आदिवासी समाजाला मागास, अशिक्षित समजले जाते. पण आमच्या मते ते खूप सुसंस्कृत आहेत. कारण त्यांच्यामध्ये गेल्या ५० वर्षांत एकही बलात्काराची घटना आम्ही बघितलेली नाही, असं निरीक्षण समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी नोंदविलं आहे. महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमटे दाम्पत्याने केलेलं हे निरीक्षण सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाचा आव आणणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारं आहे.
मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या आंतरविद्या अभ्यास केंद्रातर्फे ‘एक संवाद’ कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत गुरुवारी घेण्यात आली. प्राध्यापक डॉ. प्रतीक सलगर यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी आमटे दाम्पत्याने विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर समाजसेवेचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा जातो आणि या कामात कशी आव्हान येत गेली आणि त्यावर कसा मार्ग निघाला, यावर सविस्तर विवेचन केले. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही गेल्या ५० वर्षांपासून आदिवासी समाजामध्ये काम करतो आहोत. पण आपण त्यांच्या संस्कृतीमधून शिकायला हवे. आदिवासी भागामध्ये कधीही चोरीच्या घटना घडत नाहीत. तिथे भांडणेही आपापसात मिटवली जातात. महिलांना तिथे खूप स्वातंत्र्य असते. समुहात राहण्याची सवय असल्याने त्यांनी ही संस्कृती छानपणे रुजविली आहे. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. अजूनही आपल्या देशातील ३० टक्के लोक दारिद्यरेषेखाली आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वकिलीच्या पेशात येणाऱ्या तरुणांनी गरिबांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा या दाम्पत्याने आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली.
लोकबिरादरी प्रकल्पातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले अनेक आदिवासी तरुण आता त्यांच्या बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हेच आमच्यासाठी खूप आनंददायी आहे, असे प्रकाश आमटे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.कायद्याबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन आमटे दाम्पत्याच्या हस्ते कार्यक्रमात करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.