

जोतिबा मंदिरात पुजारी-भाविकांमध्ये वाद
सासनकाठीवरून निर्माण झाला तणाव
हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नेमका वाद कशामुळे झाला याचा पोलीस तपास सुरू आहे.
काल रविवार असल्याने जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी होती. १ एप्रिलला होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या सासनकाठ्यांचे आगमन सुरू झाले आहे. याचदरम्यान, करवीर तालुक्यातील परिते गावातील सुमारे दीडशे ते दोनशे भाविक वाजत-गाजत सासनकाठीसह मंदिर परिसरात दाखल झाले. मात्र ही सासनकाठी देवस्थान मान्यताप्राप्त नसल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीतच काही भाविकांकडून हुल्लडबाजी सुरू झाली.
गुलाल उधळणे, इतर भाविकांना त्रास देणे तसेच पोलिसांशी हुज्जत घालणे असे प्रकार घडू लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना पुजारी आणि पोलिसांनी संबंधितांना अडवले. यातूनच वाद विकोपाला जाऊन दोन्ही बाजूंमध्ये तुंबळ हाणामारी झाली. देवस्थानचे पुजारी नवनाथ लादे यांनी आरोप केला की, हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकांना रोखताना त्यांनी उलट अरेरावी केली आणि त्यामुळेच हा प्रकार घडला.
दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवल ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्याने आज दिवसभर आपले व्यापार बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवलेला आहे, असं मंदिराचे पुजारी नवनाथ लादे म्हणालेत. तर प्रकरणावर बोलताना परिते गावचे सरपंच मनोज पाटील म्हणाले, मात्र उलट आरोप करत, मंदिर परिसरातील पुजाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाविकांना आरेरावी करत मारहाण केलेली आहे.. पुजाऱ्यांकडूनच गावकऱ्यांवर अन्यायकारक मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी सुमारे ३० जणांविरोधात वारणा कोडोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.