Nashik News : उत्तर भारतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या दरडी कोसळणे, जमीन खचण्याच्या घटना समोर येत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सह्याद्री पर्वत रांगांमध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजच्या रायगडमधील इर्शाळवाडी घटनेनं दरड कोसळणे आणि जमीन खचण्याची समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
इर्शाळवाडी घटनेनंतर सह्याद्री पर्वतरांगेतील दरडी कोसळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. गेली शतकानुशतकं महाराष्ट्राला राकट आणि कणखर बनवणारा सह्याद्री गेल्या काही वर्षांपासून मात्र ठिकठिकाणी ढासळत आहे. (Maharashtra News)
डोंगराला तडे, मोठमोठ्या भेगा पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. सह्याद्रीच्या घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरु आहे. यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसणाऱ्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गावकरी दहशतीत आहेत. मात्र हा सह्याद्री का खचतोय? काय कारण आहेत यामागे? यासंदर्भात ट्रेकर आणि पर्यावरण अभ्यासक प्रशांत परदेशी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
प्रशांत परदेशी यांनी म्हटलं की, सह्याद्रीच्या डोंगरांची होणारी झीज आणि धूप हे दरड कोसळण्याचं महत्त्वाचं कारण आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात झालेली प्रचंड जंगलतोड हेही मोठं कारण आहे. वृक्षतोडीमुळे हिरवळ नष्ट होत आहे. त्यामुळे सह्याद्रीची दगड, माती घट्ट पकडून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे.
वृक्षतोडीमुळे डोंगरावर पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. डोंगरदऱ्या पोखरून करण्यात येत असलेली मनमर्जी बांधकामं, रस्ते तयार करतांना पुरेशी काळजी आणि खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे पाण्याला जमिनीत मुरण्यास आणि खाली वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे असे प्रकार घडतात, असंही परदेशी यांनी म्हटलं.
सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये बांधकामं तसंच रस्त्यांसाठी सपाटीकरण करताना करण्यात येणारे ब्लास्टिंग मुळेही डोंगरांना धोका निर्माण होत आहे. त्यातच अगदी कमी कालावधीत जास्त प्रमाणात पडणारा पाऊस ही देखील मोठी समस्या असल्याचं परदेशी यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.