अभिजित देशमुख
कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जातो. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नाले सफाई कागदावरच झाल्याचे दिसून येत आहे. बहुतेक नाल्यांमधील गाळ व कचरा कायम आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटीची दवंडी पीटणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयाशेजारील नाला देखील कचऱ्याने भरलेला दिसून येत आहे.
पावसाळ्यात अतिपावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये; तसेच पाण्याचा निचरा लगेच व्हावा यासाठी नालेसफाई करण्यात येत असते. अर्थात पावसाळा सुरु होण्यापूर्वी नालेसफाईचे काम महापालिकेकडून पूर्ण केले जात असते. दरवर्षी हि प्रक्रिया राबविली जात असते. मात्र केडीएमसीकडून नालेसफाईचे काम अद्याप झाले नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाल्यात अजूनही गाळ व कचऱ्याचे ढीग
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तरी देखील कल्याण- डोंबिवलीत नाले सफाईचे काम संथगतीने किंवा वरवर केल्याचे समोर येत आहे. कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी परिसरात असलेल्या मोठ्या नाल्यात अजूनही गाळ आणि कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे या नाल्यालगतच केडीएमसी स्मार्ट सिटीचे मुख्यालय आहे. अशा महत्त्वाच्या कार्यालयाजवळच जर नाल्याची दयनीय अवस्था असेल, तर शहरातील इतर भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येते.
कागदोपत्री लाखो रुपयांचा खर्च
महापालिकेने कागदोपत्री लाखो रुपयांची नाले सफाई दाखवली असली, तरी प्रत्यक्षात नाल्यात गाळ कायम असून, हे काम केवळ कागदावरच झालं की काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून दरवर्षी केडीएमसी प्रशासनाकडून नाले सफाईचे कामे केली जातात. मात्र नालेसफाई कागदावरच केली जाते. दरवर्षी केडीएमसी प्रशासनाकडून नालेसफाईचा दावा करण्यात येतो. मात्र संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे नागरिकांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.