

मुंबई - पुणे प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. केंद्र सरकारने जेएनपीटी (पागोटे) बंदर ते जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील प्रमुख जंक्शन असलेल्या चौकाला जोडणारा सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे उभारण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प तब्बल २,९०० कोटी रूपयांचा आहे. हा प्रकल्प खास बंदर कनेक्टिव्हिटि वाढवणे, औद्योगिक कॉरिडॉरला चालना देणे आणि मुंबई, नवी मुंबई तसेच पुणे यांच्यातील प्रवासी वाहतूक सुलभ करण्यासाठी उभारण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. हा प्रकल्प खास बांधा, वापरा अन् हस्तांतरित करा (BOT- Build Transfer And Operate) या तत्त्वावर उभारला जाणार असून, यासाठी एकूण ४,५००.६२ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.
विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना फक्त १० मिनिटांत मुंबई- पुणे महामार्ग गाठता येणार आहे. २९.२१९ किमी लांबीचा हा कॉरिडॉर जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा एक महत्वाचा दुवा ठरेल. यामुळे जलद गतीनं वाहतूक होईल.
या प्रकल्पासाठी अंदाजे १७५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, याचं बांधकाम ३० महिन्यांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार, या एक्स्प्रेस वेमध्ये २ मोठे बोगदे, सहा मोठे पूल, पाच छोटे पूल, चार उड्डाणपूल आणि दोन रस्ते पूल असतील. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन एक्स्प्रेस वेमुळे केवळ मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक गर्दी कमी होणार नाही, तर माल आणि प्रवासी दोन्हींची वाहतूक अधिक जलद होईल. विशेषत: रायगड, पनवेल आणि नवी मुंबईतील नागरिक व उद्योगधंद्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. या परिसरात अनेक औद्योगिक आणि निवासी प्रकल्प विकसित होत असल्यानं हा नवीन एक्स्प्रेस वे या भागातील कनेक्टिव्हिटी तसेच अर्थव्यवस्थेला चालना देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.