आज सकाळी जी घटना घडली, तिथे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अंबादास दानवे, मी आणि सुनील प्रभू जाऊन आलोय. मदतकार्य सुरु आहे. मदत कार्याला अडथळा नको म्हणून आम्ही खाली गावात नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी देवाकडे प्रार्थना करावी की सगळे सुखरुप असावे. वेगळेवेगळे आकडे समोर येत आहेत. एनडीआरएफ आणि डिजास्टर मैनेजमेंटच्या टीम बचावकार्य करत आहेत. मला यात राजकारण करायचं नाही. ही नैसर्गिक घटना आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
रात्रीच्या आंधाराचा विचार करून विज वितरण कंपनीमार्फत इर्शाळगड दुर्घटनास्थळी विद्युत व्यवस्था केली जात आहे. 6 हॅलोजन आणि चार हायमास्ट बसवले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी स्थनिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आली आहेत. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच लोकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहुन 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चालत घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोहचुन त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडीतील दुर्घटनास्थळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचून दुर्घटनेची पाहणी केली. आताच्या घडीला मदत कार्य महत्त्वाचं, कसं घडलं? का घडलंय़ याबद्दल विधिमंडळात बोलूच अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे मांडलीय.
यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर दिला. स्थानिकांचा आक्रोश हा हृदयद्रावक आहे. ही घटना एवढी भीषण आहे की, भौगोलिक परिस्थितीमुळे, पावसामुळे अजूनही बचाव कार्यात अडथळा येत आहे. अशावेळी सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहेतच. त्यांना यश येऊन इथले गावकरी सुखरूप ह्या संकटातून बाहेर येवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तेथे मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
इर्शाळावाडी दुर्घटनेविषीय बोलताना जिंतेंद्र आव्हाड म्हणाले की, महसूल खात्यामध्ये नियम आहेत. ज्यांची घरे डोंगराळ भागात आहेत, त्यांना दुसरीकडे घरे दिली जावीत. आता कोणाला दोष देऊन काय अर्थ नाही. आता मदत पुनर्वसन काय करत ते महत्वाचं. तलीयेमध्ये आम्ही मंत्री असताना लोकांना नवीन घरं बांधून दिलीत याचा मला आनंद वाटतोय. हे सरकार देखील करेल, असे आव्हाड म्हणाले.
खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी या दुर्घटनाग्रस्त घटनास्थळी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.
इर्शाळवाडी दुर्घटनेवर रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जी घटना घडली ती दुर्दैवी. जी लोकं गेली त्यांना श्रद्धांजली वाहतो. जे अडकले असतील त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावे. फेब्रुवारीमध्ये एक रिपोर्ट काढण्यात आला होता. त्यात देशातील 100 पेक्षा अधिक भागात भूस्खलन केंद्र असल्याचे त्यात होते. ज्या भागात ही घटना घडली तो भाग या अहवालात 100 व्या नंबरवर आहे. ही घटना घडली, पण आता पुढे घडू नये याची काळजी घ्यावी. NDRF सोबत बैठक घेऊन पाऊस आल्यावर काय करायला हवं याची चर्चा करायला हवी होती, असे रोहित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिलं. फडणवीस म्हणाले, थोरात साहेबांची भूमिका योग्य आहे. परंतु,इर्शाळवाडीतील परिस्थिती एवढी गंभीर होती की त्याचा अंदाज देखील येत नव्हता. आत्ता सकाळी आलेली माहिती मी मांडली आहे. मला वाटतं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होऊ देऊ आणि त्यानंतर आपण यावर चर्चा करू असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिलं.
अशा घटना घडते त्यावेळी सत्ताधारी-विरोधक असं काही नसतं. ज्यावेळी अशी घटना घडतात, त्यावेळी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या प्रमुखांना घेऊन जातात, अशी परंपरा आहे. आज मुख्यमंत्री लवकर गेले, चांगली गोष्ट आहे. ते स्वत: लक्ष घालत आहेत. हे झालं नसलं तरही आम्ही विरोधक म्हणून सरकारच्या सोबत आहोत. तिथे आणखी आकडा वाढू नये अशी अपेक्षा आहे. मदत आणि सहकार्यासाठी आम्ही पूर्णपणे सरकारसोबत आहोत. यावर एक चर्चा घडवून आणावी अशी आमची मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे असे थोरात म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत बोलताना इर्शाळवाडी येथील घटनेसंदर्भातील माहिती दिली. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही दुर्दैवी घटना असून गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. जेसीबी जात नसल्यामुळे दोन ते अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का असा विचार प्रशासन करत आहे. मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी आहेत. ते वेगवेगळ्या एजन्सीच्या संपर्कात आहेत. याशिवाय दादा भुसे, उदय सामंत, स्थानिक आमदार तिथे उपस्थित आहे. हे सर्व जण नातेवाईकांना आधार देत आहेत.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची माहिती देवेंद्र फडणीसांनी सभागृहात दिली. रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून आत्तापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या मदतकार्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे बराच वेळ चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर सर्वात आधी पोहोचून ज्या तरूणांनी मदत केली, त्यांनी तेथील भयावह परिस्थिती सांगितली आहे. साम टीव्हीशी बोलताना यातील एका तरुणाने सांगितले की, ही अत्यंत दूर्दैवी घटना आहे. याठिकाणी दरड कोसळी आहे आणि जवळपास 50 फुटांचा मलबा घरांवर साचलेला असू शकतो. घटनेविषयी कळताच आम्ही निघालो येथे जायला खूप कठीण होतं तरी आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा खूप धुकं होतं, त्यामुळे आम्हाला सकाळपर्यंत थांबावं लागलं. तिथे जाईपर्यंतच आमच्याकडील बॅटरी संपल्या होत्या.
तिथे पोहोचल्यावर आम्ही सर्वात आधी आवाज कुठून येतोय हे पाहिलं. सुरुवातीला एका बकरीचा जीव आम्ही वाचवला. ती मबल्याखाली दबली होती. त्यानंतर एक छोटा मुलगा होता, जो घराच्या किचनमध्ये अडकला होता. त्यालाही आम्ही सुखरुप बाहेर काढलं. त्यानंतर एक मृतदेहही काढला.
रायगडमधील खालापूरच्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अख्ख गाव ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना आमदार सचिन आहिर यांनी सरकारवर टीका केली आहे. इर्शाळवाडीतील लोकांना आधीच दुसरीकडे हलवलं असतं तरतर 5 जणांचा मृत्यू झाला नसता असे सचिन आहिर म्हणाले आहेत.
खालापूर येथील येथे दरड कोसळली आहे. त्या ठिकाणी मदत करण्यासाठी ठाण्यातील डीडीआरएफचे जवान देखील रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी मातीचा ढिगारा खाली करण्यात येत आहे. बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी पथक कामी लागले आहे.
काल रात्री साडेदहा-आकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना जिथे घडली तिथे चालत जायलाही रस्ता नाही. परंतु तिथे एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. मुख्यमंत्री, मंत्री आणि स्थानिक नेते तेथे पोहोचले आहे. प्रशासनाचे अधिकारी देखील तेथे पोहोचले आहे. दोन हेलिकॉफ्टर तयार ठेवले आहेत, परंतु खराब हवामानामुळे अडचण येते आहे.
इर्शाळवाडी असं त्या भागाचं नाव आहे. तिथे 48 कुटुंबात 228 लोकं राहत होती अशी माहिती आहे. हे गाव दरड प्रवण क्षेत्रात नव्हतं. या घटनेत आतापर्यंत 5 लोकं दगावली आहेत. जखमींना पनवेलमध्ये, तेथील एमजीएम रुग्णालयात उपयारासाठी हलवलं आहे.
सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. तिथे मशिनरी जात नसल्यामुळे, अकुशल मनुष्यबळ आणि बचाव पथकाद्वारे बाचवकार्य सुरू आहे. सरकारकडून पूर्णपणे खबरदारी घेऊन काम केले जात आहे. आम्ही सगळे जण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत दिली जणार असून जखमी लोकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.
मी रात्री दिल्लीत पोहोचल्यावर मला घटना समजली. मी प्रशासन आणि यंत्रणेशी बोललो आहे. मी तातडीने महाराष्ट्रात पुन्हा निघालो आहे. मुख्यमंत्री आणि बाकी मंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत. हेलिकॉप्टरने पोकलेन न्यावे लागणार आहेत. केंद्र सरकार नेहमी मदत करत असतं. अमित शाह यांनी देखील फोनवरून संवाद साधला आहे आणि पूर्ण मदतीच आश्वासन दिलं आहे, असे सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीत दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना योग्य उपचार देण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च सरकारने करावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सोबत असिन गुप्ता देखील उपस्थित
दुर्घटना स्थळी मृत्यू झालेल्यांची अंत्यविधी कशा पद्धतीने करावा याबाबत दोघांमध्ये चर्चा
नातेवाईकांना विश्वासात घेऊन पुढील कारवाई करण्याबाबत नियोजन सुरू
घटनास्थळी हेलिकॅाप्टर पाठवण्याबाबत नियोजन सुरू
तुम्ही तेथिल परिस्थिती बघून गरज वाटली तर थांबा, सभागृहात मी कामकाज संभाळून घेतो - अजित पवार
"महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. @mieknathshinde यांच्याशी बोललो. एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह बचावकार्य करत आहेत. तिथून लोकांना बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे", असे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, इरसालवाडी येथे डोंगराजवळ ही वस्ती आहे. येथे 45 घरं आहेत, यातील 15 ते 17 घरं ढिगाऱ्याखाली दबले आहेत. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफसह लोकल रेस्क्यू टीम बचावकार्य करत आहे. पाऊस सुरू आहे. तिथे वाहनं देखील जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सर्व यंत्रणा आणि लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांचाही फोन आला होता, त्यांनी देखील जी मदत लागेल ती केंद्रसरकारकडून केली जाईल असे सांगितले आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, परंतु खराब हवामानामुळे ते टेक ऑप करू शकत नाहीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
इर्शालगडावर बचाव कार्य करताना अनेक अडचणी येत आहेत. या ठिकाणी जेसीबी, पोकलेन किंवा अन्य कोणतीही यंत्रणा या ठिकाणी पोहचू शकत नसल्याने NDRFचे जवान आणि स्थानिक खोरे, कुदळ यांच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी हेलिकाॅप्टरद्वारे बचावकार्य राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मावळात धो धो मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना नदी, इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. अशावेळी कोणतीही दुर्घटना घडली तर कोणती उपाययोजना करण्याची याबद्दलचे प्रात्यक्षिक आपातकालीन विभाग यांच्या वतीने तळेगावमध्ये घेण्यात आले. यामध्ये ग्राम सुरक्षा दल, वन्यजीवन रक्षक, मावळ संस्था, यानी सहभाग घेतला होता. एखादी व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे प्रशिक्षणही देण्यात आली.
रायगडमधील इर्शाळवाडी जवळ दरड कोसळून एक भीषण दुर्घटना घडली. दरड कोसळण्याची ही घटना अतिशय भीषण असून यामध्ये अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
रायगडमधील इरशाळवाडी दरड कोसळली
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये नेमके नुकसान किती झाले आहे, ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.