चाळीसगाव (जळगाव) : वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे.
खरीप हंगाम सुरु झाल्याने आता शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. त्यानुसार सायगव्हाण (ता. कन्नड) शिवारात वाघले तांडा येथील आठ ते नऊ जण कपाशी लागवडीसाठी सायगव्हाण शिवारातील शेतात गेले होते. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान त्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्वानी कापूस लागवडीचे काम थांबवून झाडाखाली उभे राहण्यासाठी गेले.
झाडाखाली गेले क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले
यात दशरथ उदल पवार (वय २४), लखन दिलीप पवार (१४, दोन्ही रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) व समाधान प्रकाश राठोड (वय ९, रा. जेहूर, जि. छत्रपती संभाजीनगर) शेतातील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला गेले. मात्र, झाडावर अचानक वीज कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्या परिवारातील काही जण थोड्या अंतरावर बाजूला उभे होते. यातील दिलीप उदल पवार व उदल गणपत पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंचवीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न
दरम्यान कोंगानगर (ता. चाळीसगाव) येथील दशरथ पवार व लखन पवार हे दोघेही तरुण एकाच कुटुंबातील आहेत. यातील दशरथ पवार याचा २२ मे रोजी विवाह झाला होता. विवाहाला अवघे २५ दिवस होत नाहीत, तोच त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संसार सुरु होण्यापूर्वीच संपला आहे. तर घटनेत दशरथ पवार याचा नऊ वर्षांचा शालक समाधान राठोड याचाही मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.