Maharashtra Rain Update: राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढले आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे आहेत. राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवली आहे. तसंच, पुढच्या ३ तासांमध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड जिल्ंह्याना पुढील ५ दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पुढील ४ दिवस तुरळक पाऊस राहील. तर विदर्भात २१ तारखेनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून सक्रीय आहे. दक्षिण आणि उत्तर कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या काही तासांमध्ये या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून ठाणे आणि रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पुढील काही तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरला झोडपून काढले. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. उल्हानसगरमध्ये उल्हास नदी आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीचे पाणी शहरातील अनेक रस्त्यांवर आले आहे. तसंच पूल देखील पाण्याखाली गेले आहेत. त्याचसोबत या सर्वच रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली.
तर, दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत. सावित्री आणि वशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूराचे पाणी शहरामध्ये घुसल्यामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच पावसाचा धोका लक्षात घेता रत्नागिरी आणि रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जारी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.