Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचं थैमान, अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस, नागपुरातील शाळांना सुट्टी जाहीर

Rain News in Maharashtra Today : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
Rain News in Maharashtra Today
Rain News in Maharashtra TodaySaam TV
Published On

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन ठप्प झालं आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.

Rain News in Maharashtra Today
Heavy Rain Alert : महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

चांदुर बाजार तालुक्यातील माधान, ब्राम्हणवाडा थंडी, सोनोरी गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. आज दिवसभर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसामुळे शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

विदर्भाला पावसाचा तडाखा

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका नागभीड तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील बामणी ते कोटगाव हा पोच मार्ग वाहून गेला, तर नागभीड शहरातील शिवनगर भागात काही घरात पाणी शिरले आहे.

चंद्रपूर वीज केंद्राचे इरई धरण सध्या नियोजित पातळीपर्यंत येऊ लागल्याने सायंकाळपर्यंत त्याची दारे उघडली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातही शनिवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ५ तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

नागपुरातील विमान उड्डाणे रद्द

नागपूर शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम विमान सेवेवरही झाला आहे. मुंबईवरुन नागपूरला येणारी सकाळच्या सत्रातील अनेक विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. विमान रद्द झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधीपक्ष नेते यांनाही फटका बसला आहे. रामदास आठवले यांना तातडीने आपला नागपूर दौरा रद्द करावा लागला आहे.

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. दादर, अंधेरी, हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहेत. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसला आहे. सध्या तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहे.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि बदलापूरमध्येही पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Rain News in Maharashtra Today
Mumbai Local Train : मुंबईत पहाटेपासूनच तुफान पाऊस, तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवाशांचे प्रचंड हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com