
जालन्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. जालन्यातील गाढेगव्हाण फाट्यावर हा भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये कारमधील पाचही जणांचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कारसह मृतांना विहिरीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील राजूर- टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगव्हाण फाट्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटून कार थेट विहिरीत कोसळली. विहिरीमध्ये पाणी जास्त असल्यामुळे या पाचही जणांना गुदमरून मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत.
पोलिसांनी सांगितले की, भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे ही कार जात होती. या भरधाव कारने आधी रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार थेट कठडे तोडून विहिरीत कोसळली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये ज्ञानेश्वर डकले, पद्माबाई भांबीरे, निर्मलाबाई डकले, आदिनाथ भांबीरे आणि ज्ञानेश्वर भांबीरे यांचा मृत्यू झाला.
अपघातामधील सर्व मृत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली झाले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह आणि कार बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही विहिर ७० फूट खोल असून त्यामध्ये ६० फूट पाणी आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.