गिरणेला महापुर; जामदा बंधाऱ्याचे गेट न उघडल्याने पाणी शेतात

गिरणेला महापुर; जामदा बंधाऱ्याचे गेट न उघडल्याने पाणी शेतात
Girna River Flood
Girna River Flood
Published On

मेहुणबारे (जळगाव) : मन्याड धरणातून तब्बल दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडल्याने गिरणा नदीला आज महापूर आला. त्यामुळे जामदा- रहिपुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या तब्बल शंभर एकरापेक्षा अधिक क्षेत्रात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. (jalgaon-news-girna-river-Flood-and-Water-in-the-field-due-to-non-opening-of-the-gate-of-Jamda-dam)

गिरणा नदीला यंदा पहिल्यांदाच महापूर आला आहे. मन्याड धरण क्षेत्र भागात झालेल्या अतिवृष्ठीमुळे हा पूर आला आहे. मात्र, पुराचा अंदाज न आल्याने गिरणा नदीवरील जामदा- रहिपुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी साचले. या बंधाऱ्याला नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी दोन मोठे व पाटचारीचे चार असे सहा दरवाजे आहेत. नदीला पूर आल्यानंतर दरवाजे उघडून पाणी पुढे नदीत प्रवाहीत केले जाते. आज पहाटे गिरणा नदीला महापूर आल्यानंतर जामदा- रहिपुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. अशा परिस्थितीत पाण्याचा फुगवटा हेाऊन पाणी आसपासच्या शेतांमध्ये जाऊ नये, यासाठी बंधाऱ्याचे दोन मुख्य गेट उघडण्याची गरज होती. मात्र, पाटबंधारे विभागाकडून हे गेट उघडण्याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने बंधाऱ्यातील पुराचे पाणी गिरणा नदीत प्रवाहीत न होता आसपासच्या शेतांमध्ये शिरले.

शंभर एकर क्षेत्र पुराने प्रभावीत

आधीच गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या तडाख्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशातच अचानक गिरणेला आलेल्या या पुरामुळे पुन्हा मोठा फटका बसला. जामदा- रहिपुरी बंधाऱ्याचे गेट उघडण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे परिसरातील शेतकऱ्यांनी आग्रह धरला होता. मात्र, विभागाकडून हे गेट उघडण्याबाबत होत असलेल्या विलंबामुळे तब्बल शंभर एकर क्षेत्र पुराच्या पाण्याने प्रभावीत झाले आहे. ज्यामुळे कापूस, मका, ऊस, केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकर्यांमधून होत आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे काही शेतकर्यांनी तक्रार केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधिताना तंबी दिल्यानंतर बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले.

Girna River Flood
धुळ्यातील व्यापाऱ्याची मागणी अन्‌ केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची तात्‍काळ दखल

लाखोचा खर्च पाण्यात

जामदा- रहिपुरी बंधाऱ्यावर जामदा भागात तीन मुख्य आणि पाटचाऱ्यांचे तीन असे सहा दरवाजे लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आले आहेत. तातडीच्या परिस्थितीत गिरणेला पूर आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन हे गेट वर उचलले जातात. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी तुंबुन न राहता पुढे नदीत प्रवाहीत होते. आज गिरणेला महापूर आलेला असताना हे गेट उघडणे होते. मात्र, जामदा जवळील तीन गेटपैकी एकच गेट उघडण्यात आले असून उर्वरीत दोन गेट बंदच आहेत. या दरवाजांसाठी लाखो रूपये खर्च करून देखील हा खर्च वाया गेल्याचा आरोप शेतकर्यांमधून होत आहे. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाला पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याने त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी रहिपुरीचे सरपंच राजेंद्र भंवर यांनी केली आहे.

आम्ही गेट उघडण्यासंदर्भात सकाळपासून युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी तीन जनरेटर देखील मागण्यात आले असून ते नादुरस्त झाल्याने गेट उघडता आले नाही. आता यांत्रिकीकरणाची टीम बोलावली असून लवकरच गेट उघडले जातील.

- आर. डी. पाटील, उप विभागीय अभियंता, भडगाव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com