शेतकरी दुष्काळात, गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी वकिलांना दिले ८० लाख

Gokul Dairy Rs 80 Lakh Advocate Fee: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षासाठी राज्य सरकारने ८० लाख रुपयांचे वकिली शुल्क मंजूर केले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना आयकर कपातीनंतर ७२ लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत.
GOKUL DAIRY POWER STRUGGLE
GOKUL DAIRY POWER STRUGGLEsaam tv
Published On: 

रणजित माजगांवकर, साम टीव्ही

एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना, दुसरीकडे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षासाठी झालेला सरकारी खर्च चर्चेत आला आहे. गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर राज्य सरकारच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या प्रकरणातील त्यांच्या वकिली शुल्कापोटी तब्बल ८० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आयकर कपातीनंतर ७२ लाख रुपये अदा करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सहकार विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी सरकारी तिजोरीतून झालेल्या या खर्चावरून आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेले संख्याबळ आणि कोरम यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करून चार मतदानाचा अधिकार असलेल्या शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली. या निर्णयाला समविचारी आघाडीच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारत सरकारचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वकिली शुल्कापोटी ८० लाख रुपयांचे बिल सरकारकडे सादर करण्यात आले होते.

GOKUL DAIRY POWER STRUGGLE
Political News : हिवाळी अधिवेशनाआधी महेश बालदींची आमदारकी धोक्यात? कारवाईची कोणी केली मागणी, काय आहे कायदा?

आता सहकार विभागाने २३ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे या बिलाला मंजुरी दिली आहे.शासन निर्णयातील तपशीलानुसार, ८० लाख रुपयांच्या वकिली शुल्कातून १० टक्के म्हणजेच ८ लाख रुपये आयकर कपात करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुकुल रोहतगी यांना प्रत्यक्ष ७२ लाख रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. विकासकामांसाठी निधीची उपलब्धता हा देखील चर्चेचा विषय आहे. अशा परिस्थितीत एका सहकारी संस्थेतील संचालक नियुक्तीच्या न्यायालयीन लढाईसाठी एवढा मोठा सरकारी खर्च करण्याची आवश्यकता होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.