रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, पुढील दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या योजनेचा लाभ ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून, सरकार यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. कर्जमाफीबाबत माहिती देताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात लहान आणि दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील.
बँकांची अडचण आणि नील दाखला: राष्ट्रीयकृत बँकांमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कर्जमाफीची रक्कम कमी आली तरी उर्वरित रक्कम बँका माफ करतील. कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना ‘थकबाकी नाही’ (नील) असा दाखला मिळेल.
शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन: कर्जमाफीच्या आणखी तीन याद्या जाहीर होणार आहेत. त्यामुळे ज्यांची नावे पहिल्या याद्यांमध्ये आलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
आयकर (IT) भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत: ही कर्जमाफी प्रामुख्याने गरीब आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी लागू नाही. मात्र, अशा शेतकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियमित कर्ज भरणारांना प्रोत्साहन: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत केली जाईल. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात असून, टप्प्याटप्प्याने नियमित कर्जदारांचाही सकारात्मक विचार केला जाईल.
बोगस बियाणे आणि अकोला प्रकरण: सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारी आलेल्या कंपन्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: धाराशिव येथील प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असून, कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे.
खत लिंकिंगवर बंदी: युरियासोबत इतर विनाअनुदानित खते सक्तीने विकण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने जीआर (GR) काढला आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधित खत विक्रेत्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.