भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
आयुष्यात मेहनत करायची तयारी असेल तर आपण काहीही करु शकतो, असं म्हणतात. परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करायचे मनात पक्क केलं की यशाला गवसणी घालता येतेच. असंच यश कोल्हापूरातील मनाली शिंदेला मिळालं आहे. कोल्हापूरातील मनाली शिंदेने परिस्थितीशी दोन हात करत PSI बरोबरच नगर परिषद लेखाधिकारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
मनाली शिंदे ही कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील काळकाई गल्लीत राहते. ती वडिलांशिवाय वाढली आहे. मनाली लहानपणापासून आईच्या आईकडे म्हणजेच आजीकडे राहिली आहे. आईचे दुःख कमी करायचे ही एकच गोष्ट मनात ठेवून मनालीने जिद्द आणि चिकाटीने तिचे स्वप्न साकार केले आहे. मनालीने शासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न लहानपणीच पाहिले होते. त्याच स्वप्नांचा पाठलाग करत तिने यश मिळवले आहे.
मनालीला २०२१-२२ च्या परीक्षेत अवघ्या १-२ गुणांनी अपयश मिळाले. परंतु मनालीने हार मानली नाही. तिने शेवटी पोलीस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातलीच. मनाली सुधा विजय शिंदे लवकरच पोलीस उपनिरिक्षक पदी रुजू होणार आहे.
मनाली ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने अभ्यासासोबतच पार्ट टाइम जॉब केली. तिने पान बनवण्याचे काम केले. पोलिस भरतीतील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले. अशा सर्व परिस्थितीतून आज तिने मार्ग काढला आहे.
मनालीची आई चार घरातील धुणी-भांडी करते. मनालीच्या शिक्षणासाठी बचत करते. आईला मदत व्हावी यासाठी मनालीनेदेखील पार्ट टाइम जॉब केला. २ बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या या मुलीने आज खूप मोठे यश मिळवले आहे. तिने स्पर्धा परीक्षेसाठी कोणतेही क्लासेस लावले नव्हते. मनाली लवकरच आपल्या कामासाठी रुजू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.