Loksabha Election: विदर्भात महायुतीची दाणादाण; काँग्रेसकडून बालेकिल्ला पुन्हा काबीज

Loksabha ElectionVidarbha : लोकसभा निवडणुकीतला आजचा निकाल विदर्भातल्या दोन दिग्गजांचं राजकीय भवितव्य बदलवणारा ठरू शकतो.
Loksabha Election: विदर्भात महायुतीची दाणादाण; काँग्रेसकडून बालेकिल्ला पुन्हा काबीज
Loksabha ElectionVidarbha

नूतन ठाकरे, साम प्रतिनिधी

महाराष्ट्रात काँग्रेसने चमकदार कामगिरी केलीय. यात विदर्भाचा मोठा वाटा आहे. विदर्भातल्या दहापैकी सात जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले. यापैकी सहा जागांवर काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भाजपची मात्र दाणादाण उडाली आहे. पाहूया, विदर्भाच्या निकालाचा अर्थ काय.

लोकसभा निवडणुकीतला आजचा निकाल विदर्भातल्या दोन दिग्गजांचं राजकीय भवितव्य बदलवणारा ठरू शकतो. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसने ही उसळी घेतली आहे. त्यामुळे दिल्लीत नानांचं वजन चांगलंच वाढणार आहे.

तर तिकडे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येऊ शकतं. बावनकुळे ज्या रामटेक मतदारसंघात राहतात तो रामटेकचा बालेकिल्ला शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी दोनवेळा राखला होता. मात्र, बावनकुळेंच्या आग्रहावरून रामटेकचा उमेदवार बदलण्यात आला आणि शिंदेसेनेच्या राजू पारवे यांना तिकीट मिळालं. या जागेची खात्री बावनकुळेंनी घेतली होती. मात्र, रामटेकची जागा भाजपने गमावली. विशेष म्हणजे रामटेकमध्ये काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती.

मात्र त्यांचं जातप्रमाणपत्र रद्द केल्यामुळे ऐनवेळी त्यांच्या पतीला उमेदवारी दिली आणि काँग्रेसनं विजय खेचून आणला. भंडाऱ्यात काँग्रेसच्या डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपच्या सुनील मेंढेंना धूळ चारलीय. अमरावतीचं तिकीट नवनीत राणांना देण्यामध्ये फडणवीस आणि बावनकुळेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मात्र, ही जागाही काँग्रेसने आपल्याकडे खेचली. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर या त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकरांसारख्याच जायंट किलर ठरल्या. प्रतिभा धानोरकरांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा पराभव केला. 2019 मध्ये बाळू धानोरकरांनी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले होते.

फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री. या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून gfx in विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली. मात्र, इथून काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झाले. तिकडे वर्ध्यातही दोन वेळा खासदार असलेले भाजपचे रामदास तडस यांना मतदारांनी नाकारलं. यवतमाळ-वाशिमच्या राजश्री हेमंत पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

विदर्भात भाजपची लाज राखली ती हायवे-मॅन नितीन गडकरी यांनी. विदर्भातली नागपूरची एकमेव जागा भाजपला मिळाली. गडकरींना पाडण्यासाठी भाजपमधूनच प्रयत्न झाल्याचे आरोप झाले. मात्र, गडकरींनी नागपूरचा गड शाबूत ठेवला. नागपूरपाठोपाठ अकोल्यात अनुप धोत्रे विजयी झालेत. नागपूरप्रमाणेच बुलढाण्यात शिंदेंच्या प्रतापराव जाधवांनी महायुतीची आब राखलीय.

बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या नागपूर विभागीय शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते. विदर्भातल्या भाजपच्या अपयशामुळे पुढच्या काळात संघटनात्मक बदल झाले तर बावनकुळेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येणार का, अशी चर्चा रंगली आहे.

Loksabha Election: विदर्भात महायुतीची दाणादाण; काँग्रेसकडून बालेकिल्ला पुन्हा काबीज
Loksabha Election: कोकण ठाकरेंच्या हातून निसटलं; कोकणात महायुतीचाच डंका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com