
छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्याने आगीचा भडका उडाला. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. मोठा भडका उडाल्यानंतर शेजारीच असणाऱ्या गादीघराला देखील आग लागली. पाहता पाहता आगीने लगतची आणखी तीन दुकाने गिळंकृत केली.
पण, त्यानंतर घडलेला प्रकार भयंकर होता. फॅब्रिकेशनच्या दुकानातील सिलिंडर फुटला आणि सिलिंडरसह त्याचे मोठाले तुकडे अक्षरशः क्षेपणास्त्रासारखे उडाले. शेजारचे अपार्टमेंट आणि त्या पलीकडच्या अपार्टमेंटचे या तुकड्यानी प्रचंड नुकसान केले. पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला भगदाड पडून मोठा तुकडा थेट घरातच घुसला.
देवळाई परिसरातील विजयंतनगर येथे सोमवारी सायंकाळी ही थरकाप उडवणारी घटना घडली. या भागात राहुल शेवाळे यांच्या जागेवर पत्र्याचे शेड उभारून चार दुकाने काढण्यात आली. पहिल्या दुकानात शेवाळे यांचीच दूध डेअरी आहे, तर शेजारी फळांचे दुकान, त्या शेजारी गादीघर आणि त्या शेजारी फॅब्रिकेशनचे दुकान आहे.
सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास फॅब्रिकेशनच्या दुकानात कामगार लोखंड कापत होते. लोखंड कापताना उडालेल्या ठिणग्या शेजारच्या गादीघरात उडाल्या. त्यातून आग पसरली आणि बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. तिन्ही दुकानांतील लोक आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण आग भडकतच गेली.
अवघ्या सात-आठ मिनिटांमध्ये फॅब्रिकेशनच्या दुकानातील सिलिंडर फुटला. यातील काही तुकडे शेजारील तीन मजली यश प्लाझा अपार्टमेंटमधील दीपक भाटी यांच्या फ्लॅटची भिंत तोडून आतमध्ये शिरले. हा स्फोट एवढा भीषण होता की या इमारतीमधील तीनही मजल्यांवरील फ्लॅटमधील सर्व काचा फुटल्या. तळमजल्यावर असलेल्या आरोही जनरल या कटलरीच्या दुकानाचेही नुकसान झाले.
स्फोटातील सिलिंडरचे तुकडे पहिल्या मजल्यावर पडले. तर, कार्बाइड टाकण्याच्या सिलिंडरचा एक तुकडा रॉकेट लाँचरसारखा 'यश प्लाझा'शेजारी असलेल्या 'तिरुमला रॉयल' या पाच माजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या सुहास संत यांच्या फ्लॅटवर पडला. त्यांच्या फ्लॅटला उत्तरेकडून दोन फुटांचे भगदाड पडले आहे. या स्फोटाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.