
Maharashtra Portfolio : शपथविधीला आठवडा झाल्यानंतरही मंत्रिमंडळावर महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्रातील तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खातेवाटपावर चर्चा झाल्याचं बोलले जातेय. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. (amid maharashtra portfolio suspense devendra fadnavis amit shah hold late night meet in delhi)
अमित शहा यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते, असे शिवसेनाकडून सांगण्यात आलेय. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत खातेवाटपावर चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयला सांगितले.
गृह खाते भाजपकडेच राहणार -
शिवसेनेला गृह खाते मिळणार नाही. त्याशिवाय महसूल खात्याचे वाटप होण्याची शक्यताही नाही, असेही भाजप नेत्याने पीटीआयला सांगितले. १४ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला गृहखाते मिळणार नाही. नगरविकास खातं शिवसेनेला दिलं जाऊ शकते. महसूल खाते भाजपकडेच राहू शकते, अशी माहिती भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
कुणाला किती मंत्रिपदे?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्रिपदे आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे सर्वाधिक खाती राहू शकतात. भाजपने मुख्यमंत्रिपदासह 21 ते 22 मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना ७ ते १० मंत्रिपदे मिळू शकतात. तर शिवसेनेला ९ ते १२ खाती मिळू शकतात. चार ते पाच मंत्रिपदे रिक्त राहू शकतात. दरम्यान, तीन पक्षांमध्ये खातेवाटपावर चर्चा सुरू असल्यामुळे विस्ताराला उशीर होत असल्याचे समोर आलेय.
हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार
१६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच खातेवाटप पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण दिल्लीला शिष्टाचार भेट देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर यांची भेट घेतली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज महायुतीची बैठक -
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज बैठक होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन आणि खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.