Irshalwadi landslide Search and rescue operation stopped : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. इर्शाळवाडीत आज, शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेले बचाव आणि मदतकार्य एनडीआरएफनं थांबवलं आहे. अद्याप १०७ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दुःखाचा डोंगर कोसळला. दरड कोसळून ढिगाऱ्याखाली २० ते २५ घरं गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्रीपासून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
गुरुवारी संध्याकाळी बचावकार्य थांबवल्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा बचाव आणि मदतकार्याला सुरुवात झाली. आजच्या बचाव आणि मदतकार्यादरम्यान ६ मृतदेह बाहेर काढले. मृतांची एकूण संख्या २२ वर पोहोचली आहे. तर अद्याप १०७ नागरिक बेपत्ता आहेत.
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचं तात्पुरत्या स्वरुपात येथील श्री मंदिर पंचायत सभागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्वांना तेथील एका सभागृहात ठेवण्यात आलं आहे. जोपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी नागरिकांची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांच्या जेवणाची सोयही येथे करण्यात आली आहे.
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार असून, त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे, अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही शिंदेंनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.