बीड : अतिवृष्टीच्या आणि मुसळधार पावसाच्या आसमानी संकटानंतर आता बीडमधील पिंपळटक्का या डोंगरातील गावात भूगर्भातील गूढ आवाजामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसे देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत. प्रशासनाला विचारलं असता भूगर्भातील हालचालीमुळे असे आवाज होऊ शकतात, असा अंदाज भूगर्भतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, आवाजाचं खरं कारण अद्याप समोर आल नाही. त्यामुळे भीती कायम आहे, असं गावातील नागरिक सांगत आहेत. पिंपळटक्का बरोबरच बीड जिल्ह्यातील इतर लाडेगाव, कण्हेरवाडी आणि आवरगाव या गावात असे गूढ आवाज झाल्याने भितीचे वातावरण आहे. घाबरून जाऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मात्र, आवाज का होत आहेत याचं कारण अद्याप समोर आले नाही. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेल्या हजार लोकवस्तीच्या पिंपळटक्का या गावात, सोमवारी आणि गुरुवारी रात्री 11 वाजता प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजाने पत्रे आणि भिंती हादरल्या यामुळं घाबरलेली सगळीच लोकं लहान मुलांना घेऊन घराबाहेर रस्त्यावर आली. खूप भीती वाटली होती, भूकंप होतो की काय असं वाटत होतं, त्यामुळे लहान मुलाला देखील झोपेतून उठून घराबाहेर काढले. पाच मिनिटं आवाज होत होता त्यामुळे खूप भीती वाटत होती. असं गावातील नागरिकांनी सांगितलं. यापूर्वी देखील असा आवाज झाले होते. असा देखील गावातील नागरिकांनी सांगितले.
हे देखील पहा :
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि अचानक झालेला आवाजामुळे आम्ही घरात झोपले असताना, दचकून उठलो आणि घराबाहेर पळत सुटलो. यातच लहान मुलांना पावसामध्ये आम्ही रस्त्यावर घेऊन उभे होतो. आता देखील खूप भीती वाटत आहे, भूकंप होतो की काय ? त्यामुळे झोप लागत नाही, तर लहान मुलांना घेऊन घरात कसं झोपाव? भूकंप तर होणार नाही ना? अशी भीती वाटत आहे असं गावातील महिलांनी सांगितलं. गावात दोन दिवसांपूर्वी रात्री 11.30 च्या दरम्यान मोठा आवाज झाला. भिंत पडली की काय म्हणून आम्ही देखील घरातून बाहेर आलो. त्यावेळी सगळ्या लोकांना बाहेर निघायला शेजारची माणसं सांगत होती. पाच मिनिट काय होत आहे हे समजत नव्हतं. मात्र नंतर आवाज शांत झाला त्यावेळी कसा बसा गावकऱ्यांना धीर दिला आणि सर्वांनी रात्र जागून काढली. सकाळी महसूल प्रशासन आलं होतं त्यांनी पाहणी केली व भूगर्भ विभागाचे अधिकारी देखील आले होते. मात्र, आवाजाचे खरे कारण त्यांनी सांगितलेलं नाही. लोकांमध्ये आज देखील प्रचंड भीती आहे. असं गावचे सरपंच संतोष कदम यांनी सांगितलं आहे.
पिंपळटक्का हे गाव माझ्या तलाठी सज्जा मध्ये आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी गूढ आवाज आल्याचं सांगितलं. त्यानंतर तहसीलदार साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही गावात गेलो होतो. भूगर्भातील तज्ञांनी पाहणी केली आहे. मात्र, अद्याप अहवाल आला नाही. आवाज पुन्हा झाला तर काळजी म्हणून बाहेर रस्त्यावरती थांबा अशी जनजागृती करत आहोत. असे तलाठी गुलाब कुचेकर यांनी सांगितलं आहे. अगोदरच अतिवृष्टीने घर संसार आणि पिके नेस्तनाबूत झालेली असताना आता भूगर्भातून होणाऱ्या आवाजामुळे भूकंप होतो की काय ? म्हणून गावकरी दहशतीखाली आहेत. प्रशासनाने प्रत्यक्ष भेट दिली, मात्र, भूगर्भातील गुड आवाजाचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या गावकऱ्यांची भीती घालवण्यासाठी वैज्ञानिक कारण सांगणे गरजेचे आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.