कॉंग्रेस स्वबळावर लढण्याचे संकेत

कॉंग्रेस स्वबळावर लढण्याचे संकेत
congress
congress
Published On

भडगाव (जळगाव) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून याबाबत आढावा घेऊन अहवाल पाठविण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे कॉंग्रेस (Congress) स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होते. यावर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे.

congress
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

कोणाच्याही मनी-ध्यानी नसताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे राज्यात यापुढे महाविकास आघाडी एकत्रित लढेल, असे चित्र होते. अर्थात पंढरपूर व देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या संदर्भात कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, महानगरध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने कुठलीही तडजोड न करता स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने आपापल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. यावरून आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कॉंग्रेसने स्वबळाची तयारी चालविली असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सत्तेत असताना स्वबळावर?

एकीकडे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत आहे. असे असताना काँग्रेस भाजपबरोबर सत्तेतील पक्षाच्या विरोधातच निवडणूक लढणार आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेतही राहायचे आणि निवडणुका विरोधात लढायच्या हे मतदारांना कितपत रूचेल, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. स्वबळाची भाषा करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लावते आहे? असाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची ३० तारखेला बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात चर्चा करून त्यासंदर्भात अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करणार आहोत.

- प्रदीपराव पवार, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, जळगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com