अभिजित देशमुख
डोंबिवली : पीओपीच्या मूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याने शाडूच्या मातीपासून मुर्त्या तयार करत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जावा असे आवाहन शासनाकडून केले जाते. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून डोंबिवलीतील रिजेन्सी सोसायटीमध्ये रीजन्सी वुमन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रीजन्सी यांनी आपला बाप्पा आपणच बनवूया या संकल्पनेतून शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचा निर्धार केला आहे. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये ज्या घरात बाप्पा येतात ते संपूर्ण कुटुंब शाडूच्या माती पासून मूर्ती तयार करत आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ganesh festival) साजरा करण्यासाठी डोंबिवली कल्याण शीळ रोड दावडी येथील रिजेन्सी सोसायटी गेल्या दोन वर्षांपासून पुढाकार घेत आहे. डोंबिवलीतील रिजेन्सी वूमन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (Dombivali) रिजेन्सीतर्फे सोसायटीमध्ये घरातील बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची तयार केली जाते. रीजन्सी सोसायटीत ज्या घरांमध्ये गणपती बसवले जातात, त्या घरातील प्रत्येक कुटुंबाला या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. आई- वडील, लहान मुले, आजी- आजोबा असे सगळे कुटुंबच बाप्पांची मूर्ती तयार करण्यात दंग झाले आहे. रीजन्सीच्या क्लब हाऊसमध्ये ज्यांच्या घरात बाप्पांचे आगमन होते. त्या सर्व कुटुंबांना शाडूच्या मातीचा वापर कसा करायचा, मूर्ती कशी तयार करायची याबाबत प्रसिद्ध मूर्तिकार गणेश अडवळ मार्गदर्शन करत असून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.
या उपक्रमाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्सवात एक नवीन, पर्यावरणपूरक दृष्टिकोन समाविष्ट होईल; या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा १०० हुन अधिक मुर्त्या तयार केल्या जात आहेत. या मुर्त्या त्या त्या घरांमध्ये विराजमान होणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे विसर्जन देखील घरी किंवा कृत्रिम तालावांमध्ये करण्यात येणार असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले. रीजन्सी वुमन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रीजन्सी यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या ठिकाणी शिवसेना डाेंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी भेट दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.