(RNO)
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील १२ आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे. यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या जलजीवन मिशन योजनेॉअंतर्गत गेल्या वर्षी १ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर झाला. मात्र तेथाल नागरिकांच्या घराजवळ पाण्याचा थेब आला नाहीये. जवळपास वर्ष उलटून गेले आहे तरीही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट अजून थांबलेली नाहीये. (Latest News)
हे पूर्ण गाव व शिवाचीवाडी, खडकवाडी, खाल्ली वाडी, लालवाडी, पारधवाडी, पाटीलवाडी, फणसवाडी, बुडानवाडी, सावरवाडी, पेहेरेवाडी, माऊलीवाडी या १२ वाड्या पेसा अंतर्गत असून याबाबत येथील सरपंचांनी योजनेबद्दल माहिती विचारली तर येथील काम करणारे ठेकेदार येथील सरपंच यांना माहिती न देता दम देत असल्याची तक्रार येथील सरपंच यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांना कळवली.
आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी या ग्रामपंचायत हद्दीत जल जिवन मिशनच्या कामाची पाहणी केली असता या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. साधारण वर्षभरापूर्वी या ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशनच्या कामाची पूर्तता झाली. मात्र डोंगरमाथ्यावर टाकी बांधून पाईपलाईन टाकून ठेकेदार गायब झाल्याचे दिसून आले. येथील वाड्यापाड्यातील घरात मात्र अजूनही नळ जोडणी केलेली नाही.
त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या १२ वाड्यामधील आदिवासी महिला भगिनींना लहान लेकरांना चक्क झिऱ्याचे गढूळ पाणी हाताच्या ओंजळीने भरून आपली तहान भागविण्याची वेळ आली आहे. थोडक्यात काय तर धरणांचा तालुका पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात महिलांच्या डोक्या कमरेवरील हंडा उतरण्याचे नाव घेत नाहीये. याला कारणीभूत कोण संबंधित लोकप्रतिनिधी यांची उदासीनता की ठेकेदारांचा मनमानी कारभार दिसून येत आहे.
जर गावातील सरपंचालाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत असेल तर साधारण नागरिकांचे काय, असा प्रश्न लकी जाधव यांनी या परिस्थितीवर उपस्थित केला. इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत जवळपास १०० कोटी रुपयांची जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरू असून निम्याच्यावर या योजना अपुर्ण अवस्थेत असून ठेकेदारांना मात्र १०० टक्के निधी वितरीत केल्याची माहिती मिळत आहे.
योजना अपूर्ण ठेवून जर तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणी मिळाले नाही तर मुंबईला जाणारे पाणी बंद करू असा आक्रमक पवित्रा लकी जाधव यांनी घेतलाय. योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. या प्रसंगी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह शेणवड बुद्रुकचे सरपंच कलावती जयराम खडके, शिवराम खडके दत्तु ठाकरे, हिरामण गांगड, सक्रु गांगड राजु पारधी, दिनेश खडके, अंकुश गाव्हांडे, सोमु खडके आदी उपस्थित होते.
शेणवड बुद्रुक येथे जलजीवन योजनेचे काम करतांना संबंधित ठेकेदाराने थेट नदीत विहिरीचे काम केले आहे. नदीतील विहिरीतून एकदा पाणी उपसा केल्यावर पुन्हा विहिरीत लवकर पाणी जमा होत नाही. तसेच विहिरीपासून पाण्याची टाकी थेट पाच किमी अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर बांधलेली आहे. अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे लकी जाधव यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.