अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बीएसस्सी नर्सिंगमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळणार्या 'बंटीबबली'चे पितळ आज उघडे पडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना माहिती देत विद्यार्थ्यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांनी ही घडलेली घटना आपल्या हद्दीत येत नसल्याचे कारण दिले.
प्रवेश, नोकरी आदींच्या नावावर आजही सुशिक्षित बेरोजगारांना फसवणुकीच्या घटना समोर येतात असाच एक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. अमरावती, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांना जीएनएम नर्सिंग, एनएनएम आणि बी एसस्सी नर्सिंगसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, वर्धा, सावंगी मेघे आणि अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून अमरावती येथील बंटीबबलीने शेकडो विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भरून घेतले. त्यांना मात्र, पैसे भरल्याची पावती ही व्हॉटस्अॅपवर ऑनलाइन दिली.
हे देखील पहा -
या बंटीबबलीने विद्यार्थ्यांकडून पंधराशे रुपयांपासून तर 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे आज प्रवेश मिळेल, असे सांगून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रवेशासाठी पाठविले. सकाळपासून अमरावती, यवतमाळ येथील विद्यार्थी जीएमसी येथे प्रवेशासाठी आले होते. महाविद्यालयात येऊनही प्रवेश होत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महाविद्यालयातील प्रशासनातील कर्मचार्यांशी संपर्क साधला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आले की, या महाविद्यालयात बी एसस्सी नर्सिंग हा अभ्यासक्रम येथे नाहीच. तसेच सध्या प्रवेशप्रक्रियाही नाही, या बंटीबबलीने आपली आर्थिक फसवणूक केल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी यासंदर्भात महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांना याबाबत माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी अशा नावाचा कुठलाच व्यक्ती कार्यालयात कर्तव्यावर नाही. तसेच या प्रवेशाबाबत कोणालाच माहिती नाही. त्यामुळे तुमची फसवणूक झाल्याचे अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले. परंतु, अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया ही अमरावती व इतर जिल्ह्यात झाली असल्याने पोलिसांनी त्यांना त्याच ठिकाणी तक्रार देण्याचा सल्ला देऊन परत पाठविले आहे. शेकडो विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयात आले होते, हे विशेष.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.