राज्यातील नेत्यांच्या बॅगांच्या झडतीवरून विधानसभा निवडणुकीत टीकेच्या तोफा धडाडत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले, म्हणून तुमच्या बॅगा तपासल्या जात आहेत, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालघरमध्ये आले होते. महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. या सभेत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला जात आहे. या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
माझा धनुष्यबाण चोरला असं सारखं म्हणतात. मग तुम्ही काय झोपला होता का? हा काय लहान पोरांचा खेळ आहे का? असा परखड सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आरोप करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना केला.
बॅगांच्या तपासणीवरूनही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटासह महायुतीवर निशाणा साधला होता. तसंच पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह एकनाथ शिंदेंच्याही बॅगा तपासण्याचं धाडस दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. यावरून आता शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले. म्हणून तुमच्या बॅगा तपासत आहेत. आमच्या पण बॅगांची तपासणी केली जाते. आम्ही व्हिडिओ काढून व्हायरल करत नाही, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तत्पूर्वी, एकनाथ शिंदे या प्रचारसभेसाठी पालघरच्याकोलवडे पोलीस परेड ग्राऊंडवर उतरले. त्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्यानंतर लगेच निवडणूक आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिंदेंकडील बॅगांची झडती घेतली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. निवडणूक आयोगाचे काही नियम असतात. त्यानुसार त्यांनी तपासणी केली. त्यांचे कर्तव्य त्यांनी केले. आमच्याकडे काही पैसे नाहीत. युरिन पॉटही नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.