इर्शाळवाडी...दुःख डोंगराएवढं | Irshalwadi Khalapur Landslide

Irshalgad Khalapur Landslide : गरज आहे ठोस उपाययोजना करण्याची. त्यांना कायमचं सावरण्याची. त्यांच्यासारख्या डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या, प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन आपलं आयुष्य वेचणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी वसवण्याची.
Irshalwadi Khalapur Landslide
Irshalwadi Khalapur LandslideSAAM TV
Published On

बुधवारची रात्र. काळरात्रच ती. वेड्यापिशासारखा पाऊस कोसळत होता. सोबतीला सोसाट्याचा वारा...बहुतेक लाइटही नव्हती. नेहमीची रात्र समजून सगळेच झोपी गेलेले. काही जण आपल्या नातेवाइकांकडं राहायला गेलेले, तर कुणाची लेक शिकायला बाहेर पडलेली. काही जण शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत मासेमारीला गेलेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हसत्या खेळत्या इर्शाळवाडीत सगळं काही नेहमीसारखंच चाललं होतं. (Irshalgad Landslide News)

कौलारू घरं, कुडाची घरं, झोपड्या, शाळा, छोटंसं मंदिर, आजूबाजूला झाडीझुडपं, हिरवाईनं नटलेलं असं ४० ते ४५ घरांचं गाव आणि अंदाजे २०० ते २५० माणसांची हसती खेळती इर्शाळवाडी. पण बुधवारच्या रात्री उशिरा दहा-पंधरा घरं सोडली तर, सगळंच हरवलेलं. एरवी शांत असलेली वाडी अचानक किंकाळ्या, मायबाप, लेकींच्या आक्रोशानं भरून गेली होती. आईचे डोळे आपल्या लेकरांना, मालकाला शोधत होती. तर एका बापाची नजर आपली पत्नी, वृद्ध आईवडील आणि लेकरांना शोधत होती. क्षणांत टुमदार, डौलदार वाडीचं चित्र काळ बनून आलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली पुसलं गेलं होतं.

Irshalwadi Khalapur Landslide
Irshalgad Landslide News : आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ सगळे दरडीखाली अडकले, आश्रमशाळेत असलेल्या मुलीचे भयावह दृष्य पाहून अश्रू थांबेना

रात्री अकरा-सव्वाअकराची वेळ असावी. अचानक आवाज झाला. डोंगरावरचा काही भाग अधाशासारखा अख्ख्या गावावर कोसळला आणि इर्शाळवाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव क्षणार्धात गुडूप झालं. डोंगरावरून आलेल्या दगड-मातीखाली जे निष्पाप जीव दबले त्यांचा आवाजही काही क्षणांत शांत झाला. जे सुदैवानं वाचले त्यांची एकच धावपळ उडाली. कुठे धावू, कुठे पळू, कुणाला बोलवू, मदतीसाठी कोण येईल, काय करू नी काय नाही. माझा दादा, बाबा, आई, बहीण- भाऊ, काका, मावशी...काय झालं असेल, देवाचा धावा, डोक्याला हात आणि डोळ्यांतून घळघळा ओघळणाऱ्या अश्रूंशिवाय कुणाच्याच हाती काही उरलं नव्हतं.

Irshalwadi Khalapur Landslide
Why landSlide Increase in Sahyadri : सह्याद्री का खचतोय? इर्शाळवाडी दुर्घटना भविष्यातीत मोठ्या धोक्याचा इशारा, Explained

या वाडीतली दहा-पंधरा घरं सोडली तर उरलेली काही घरं ढिगाऱ्याखाली गायब झालेली. तिथं फक्त होता मातीचा ढिगारा. ढिगाऱ्याखालून अर्धी बाहेर आलेले वासे, कौले, काही भांडी. बघूनच डोळे पाणावतील अशी स्थिती. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले.

जयश्री किसन वाघ ही तिथंच राहणारी मुलगी. पण दुर्घटना घडली त्यावेळी ती वाडीत नव्हती. आश्रमशाळेत होती म्हणून ती वाचली. तिचे आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ या दरडीखाली गाडले गेले. या सगळ्यांना तिनं अखेरचं मे महिन्यात बघितलं होतं. पण आता या सगळ्यांचा काहीच ठावठिकाणा नाही. तिचा आक्रोश काळीज चिरणारा आहे. तिच्यासारखेच असे कित्येक आहेत, त्यांचीही हीच अवस्था. शब्दात व्यक्त करताच येणार नाही अशी.

आता या वाडीत मदत आणि बचावकार्य सुरुय. सरकारची सर्व यंत्रणा या वाडीत ठाण मांडून आहेत. ज्याला शक्य होईल तो मदत करतोय. जे जे शक्य, ते ते करण्याचे प्रयत्न सगळीच यंत्रणा करतेय. मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतीची घोषणाही केलीय. उद्ध्वस्त झालेले संसार सावरायला अनेक हात पुढे येताहेत. पुढचे अनेक दिवस मदत, संसार, कुटुंबाला, छत्र हरपलेल्यांना सावरण्यात जातील. पण गरज आहे ठोस उपाययोजना करण्याची. त्यांना कायमचं सावरण्याची. त्यांना आणि त्यांच्यासारख्या डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या, प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन आपलं आयुष्य वेचणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी वसवण्याची. घटना घडण्याआधीच सरकारनं ठोस पावलं उचलावीत. प्रचंड इच्छाशक्ती दाखवून सगळ्यांना मुलभूत गरजांसकट सुरक्षित ठिकाणी वसवावं. नाही तर, एक होतं माळीण..., एक होतं तळिये..., एक होती इर्शाळवाडी...आणि आणखी आणखी बऱ्याच छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्या... अशा भयाण, भयावह वास्तवातील घटना पुढच्या काळातही बघाव्या लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com