मधील एमआरआय मशीन वीस दिवसापासून बंदच आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य मंत्री हसनमुश्रीफ यांचे ससूनकडे दुर्लक्ष असल्याचं बोललं जातंय. वीस दिवसांपासून एमआरआय मशीन बंद असल्याने रुग्णांना बाहेरून एमआरआय करून आणायला सांगितलं जात आहे. ससून अधीक्षक यलप्पा जाधव वीस दिवसानंतरही गप्प असल्याचा आरोप केला जातोय.

Dharashiv News :  धाराशिवच्या वाशी बाजार समितीत 24 लाखांचा अपहार

धाराशिवच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी तत्कालीन सभापती प्रशांत चेडे यांच्यासह संचालकांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 या कालावधीत वाशी बाजार समितीत संचालक मंडळाची कसलीही मंजुरी न घेता 24 लाख 70 हजार रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा केले होते. याच अनुषंगाने लेखापरीक्षा केशव बोंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तत्कालीन सभापती प्रशांत चेडे हे सध्या परंडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar : उद्या शरद पवारांच्या सुरक्षेबाबत गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक

शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या शरद पवारांच्या सुरक्षेबाबत गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शरद पवार केंद्राची सुरक्षा घेणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. केंद्रांकडून पवारांना सीआयएसएफच्या झेड प्लस सुरक्षेचा प्रस्ताव देण्यात आलाय. पण अजूनही पवारांनी सुरक्षा घेतली नसल्याची माहिती मिळतेय.

Beed : बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी  

राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये दाखल होत आहे. याच यात्रेनिमित्त येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी बीडमध्ये आता गुलाबी वादळ करण्यात आले. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये मोठमोठे चाळीस फुटी होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, कमानी त्याचबरोबर गुलाबी झेंडे देखील लावण्यात आले आहेत. तर या जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

Nashik News : नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकमध्ये अवघ्या एका दिवसाच्या अंतराने गोदावरीला पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. रामकुंड, गोदा घाटाच्या परिसरात गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झालीय. गंगापूर धरणातून पुन्हा 3 हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालीय.

Pune News : पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद

पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद आहेत. ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना, पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आलीय. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या २ हजार ९०९ सीसीटीव्ही पैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. सीसीटीव्ही महापालिकेने बसविलेले असले तरी त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. त्यामुळे या निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च करणार कोण, याबाबत स्पष्टता नसल्याने ते बंद आहेत.

BJP Meeting : उद्या संध्याकाळी भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक

भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक होणार आहे. उद्या संध्याकाळी भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आहे. भाजप केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे इतर कोअर कमिटीचे नेते राहणार उपस्थित आहेत.

Nashik News :  नाशिकमध्ये बिबट्याचा मृत्यू, परिसरात खळबळ

नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील दहीदी शिवारात एका पडिक शेतात बिबट्या मृत अवस्थेत शेतक-याला दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला मालेगाव येथे आणत पशू वैद्यकिय अधिका-यांनी त्याची पोस्टमार्टम केले. बिबट्याला भक्ष न मिळाल्यामुळे त्याच्या पोटात काहीच आढळून न त्याचा मृत्यू झाल्याच सांगण्यात आले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थित बिबट्याचे दहन केले जाणार आहे.

Pune News : पुण्यातील अरण्येश्वर भागात गुंडांचा उच्छाद, वाहनांची तोडफोड

पुण्यातील अरण्येश्वर भागात गुंडांचा उच्छाद पाहायला मिळतोय. गुंडांनी दहशत माजवीत केली अनेक वाहनांची तोडफोड केलीय. एरवी झोपडपट्टी किंवा चाळ सदृश परिसरात वाहनांची तोडफोड केली जात होती. मात्र, या घटनेत सोसायटी भागात मध्यमवर्गीय लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या. मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले होते.

Crime News : जालन्यातील मंठा येथील शासकीय विश्रामगृहात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसापूर्वीच रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकारी राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहात दारू पिऊन जाऊन आरोपी पदाधिकारी आणि त्याच्या साथीदाराने महिला अधिकाऱ्याच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून, धमक्या देत अर्वाच्य भाषा वापरली. याप्रकरणी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांच्या फिर्यादीवरून जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी भाऊसाहेब गोरे आणि त्याच्या एका साथीदारा विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 329 (1), 3 (5) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपासासाठी कदीम पोलिसांनी हा गुन्हा मंठा पोलिसाकडे वर्ग केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करीत आहे.

Sangli : सांगलीत दहीहंडी सोहळा उत्साहात, शिवगर्जना संघाने दहीहंडी फोडत 1 लाखाचे बक्षीस पटकावले 

dahi handi : सांगलीमध्ये दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने मानाच्या दहीहंडी आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील तरुण भारत स्टेडियम मध्ये पार पडलेल्या या दहीहंडी मध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सात गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता,ज्यामध्ये शिवगर्जना गोविंदा पथकाने सहा मनोरे रचत दहीहंडी फोडत 1 लाखाचे बक्षीस पटकावले,या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सिनेकलाकारांना उपस्थिती लावत बहारदार नृत्याविष्कार सादर केला,तर हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी खासदार विशाल पाटील,काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह हजारो सांगलीकर नागरिकांना हजेरी लावली होती.

Pune News : शिरगाव मध्ये हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचा हातोडा..चार लाख 19 हजाराचा मध्यमान केला जप्त...

Pune Latest News : मावळच्या शिरगाव येथील गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत दारूभट्टी उद्ध्वस्त केली. चार लाख 19 हजाराचा मुद्देमाल केला जप्त. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हमराज रजपूत असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तील पवना नदीच्या कडेला शिरगाव मध्ये गुळ मिश्रित कच्च्या रसायनापासून गावठी हातभट्टी तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळीत जाऊन पाहणी केली असता जमिनीच्या खड्ड्यात लोखंडे दोन हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन, 35 लिटर गावठी दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच दारू अड्डा पूर्ण उध्वस्त करण्यात आला.. अधिक तपास शिरगाव परंदवाडी परिसरात आहे.

Nagpur : मूल होत नसल्यामुळे पतीने केली पत्नीची हत्या

Crime News : लग्नाला 20 वर्षे लोटूनही मूल होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करत तिचा खून केल्याची घटना कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

Pune News : मूर्ती दान करा सेंद्रिय खत मिळवा, पुणे महापालिकेचा निर्णय

Ganesh Utsav 2024 : मूर्ती दान करा सेंद्रिय खत मिळवा, पुणे महापालिकेचा निर्णय

गणेशोत्सवात जे भाविक गणेश मूर्ती महापालिकेकडे दान करतील, अशा १५ हजार नागरिकांना प्रत्येकी एक सेंद्रिय खताची पिशवी भेट दिली जाणार

गणेशोत्सवाच्या काळात गर्दीमुळे कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, हा कचरा उचलला न गेल्याने शहर अस्वच्छ होते

गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माण नागरिकांकडून संकलित केल्या जाणाऱ्या निर्माल्याचे पाषाण तलाव येथील जागेत खत तयार केले जाणार

सामाजिक संस्थांशी महापालिका चर्चा करणार

Rajkot Fort : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाचे आंदोलन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सत्ताधारी पक्षाचे आंदोलन होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आज पुण्यात आंदोलन

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे मुक आंदोलन

मालवणमधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यामध्ये अचानक दुर्घटनाग्रस्त झाला आहे.

हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन

Marathi News : आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा मृत्यू, आश्रमशाळा व्यवस्थापनाने दिली दोन लाखांची मदत...

Marathi News : तुमसर तालुक्यातील चांदपूर टेमनी येथील एका खाजगी आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दहाच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजश्री मदन वाढीवे (१६) वा. मोठागाव (आसलपाणी) ता. तुमसर, जि. भहारा असे मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नात आहे. राजकी हीची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. दरम्यान, तिला शाळा शिक्षकाने प्रथमतः सिहोरा येथील ग्रामीण सणालय उपचारार्थ दाखल करण्यात होते. सिहोरा येथील डॉक्टरानी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले.

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात राजश्रीच्या प्रकृतीत कुठलीच सुधारागा झाली नसल्याने तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रेफर करण्यात आले. परंतु तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. राजश्रीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला हे अद्यापही कछु शकले नाही. राजश्रीच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळा व्यवस्थापनाने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संस्थेचे कार्यकारी सचिव यांनी वडील मदन वाढीचे यांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच उरलेली आठ लाख रुपयांची रक्कम १५ दिवसांत देण्याचे लिखित आश्वासन दिले.

Nashik : आदिवासी असल्यानेच राज्य सरकारकडून १० वर्षांपासून अन्याय, कविता राऊतचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Nashik News : अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिक धावपटू कविता राऊत हिने राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. आदिवासी असल्याने आणि पाठीशी कुणीही गॉड फादर नसल्यानं १० वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीत डावललं जातंय, असे तिने म्हटलेय. 2014 ते 2024 असे दहा वर्ष मी मंत्रालयात चक्कर मारतेय, मात्र अजूनही माझं काम होत नाहीये.

Samruddhi Mahamarg : तुम्हाला कसे हाताळायचे आम्हाला चांगले ठाऊक, कोर्टाने ठणकावले

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने MSRDC ला फटकारले आहे. समृद्धीच्या एन्ट्री पॉईंटवर तपासणी होत असल्याची खोटी माहिती सादर केल्याचं निदर्शसनास आल्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले आहे. तुम्हाला कसे हाताळायचे आम्हाला चांगले ठाऊक असल्याचं म्हणत न्यायालयाने खडे बोल सुनावले.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नियमित वाहन तपासणी करणे आवश्यक, एका दिवसात संपूर्ण आकडेवारीसह कागदपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सामाजिक कार्यक्रते अनिल वाडपल्लीवर यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने MSRDC ला सुनावले.

ganesh utsav 2024 : पीओपीची मूर्ती स्थापन करणाऱ्या मंडळावर कारवाई करा, कोर्टाचे आदेश

Nagpur court : पीओपीची गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्या सार्वजनिक मंडळावर कठोर आर्थिक दंडात्मक कारवाईसह शिक्षा देण्याचा अनुषंगाने तरतूद करा असे आदेश नागपूर खंडपीठाने मनपा आयुक्त आणि पोलीस विभागाला दिले आहेत.

नैसर्गिक जलस्रोतांच्या प्रदूषणावर गंभीर चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

पीओपीच्या मूर्तीची स्थापना करत असेल तर जबाबदार पदाधिकाऱ्यांवर आर्थिक दंड लावत, शिक्षा देण्याच्या अनुषंगाने तरतूद करण्याचे आदेशही महानगरपालिका आयुक्तांना, तसेच पोलीस विभागाला न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाकडून हमीपत्र घ्यावे असेही सूचना केलेले आहे. त्याशिवाय गणेशोत्सव साजरी करण्याची परवानगी देऊ नये अशी न्यायालयाने म्हटले.

UPSC उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार

UPSC उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार आहे.

फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचं महत्वाचं पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण वापरण्याची परवानगी दिली आहे.

पूजा खेडकरची फसवणूक प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून महत्वाचं पाऊल उचलल्याच बोललं जात आहे.

यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल असा सरकारला विश्वास

chhagan bhujbal : मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्तीयाची मोठ्या पदावर नियुक्ती

मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्तीयाची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सुभाष राऊत यांच्याकडे राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली आहेत.

राऊतांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार दिला असून या पदाला राज्यमंत्री दर्जा आहे.

सुभाष राऊत हे भुजबळांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात.

राऊत हे बीडच्या पंचतारांकीत सनराईज हॅाटेलचे मालक असून मराठा आरक्षण आंदोलनात हे हॅाटेल पेटवण्यात आल होत

kalyaninagar news update today : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांनी केली पासपोर्ट परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी पोर्शे कार परत करा अशी मागणी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळाला केली होती. आता पासपोर्टसाठी अगरवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. काल यावर सुनावणी होणे अपेक्षित होत मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com