
Jalgaon News: आपल्या लहानग्या बाळाला झोक्यात झोपवून आई कामावर निघून गेली. चिमुरड्याला शांत झोप लागावी, तो झोक्यातून पडू नये, म्हणून या माऊलीने झोक्याला कवच म्हणून रुमाल देखील बांधला. पण हाच रुमाल या बाळासाठी काळ ठरला. झोपेतून उठल्यानंतर झोक्याबाहेर पडण्याच्या प्रयत्नात हाच रुमाल बाळाच्या गळ्यात अडकला आणि गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.
मन सुन्न करणारी ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घडली. निर्भय वसंत इंगळे (वय अवघं १ वर्ष) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. १० दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस होता. पोटचा गोळा अचानक काळाने हिरावून नेल्याने आईने हंबरडा फोडला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
प्राप्त माहितीनुसार, जामनेर शहरातील (Jalgaon News) गिरीजा कॉलनी परिसरात वसंत इंगळे हे आपल्या पत्नी आणि कुटुंबासह वास्तव्यास आहे. वसंत हे एका वाहनचालक असून त्यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे वसंत आपल्या कामावर निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने घरची कामे आवरून बाळाला स्तनपान करून झोक्यात झोपवलं.
मी कामाला जाते बाळावर लक्ष ठेव, असं म्हणत बाळाच्या आईने आपल्या धाकट्या बहिणीला झोक्यात झोपलेल्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. निर्भय शांतपणे झोपला होता. हे पाहून बाळाची मावशी जेवण करण्यासाठी किचनमध्ये गेली. तेथून परतल्यानंतर ती निर्भयकडे गेली असता, तो झोक्यात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.
निर्भयला झोक्याबाहेर लटकताना पाहून मावशीच्या पायाखालची जमीनच सकरली. तिने तातडीने त्याला उचलून बाहेर काढले. आवाज देऊनही तो कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचं पाहून मावशीने तातडीने निर्भयच्या आईला फोन केला आणि घरी बोलावून घेतलं. दरम्यान, आईने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चिमुकल्या निर्भयने आधीच प्राण सोडले होते. निर्भयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. निर्भय पडू नये यासाठी मध्यभागी रुमाल बांधला. मात्र अचानक जागं झालेल्या बाळाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.