
मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे बंजारा समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक झाले आहेत.
हैदराबाद गॅझेटियरमुळे ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झालं आणि त्याचा फायदा घेत मुंडे बंजारा आरक्षणाची मागणी करत आहेत.
वंजारी आणि बंजारा मतदार एकत्र करून राजकीय कमबॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मंत्रिपद गेल्यानंतर राजकीय विजनवासात गेलेले धनंजय मुंडे आता बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला एक आणि बंजारा समाजाला वेगळा असा न्याय का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केलाय. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी धनंजय मुंडे भुजबळांसोबत एकीची वज्रमूठ आवळत आहेत.
तर दुसरीकडे राजकीय विजनवासात गेलेले धनंजय मुंडे पुन्हा थेट बंजारा समाजाच्या स्टेजवर पोहोचलेत. एवढंच नाही तर बंजारा आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केलाय. खरंतर ओबीसी असलेले धनंजय मुंडे VJNT मधील बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणासाठी पुढाकार का घेत आहेत यामागतचं नेमकं काय कारण असू शकतं? हे आपण पाहणार आहोत...
धनंजय मुंडेंचं राजकारण हे ओबीसीतील माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी पॅटर्नपेक्षा वंजारी केंद्रित असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीआधी मराठवाड्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं धृवीकरण झालं आणि त्याचा थेट फटका धनंजय मुंडेंना बसला. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का बसला.
तर पुढे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्याने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मात्र जातीय राजकारणामुळेच आपला बळी गेल्याची मुंडेंची भावना आहे. आता मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने चालून आलेली संधी धनंजय मुंडेंनी हेरली आणि बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणाची मागणी केली.
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करुन सरकारसमोर कायदेशीर पेच निर्माण झाला असला राजकीय कमबॅकसाठी तसंच वंजारी, बंजारा एकगठ्ठा मतं आपल्याकडे वळवण्यासाठी धनंजय मुंडेंनी बंजारा कार्ड खेळलंय का? याचीच चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.